विदर्भातील ६२ पैकी तब्बल २६ मतदारसंघांमध्ये मतदारांनी प्रथमच निवडणूक लढविणा-या उमेदवारांना पसंती दिली आहे. पहिल्याच लढाईत मैदान मारणा-या या नवीन चेह-यांमध्ये २३ उमेदवार हे एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहें. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बरोबरीने शक्य तेथे नवा चेहरा देण्याच्या पक्षाच्या व्यूहरचनेला मतदारांनी साथ देत या नवीन उमेदवारांना पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे.
प्रथमच निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये अमरावती जिल्हयातील मेळघाटमधील प्रभुदास भिलावेकर व दर्यापूरमधून रमेश बुंदेले, बुलडाण्यातील खामगावमधून आकाश फुंडकर तर अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर विजयी झाले आहेत. वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथून समीर कुणावार व वर्धा येथून पंकज भोयर, गोंदियातील तिरोडामधून विजय रहांगडाले तर आमगावमधून संजय पुराम, भंडारा जिल्हयातील भंडारामधून रामकृष्ण अवसरे, तुमसरमधून चरण वाघमारे व साकोलीतून बाळा काशीवार विजयी झाले आहेत. गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली मधून डॉ देवराव होळी, आरमोरीमधून कृष्णा गजबे व अहेरीमधून अंबरीशराव महाराज या नव्या चेह-यांनी विजय प्राप्त केला आहे. यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथून राजेंद्र नजरधने, आर्णी येथून प्रा. तोडसाम, वणीमधून संजीव बोदकुरवार तर राळेगाव येथून अशोक उईके विजयी झाले आहेत तर चंद्रपूर जिल्हयातील चिमूरमधील मितेश भांगडिया यांनी पहिल्यांदा विजय मिळवला आहे. नागपूर जिल्हयातील नागपूर दक्षिणमधील सुधाकर कोहळे, काटोलमधून आशिष देशमुख, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, उत्तर नागपुरातून डॉ मिलींद माने व हिंगणामधून समीर मेघे यांनी बाजी मारली आहे.
अन्य पक्षातील प्रथमच विजयी होणा-या उमेदवारांमध्ये सिंदखेडराजामधून शिवसेनेचे शशिकांत खेडेकर, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा मतदारसंघातून शिवसेनेचे बाळू धनोरकर तर बुलडाण्यातून कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदाच विजय संपादन केला आहे. ज्या दिग्गजांचा या तरुण तुर्कानी पराभव केला आहे त्यात शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, अभिजीत अडसूळ, संजय देवतळे, अशोक शिंदे, धर्मरावबाबा आत्राम, नितीन राऊत, अनिल देशमुख आदींचा समावेश आहे.