लोकसभेच्या रणमैदानात तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्क्याने भाजपचे सुनील गायकवाड यांनी काँगेसचा परंपरागत गड उद्ध्वस्त केला. लोकसभेत सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपला आघाडी मिळाल्याने या सर्वच ठिकाणी विजयाची निर्णायक मोहोर उमटविण्याच्या दृष्टीने भाजप पुन्हा सज्ज आहे. तर आक्रमक प्रचार करीत विधानसभेच्या मैदानात लोकसभेचा वचपा काढायचे काँग्रेसने ठरवले आहे. गटा-तटांना तिलांजली देऊन सुभे एकसंध ठेवण्याचा काँग्रेसचा निश्चय आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादी, भाजप व अपक्ष प्रत्येकी एक आमदार आहे. लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघांत काँग्रेसचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. शिवसेनेची ताकद तोळामासाच आहे. अहमदपूर, लोहा वगळता राष्ट्रवादी दखलपात्र नाही.
लातूर शहर
२००९मध्ये फेररचना होऊन हा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. पहिल्याच लढतीत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. एक उमेदवार वगळता उर्वरित सर्वाच्या अनामत रकमा जप्त करून अमित ८९ हजारांनी विजयी झाले. काँग्रेसने पुन्हा अमित देशमुखांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले शैलेश लाहोटी, सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, राष्ट्रवादीचे मुर्तुजा खान, मनसेचे विनोद मालू असे ४० उमेदवार रिंगणात आहेत.
लातूर ग्रामीण
काँग्रेसने विद्यमान आमदार वैजनाथ शिंदे यांच्याऐवजी अ‍ॅड्. त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी दिली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ पुत्र धीरज यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न चालू होते. मात्र, त्याला यश आले नाही. भाजपतर्फे गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले रमेश कराड पुन्हा रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने त्र्यंबक भिसे यांची भावजय आशा भिसे यांना उमेदवारी दिली. मनसेचे संतोष नागरगोजे, शिवसेनेचे हरी साबदे असे  २५ जण आहेत.
निलंगा
गेल्या वेळी शिवाजीराव निलंगेकर हे नातवाचा पराभव करून विजयी झाले. या वेळी काँग्रेसने निलंगेकर यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अशोक पाटील यांना, तर भाजपने निलंगेकरांचे नातू संभाजी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांना ऐन वेळी उमेदवारी देऊन लढतीत रंग भरले. मनसेचे अभय साळुंके, महाराष्ट्र विकास आघाडीचे लिंबन रेशमे, जनसुराज्यचे माधव पाटील टाकळीकर यांच्यासह १९ जण रिंगणात आहेत.
उदगीर
राखीव मतदारसंघातून भाजपचे सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीचे मच्छिंद्र कामत यांचा पराभव करून विजय संपादन केला होता. या वेळी भाजपने भालेराव यांना पुन्हा उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने उमेदवार बदलून प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांना उमेदवारी दिली, काँग्रेसने प्रा. रामकिशन सोनकांबळे व शिवसेनेने राम अदावळे यांना रिंगणात उतरविले. तब्बल २६ जण नशीब अजमावत आहेत.
अहमदपूर
अपक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांना राष्ट्रवादीने प्रवेश देऊन मैदानात उतरविले. त्यांच्या विरोधात परंपरागत लढत देणारे विनायकराव पाटील यांनी महायुतीत ही जागा रासपकडे जाईल, म्हणून या पक्षात प्रवेश घेतला. मात्र, भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपने प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल माकणे यांना मदानात उतरवले. शिवसेनेने अशोक मुंडे यांना उमेदवारी दिली. १८ जण रिंगणात आहेत.