राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांची त्यांच्याच इस्लामपूर मतदारसंघात कोंडी करण्याचा माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा प्रयत्न बुधवारी फसला. उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या भीमराव माने आणि भाजपच्या विक्रम महाडीक यांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, कॉंग्रेसचे जितेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एकास एक उमेदवार देण्याची प्रतीक पाटील आणि राजू शेट्टी यांची खेळी पूर्णपणे फसली. त्यामुळे या मतदारसंघात आता जयंत पाटील, जितेंद्र पाटील आणि अभिजित पाटील अशी तिरंग लढत पाहायला मिळेल.
या मतदारसंघातील मतविभागणी टाळण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांना पाठिंबा देण्यात यावा, असा प्रयत्न प्रतिक पाटील आणि शेट्टी यांच्याकडून करण्यात येत होता. या दोघांनी या नव्या रणनितीबद्दल बुधवारी रात्री चर्चा केली. मात्र, अभिजित पाटील वगळता इतर सर्वच उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायला लावण्यात त्यांना अपयश आले.
सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, राजारामबापू बॅंक या माध्यमातून जयंत पाटील यांनी या मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला आहे. आता त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जयंत पाटील प्रचाराच्या काळात इतर मतदारसंघामध्येही जाता येणे शक्य होणार आहे.