जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमेकांशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेली शिवसेना आणि भाजप युती अभेद्य राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेनेतर्फे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीत भाजप नेत्यांशी सकारात्मक स्वरुपाची चर्चा झाल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. मात्र, जागावाटपासंदर्भातील अंतिम निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि ओम माथूर यांच्यातील शुक्रवारी रात्री ‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या बैठकीनंतरच युतीबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी भाजप सुकाणू समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जागावाटबाबतचा अधिकृत प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी केलेली युती तुटणार नाही आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास जाईल असा विश्वास या बैठकीनंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा उध्दवजींचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी युती कायम रहावी अशी शिवसेनेची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. सोबत ‘मिशन १५०+’ यामध्ये काहीच बदल होणार असेही आदित्य ठाकरे ठामपणे म्हणाले.