आजही रस्ते, वीज, पाणी, नोकऱ्या याच विषयांवर  निवडणुका लढवल्या जात आहेत. हे प्रश्न अजूनही सोडवलेले गेले नाहीत. राज्यातील मंत्री इस्रायलमध्ये वाळवंटातील शेती पाहण्यासाठी जातात, पण इकडे राज्यात त्यांनी वाळवंट करून टाकला आहे, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी दर्यापूर येथील प्रचार सभेत केली. विदर्भातील या पहिल्या सभेत ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्यावर टीका केली, पण उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांनी अवाक्षरही काढले नाही. महाराष्ट्र क्रमांक एकवर असल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याची खिल्लीही त्यांनी उडवली. मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीतून आणलेले बुजगावणे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा नाही
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार असून दादर येथील शिवाजी पार्कवर पारंपरिक शस्त्रपूजा व सोने लुटण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे तेथे जाहीर सभा होणार नसून बोरिवलीच्या कोरा केंद्र मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवडणूक प्रचारसभा होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दरवर्षी काहीतरी संकट येत असते आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावून परवानगी आणावी लागते. यंदाचे हे शेवटचे वर्ष असे प्रत्येक वर्षी सांगितले जाते. त्याचबरोबर हा परिसर शांतता क्षेत्रात असल्याने जाहीर सभेच्या वेळी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल सभेच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो. हे सर्व टाळण्यासाठी दसरा मेळाव्याची जाहीर सभा आयोजित करण्याऐवजी पारंपारिक पध्दतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेने केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२७ लाखांची बेहिशोबी रोकड जप्त
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना शहरात काळ्या पैशांचे व्यवहार सुरू झाले आहेत. मुंबई पोलिसांनी मंगळवारी शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून २७ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथे नाकाबंदी सुरू असताना एक तरुण संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडे साडे बारा लाख रुपयांची रोकड आढळली. उत्तर प्रदेशातून मुंबईत व्यवसायासाठी ही रोकड आणल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याचा हिशोब व पुरावे तो देऊ शकला नसल्याने त्याला अटक करून ही रोकड जप्त करण्यात आली. मोहम्मद कुरेश (२४) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मालाड येथेही नाकाबंदी करून १२ लाख रुपयांची तर गोरेगाव येथे अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्य़ात शिक्क्याने मतदान?
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगाचीही झोप उडाली आहे. नांदेड जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदार संघात ६४ पेक्षा जास्त उमेदवार असून ही संख्या कायम राहिल्यास तेथे ईव्हीएमऐवजी जुन्याच म्हणजे मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घ्यावे लागेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर किती उमेदवार िरगणात राहतात त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली. नांदेड जिल्ह्य़ातील नांदेड दक्षिणमध्ये ९१, नांदेड उत्तरमध्ये ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता या भोकर मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत.
सावनेरच्या भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द
नागपूर : सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी हरकुंडे यांनी रद्द केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सोनबा मुसळे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. तर रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा अर्ज मात्र स्वीकृत केला. याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनीष अरविंद मोहोड यांनी सोनबा मुसळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता.