भाजपच्या राज्यातील नेत्यांना महाराष्ट्रात अजून नरेंद्र मोदींची लाट असल्याचे वाटते आहे, तर मग प्रचारासाठी त्यांच्या इतक्या सभांची गरज काय, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विचारला. हा महाराष्ट्र आहे धृतराष्ट्र नाही. उघड्या डोळ्यांनी सर्वजण बघत आहेत, असाही टोमणा उद्धव ठाकरे यांनी भाजपला मारला.
नरेंद्र मोदी आणि आपले काही वाकडे नाही, असे स्पष्ट करून भाजपने आपल्यासोबतची युती का तोडली, त्यांनी हिंदूत्वाचे नाते का तोडले, हे अद्याप मला कळालेले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर जोपर्यंत आमच्यासोबतची युती को तोडली, हे भाजपचे नेते स्पष्ट करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी निवडणुकीनंतर गरज पडल्यास पुन्हा युती करण्याचा विचार आपण करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी नाती तोडणारा माणूस नाही. नाती जोडणारा असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, पंजाबमध्ये काय चालले आहे, हे तुम्ही बघता आहातच. हरियाणामध्ये काय झाले, हे सुद्धा तुम्ही पाहिले आहेच. मला युती तोडून कोणाचा पराभव करायचा नाही. मला जिंकायचे आहे.
राज ठाकरेंना फोन केला होता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना फोन केला होता, असेही उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, याबाबत आणखी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे आणखी एक नेते अनिल कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आपला पाठिंबा त्यांना जाहीर केला.