भाजपला सत्तास्थापण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाचा खरपूस समाचार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीसाठी कालपर्यंत  भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली होती. त्याच हाफचड्डीच्या प्रेमात शरद पवार कसे काय पडले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्याचवेळी केवळ भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
‘शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल भाजप प्रेमाचे चंदन घासत आहेत ते काय महाराष्ट्रहितासाठी? आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबता आली तर पाहावीत हाच उदात्त हेतू दिसतोय. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभांतून ‘काका-पुतण्यांनी महाराष्ट्र कसा लुटला!’ याची हाळी दिली व पवारांचा पक्ष हा ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगितले. विनोद तावडे आदी नेत्यांनी तर सत्ता येताच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली. हे सर्व लक्षात घेता पटेल यांनी उगवत्या सूर्यासमोर लोटांगण का घातले, हे समजण्यासारखे आहे,’ असे अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
राज्याचे निकाल अधांतरी लागले असले तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टपणे नाकारण्याचे कर्तव्य राज्याच्या जनतेने बजावले आहे, अशीही आठवण करून देण्यात आली आहे.