विधानसभा निवडणुकीच्या काळात अफजलखानाची फौज म्हणून हिणवलेल्या भाजपच्या नेत्यांसमोरच लोटांगण घालण्याची वेळ शिवसेना नेत्यांवर आली आहे. राज्यातील सत्तेत भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलेल्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई व नेते सुभाष देसाई यांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी आधीच वेळ घेतली नसल्याचे कारण सांगत माघारी पाठविण्यात आले. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीला आले तरच चर्चा होऊ शकेल, अशीही भूमिका भाजपने घेतल्याचे समजते.
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडे स्वत:हून मदत न मागण्याचे भाजपने ठरवल्यामुळे सेनेची चांगलीच पंचाईत झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांची मनधरणी करण्यासाठी अनिल देसाई व सुभाष देसाई यांना उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीस पाठवले होते. या दोघांनी भाजप नेते राजनाथसिंह व उपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले होते, परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. शिवसेना नेत्यांनी आधी भेटीची वेळ न घेतल्याने ही भेट झाली नसल्याचे राजनाथसिंह यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. यासंबंधी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनिल व सुभाष देसाई मंगळवारी रात्रीच दिल्लीत परतल्याचे सांगितले. ते कुणा-कुणाला भेटले, याविषयी माहिती देण्यास मात्र त्यांनी असमर्थतता दर्शवली.
विशेष म्हणजे नड्डा वा राजनाथ सिंह यांना भेटून काहीही साध्य होणार नसल्याचे दिल्लीस्थित भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत आले तरच तोडगा निघू शकतो, असा दावा सूत्रांनी केला. कोणत्याही परिस्थितीत सेनेशी स्वत:हून बोलणी करायची नाहीत, अशी भाजपची भूमिका असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.