राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या राजनाथ सिंह यांची शिवसेना नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत.
राज्यसभेतील खासदार अनिल देसाई आणि पक्षातील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिल्लीत मंगळवारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. बुधवारी सकाळी दोन्ही नेते मुंबईत परतले. त्यानंतर लगेच ‘मातोश्री’वर जाऊन या दोन्ही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव यांना दिल्लीत झालेल्या संपूर्ण चर्चेची माहिती दिली.
आपल्याकडून कोणताही प्रस्ताव शिवसेनेला पाठवला जाणार नसल्याचा पवित्रा भाजपने घेतल्यानंतर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेऊन पुढील चर्चेसाठी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना दिल्लीला पाठवले होते. राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली असून सेना भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उध्दव ठाकरेंना दिल्लीत झालेल्या संपूर्ण चर्चेची माहिती दिली असून पुढील भूमिका पक्षप्रमुखच मांडतील असे सुभाष देसाई यांनी सांगितले. त्यामुळे आता उध्दव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.