केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या पुन्हा संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली. परिणामी राष्ट्रवादीसमोर जागा टिकवण्याचे आव्हान असेल. लोकसभेत शरद पवार व अजित पवार यांनी सत्तेची सारी ताकद पणाला लावली, तरी गोपीनाथ मुंडे दीड लाख मतांनी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांसह कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास डळमळल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या ६ मतदारसंघांसह लोकसभा पोटनिवडणुकीचेही मतदान होत असल्याने भाजपाला सहानुभूतीच्या लाटेचा दुहेरी फायदा होईल, असा नेत्यांचा दावा आहे. मात्र, ४ मतदारसंघांत इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवार निवडीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. महायुतीचा घोळ मिटत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
राष्ट्रवादीच्या विद्यमान ५ आमदारांनी उमेदवारी गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. सहापकी आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या एकमेव परळी मतदारसंघावरही राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी, तर युतीत शिवसेनेकडे असलेल्या बीड मतदारसंघावर शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दावा ठोकला. त्यामुळे जागांची अदलाबदल, हा चर्चेचा विषय आहे. मात्र, मित्रपक्षांच्या अतिक्रमणामुळे जिल्हय़ात शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांवर ‘बेघर’ होण्याची वेळ आली आहे!
मागील वेळी विधानसभेच्या सहापकी पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीने विजय मिळवला. जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके व सुरेश धस या तिघांना मंत्रिपदाची संधी मिळाली. मात्र, सत्तेच्या पाच वर्षांत दृश्य स्वरूपातील सार्वजनिक कामे न दिसल्यामुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध नाराजीचा सूर
आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातील सदस्याविरुद्ध राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, असे शरद पवार यांनी पूर्वीच जाहीर केले. आमदार पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात राहण्याचा मनोदय व्यक्त केल्याने मुंडे यांची दुसरी कन्या डॉ. प्रीतम खाडे भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार असतील का, याची उत्सुकता आहे.
परळी
गोपीनाथ मुंडे यांनी सलग ५ वेळा प्रतिनिधित्व केलेल्या परळी मतदारसंघातून मागील वेळी त्यांची कन्या पंकजा मुंडे निवडून आल्या. मुंडे कुटुंबातील फाटाफुटीनंतरही लोकसभेत या मतदारसंघातून २५ हजारांचे मताधिक्य मिळवून मुंडेंनी वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून सोडवून घेत नशीब अजमावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बहीण-भावात लढत होण्याची शक्यता आहे.
बीड
युतीत शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात सेनेने तीन वेळा विजय मिळवला. मागील वेळी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ७५ हजारांच्या मताधिक्याने ही जागा खेचून घेतली. पण लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाला ५ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सेनेच्या आशा पल्लवित झाल्या. महायुतीतील आमदार विनायक मेटे यांनी हा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी मागितला आहे. सेनेकडून संभाव्य उमेदवार जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तयारी सुरू केली आहे. पाच वर्षांत क्षीरसागर शहराच्या वळण रस्ता व इतर प्रमुख सार्वजनिक प्रश्न सोडवण्यात यशस्वी न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर असला, तरी महायुतीतील एकत्रीकरणावरच निकाल अवलंबून आहे.
आष्टी
राष्ट्रवादीचे नेते, राज्यमंत्री सुरेश धस सलग ३ वेळा प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघातून लोकसभेला स्वत उमेदवारी करताना भाजपाला ८ हजारांचे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे दोन्ही माजी आमदार भाजपात गेल्याने धस एकाकी पडले.
माजलगाव
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सलग ३ वेळा विजय मिळवलेल्या या मतदारसंघातून लोकसभेत भाजपाला तब्बल ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाला विजय मिळेल, असे चित्र निर्माण झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली. राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने तेही दावेदार झाले आहेत. आर. टी. देशमुख, गंगाभीषण थावरे इच्छुक असल्याने उमेदवारीवरच निकालाचे भवितव्य ठरणार, हे मात्र निश्चित.
केज
विमल मुंदडा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांनी निसटता विजय मिळवला. लोकसभेत या मतदारसंघातून ३० हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजपाला विजयाची खात्री आहे. भाजपातर्फे संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, बाबूराव पोटभरे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीकडून अक्षय मुंदडा यांची पत्नी नमिता यांना उमेदवारीची शक्यता आहे. रमेश आडसकरांच्या पक्षांतरामुळे या राष्ट्रवादीला विजयासाठी शिकस्त करावी लागणार आहे. केज
विमल मुंदडा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांनी निसटता विजय मिळवला. लोकसभेत या मतदारसंघातून ३० हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजपाला विजयाची खात्री आहे. भाजपातर्फे संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, बाबूराव पोटभरे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीकडून अक्षय मुंदडा यांची पत्नी नमिता यांना उमेदवारीची शक्यता आहे. रमेश आडसकरांच्या पक्षांतरामुळे या राष्ट्रवादीला विजयासाठी शिकस्त करावी लागणार आहे.
गेवराई
राष्ट्रवादीचे बदामराव पंडित प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघातून लोकसभेत भाजपाला तब्बल ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले. आमदार अमरसिंह पंडित व बदामराव हे एकाच पक्षात असताना भाजपाला मताधिक्य मिळाल्याने या मतदारसंघावरील पंडितांची पकड सल झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीकडून बदामराव पंडित, तर भाजपाकडून अ‍ॅड. लक्ष्मणराव पवार लढाईच्या तयारीला लागले आहेत. या मतदार संघावर वर्षांनुवष्रे पंडितांचा प्रभाव राहिला.