विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात भाजपविरोधात आक्रमक बनलेल्या शिवसेना पक्षनेतृत्वाचा आवेश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानंतर ओसरू लागला आहे. एकीकडे, पक्षाच्या मुखपत्रातून भाजपबाबतची ‘कटुता’ संपल्याचे म्हटले जात असतानाच सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत समझोता करण्यासही शिवसेना उत्सुक असल्याचे समजते. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्वत:चे सरकार स्थापण्याची शक्यताही शिवसेनेतून फेटाळण्यात येत
आहे.
राज्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याने आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईसह कोकण व अन्य भागांतही शिवसेनेला मतदान चांगले झाल्याचे अहवाल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी आपल्यालाच बहुमत मिळणार, असा दावा शिवसेनेचे नेते करीत आहेत. मात्र भाजपला अधिक जागा मिळाल्यास शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेण्यापेक्षा अन्य पक्ष व अपक्षांना बरोबर घेण्याचा अधिक प्रयत्न करणार आहे. भाजपने विचारणा केल्यास शिवसेना त्यांना सरकार स्थापनेसाठी मदत करण्यास निश्चित तयार होईल, असे संकेत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदींनी शिवसेना-भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे जाहीरपणे सांगितले आहे.
त्यामुळे शिवसेनेची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक पसंती राहणार आहे. मात्र,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेने खालच्या पातळीवर उतरून प्रचार केल्याने आणि जागावाटपामध्ये आडमुठी भूमिका घेतल्याने शक्यतो शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजप करणार आहे. मात्र तरीही ते शक्य होत नसल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेचा पर्याय अजमावला जाईल, अशी शक्यता आहे.
या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय, असे विचारता शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, भाजपने केलेल्या अनेक सर्वेक्षणांनुसार त्यांना १२५ पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज आहे; पण आमचेच सरकार बहुमताने येईल, असा आमचा विश्वास आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्रिमंडळ, अन्य राज्यांतील मुख्यमंत्री, नेते, खासदार यांना प्रचारात उतरविले. त्यामुळे त्यांना एवढय़ा जागा मिळणार असतील, तरी ते विरोधी पक्षातच बसतील. एवढा मजबूत विरोधी पक्ष मिळणार असून तो सरकारवर निश्चितपणे वचक ठेवेल, अशी खोचक शेरेबाजी राऊत यांनी केली.