शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला असून जागावाटपाचे नवनवे फॉर्म्युले परस्परांना दिले जात आहेत. शिवसेना-१५१, भाजप-११९ आणि मित्रपक्ष-१८ जागा असा अखेरचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपसमोर ठेवला. आज वांद्रयातील रंगशारदा सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.
महिनाभरानंतर राज्यात भगवी दिवाळी साजरी केली जाईल’ असे सांगत मी कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. कार्यक्रमात उपस्थित पदाधिका-यांनीही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी घोषणाबाजीही केली. आमच्या याद्या तयार आहेत, हवं तर मी आत्ता जाहीर करू शकतो. पण युतीमध्ये थोडी घासाघीस अद्यापही सुरु असल्याचे म्हणत ही दुर्देवाची बाब असल्याची खंत  उद्धव यांनी व्यक्त केली. युती टिकावी हीच माझी इच्छा आहे पण युती तुटलीच तर दुःखच होईल असे व्यक्त करत उद्धव म्हणाले की, सगळीकडे मोदी हटावचा नारा सुरु असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मोदींना पाठिंबा दर्शवला होता.  प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असतानाही वाद झाले पण त्यावेळी कोणीच जास्त ताणलं नाही, युती सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी झाली होती. देशात तुम्ही हवंतर राज्य करा, मात्र राज्यात आम्हाला त्रास देऊ नका. गेल्या २५ वर्षांचा उणीदुणी काढायच्या नाहीत, पण शिवसेनेला कस्पटासमान लेखणार असाल तर शिवसेनेचे वाघ तयार आहेत. ‘भाजपने दिलेला १३५चा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही. त्यांचा पक्ष वाढला तसा माझाही पक्ष वाढला आहे आणि आम्ही घेणारे नाही, देणारे आहोत. जागा आमच्याकडं आहेत, हे भाजपनं लक्षात ठेवावं, असं उद्धव यांनी ठणकावलं. ‘युती तुटो किंवा राहो, मी लढायला तयार आहे,’ असंही उद्धव म्हणाले.