अचानक वाढलेला उष्मा आणि ‘ऑक्टोबर हिट’ची चाहूल या दोन्हींचा परिणाम विविध पक्षांचे नेते व उमेदवारांच्या प्रचारावर जाणवू लागला आहे. विदर्भात प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना याचा मोठा फटका बसला. प्रचाराच्या सभा लागल्या तरी त्यास फारशी गर्दीच न जमल्याचे चित्र होते. मुंबईतही वाढत्या उष्म्यामुळे प्रचाराचा जोर  ओसरल्याचे दिसून आले.
एकहाती सत्ता देण्यासाठी मतांचा जोगवा मागणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारी अमरावती जिल्ह्य़ात तीन सभा होत्या. विदर्भातील प्रचार दौऱ्यातील त्यांची पहिली सभा दर्यापूर येथे पार पडली. सभेची वेळ ११ वाजताची होती. राज ठाकरे अमरावतीत सकाळी ७ वाजताच पोहोचले. दर्यापूरला वेळेत पोहोचणे सहज शक्य होते, पण सभेला पुरेसे लोक जमलेले नाहीत, हे लक्षात घेऊन सभेला उशिरा पोहोचण्याचा निर्णय घेतला, पण कडक उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. दुपारी साडेबारा वाजता राज ठाकरे यांचे भाषण सुरू झाले. सभेला जमलेले लोक उन्हामुळे अस्वस्थ होते. राज ठाकरे फक्त २० मिनिटे बोलून दुसऱ्या सभेसाठी रवाना झाले. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर समोर जाण्यासाठी लोकांनी रेटारेटी सुरू केली. त्यामुळे काही काळ त्यांना भाषणही थांबवावे लागले. राज ठाकरे यांच्या सभेला साजेशी गर्दी झाली नाही, याची चर्चा नंतर सुरू झाली. वलगाव येथील सभेलाही फारशी गर्दी नव्हती. सभा उशिराच सुरू झाली. रणरणत्या उन्हात सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी डोक्यावर रुमाल बांधून भाषण ऐकण्याचा प्रयत्न केला. इतरांनी आडोशाला सावली शोधून त्यांचे बोल ऐकले. उपस्थितांसाठी अंथरलेल्या चटईवर सामावतील एवढेही लोक नव्हते. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तिवसा आणि अमरावतीच्या सभेतही फारशी गर्दी नव्हती. अमरावतीच्या नेहरू मैदानात याआधीच्या गडकरींच्या सभा गाजल्या आहेत. या सभेलाही लोक स्वयंस्फूर्तीने आले, पण त्यांची संख्या मात्र रोडावलेली होती. नवरात्रौत्सवामुळे गर्दी कमी झाल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. आता यापुढच्या सभांना गर्दी खेचण्यासाठी कोणते उपाय राबवायचे, याची चिंता उमेदवारांना भेडसावू लागली आहे.

चिखलीतील गडकरींची सभा फ्लॉप
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोमवारच्या चिखलीतील जाहीरसभेलाही थंड प्रतिसाद मिळाला.  रखरखत्या उन्हामुळे सभेसाठी आलेल्या लोकांचे हाल झाले. येथे कापडी सभामंडपाची व्यवस्था करण्यास भाजप अयशस्वी ठरला. गडकरींची जिल्ह्य़ातील पहिलीच सभा होती. त्या तुलनेत मंगळवारी मोताळा येथे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांची सभा प्रचंड गर्दी खेचून गेली. सभेसाठी मंडपाची व्यवस्था असल्याने लोक बराच काळ थांबलेले होते. खडसे यांनी योगेंद्र गोडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी शिवसेनेवरील टीका टाळली. काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांची चिखलीत प्रचंड जाहीर सभा झाली, तर बुलढाण्यात उमेदवारी अर्ज भरतांना काँग्रेस उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांनी जबर शक्तिप्रदर्शन केले. जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरी उन्हाच्या तडाख्यापासून कसा बचाव करायचा हा प्रश्न उमेदवार व पक्षकार्यकर्त्यांपुढे आहे.