शिवसेनेतील नाराजांना गळाला लावत ठाणे जिल्ह्य़ातील पाचपेक्षा अधिक मतदारसंघात बंडोबांना उमेदवाऱ्या बहाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर कुरघोडी करत नाराजांचे मनपरिवर्तन करण्यात यशस्वी ठरलेल्या शिवसेनेने आता भाजपला धडा शिकविण्याचा चंग बांधला आहे. ‘भाजपची ताकद असलेल्या डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड या मतदारसंघात ‘कमळाबाई’च्या पाडावासाठी शर्थीचे प्रयत्न करा’, असे आदेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काढले असून डोंबिवलीतील भाजप-मनसेतील ‘संघ’निष्ठांना आपलेसे करण्याची मोहीम आखली जात आहे. डोंबिवलीचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपमधील एक मोठा गट नाराज आहे. या नाराजांमार्फत डोंबिवलीतील ‘परिवारा’ची मते सेनेकडे वळविता येतील का, याची चाचपणी सुरू झाली आहे.  
कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या गोटातून परतलेले सेनेचे बंडखोर नेते रमेश म्हात्रे यांची मनधरणी करताना चव्हाणांना धक्का देणे हेच एकमेव उद्दिष्ट सेना नेत्यांनी आखल्याचे बोलले जाते. म्हात्रे यांचा वरचष्मा असलेले दोन प्रभाग डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मोडतात. त्यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघ सोपा करून घेताना म्हात्रे यांची डोंबिवलीतील मतांची रसद रवींद्र चव्हाणांविरोधात वापरण्याची खेळी शिवसेनेने खेळली आहे. म्हात्रे यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यात चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हात्रे यांची समजूत काढत असताना शिवसेना नेत्यांनी सदा थरवळ, अरिवद मोरे या दोन नेत्यांची नाराजीही दूर केली आहे. डोंबिवलीत ब्राह्मण समाजाची मते निर्णायक ठरतात, असा आजवरचा अनुभव आहे. भाजप, मनसे अशा दोन्ही पक्षांकडून ब्राह्मण समाजातील इच्छुकांचा आकडा त्यामुळे मोठा होता. शिवसेनेने येथून उमेदवार ठरवत असताना मंदार हळबे (मनसे), राहुल दामले (भाजप) अशा काही नावांची चाचपणी करून पाहिल्याचेही समजते. परंतु, ऐनवेळेस हे गणित जमविणे सेना नेत्यांना शक्य झाले नाही.
त्यामुळे चव्हाणांविरोधात असलेल्या सर्वपक्षीय नाराजीचा फायदा करून घेता येईल का, याची चाचपणी सेनेच्या गोटात सुरू आहे.  
म्हात्रे परतले..नाराजांना पदाचे गाजर
दरम्यान, कल्याण ग्रामीण मतदारसंघातील बंडखोर उमेदवार रमेश सुकऱ्या म्हात्रे यांची मनधरणी करत शिवसेनेने बुधवारी भाजपला मोठा धक्का दिला. या मतदारसंघात एकनाथ िशदे यांच्या पुढाकाराने सुभाष भोईर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. रमेश म्हात्रे यांच्या बंडखोरीमुळे भोईर अडचणीत सापडले होते. त्यामुळे म्हात्रे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. बुधवारी दुपारी म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला धक्का दिला. अंबरनाथमध्ये सेना बंडखोर भाजपचे उमेदवार आहेत की आरपीआयचे यावरून वाद रंगला असून हा वाद उभा करत शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडल्याची चर्चा आहे. याविषयी शिवसेनेचे जिल्हासंपर्क नेते एकनाथ िशदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘थांबा आणि पाहा’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली तर रवींद्र चव्हाण प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.