विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने अनेकांना धडा शिकविणारे ठरले आहेत. ज्यांनी आपल्या मुलांना बोट धरुन राजकारणात आणले, त्यांचा पराभव आणि मुलांचा विजय, असे चकवा देणारे निकाल पहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांचा विजय, हा असाच, मतदारराजाचा अजब न्याय ठरला आहे.  
लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने राजकारण गदागदा हालविले. वादळी वाऱ्याने पालापाचोळा उडून जावा तशी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली. त्यावेळी दोन्ही काँग्रेसने बडेबडे नेते मैदानात उतरवले होते. राष्ट्रवादीधील एक बडे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढविली होती, परंतु त्यात त्यांना पराभव पत्करा लागला होता. हार न मानणारे भुजबळ विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून लढले. त्यात त्यांचा विजय झाला आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनीही नांदगावमधून विजयश्री खेचून आणली. त्यामुळे भुजबळ पितापुत्रांचे राजकारण तरुन निघाले.
कोकणचे मालक आम्हीच अशा थाटात वावरणाऱ्या नारायण राणे यांना पहिला तडाखा लोकसभा निवडणुकीतच बसला होता. त्यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत राणे स्वत:  कुडाळ मतदारसंघात उभे होते आणि शेजारच्या कणकवली मतदारसंघात त्यांनी धाकटे चिरंजीव नितेश राणे यांचे राजकीय भवितव्य पणाला लावले होते. त्यात मुलाचा विजय झाला, परंतु राणे स्वत पराभूत झाले. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा ठेवून राजकारण कराणाऱ्या राणे यांचा पराभव धक्कादायक मानला जातो.