विधानसभा निवडणूकीचा निकाल हाती आला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्याखालोखाल शिवसेना आणि अनुक्रमे कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांचे उमेदवार निवडून आले आहेत. जवळपास वीस वर्षांनी स्वबळावर लढल्यानंतर प्रत्येक पक्षाला आपली ताकद कळली आहे. परंतु कुणालाच बहुमत नसल्याने राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा युती किंवा आघाडी होणार का?, सरकार कोण स्थापन करणार?, मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना ऊत आला आहे. या सगळ्याचे विश्लेषण केले आहे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी.  

मनसे : लोकसभेत माघार, विधानसभेत हद्दपार!
‘लोकांना गृहीत धरू नका’ असे भाषणात वारंवार सांगणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अजिबात गृहीत न धरल्यामुळे मनसेचा मुंबईसह महाराष्ट्रात धुव्वा उडाला. शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे थोडीशी आशा मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र ‘देशात राष्ट्रीय पक्ष आणि राज्यात प्रादेशिक पक्षांना विजयी करा,’ असे आवाहन करत, यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या मनसेला मतदारांनी विधानसभा निवडणुकीतूनही हद्दपारच केले. दोनशेपेक्षा जास्त जागा लढविणाऱ्या मनसेला जुन्नरमध्ये शरद सोनावणे यांच्या रूपाने एकमेव विजय मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या बाबतीत अतिशय सावध भूमिका घेतली. प्रचाराच्या काळात शिवसेनेवर टीका करणार नाही, असे आम्ही ठरवले होते. ते पथ्य पाळले. तेव्हा आणि आतासुद्धा शिवसेनेला आम्ही विरोधक समजत नाही. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी युतीच्या मुद्दय़ावर विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले. या वेळी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, कारण सर्वात जास्त संख्याबळ भाजपकडे आहे, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.