भाजप-शिवसेनेत सरकार स्थापनेवरून चाचपणी सुरू असतानाच, राज्यात आता आम्हीच मोठे भाऊ आहोत, असे वक्तव्य भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी केले आहे. जनमताचा कौल पाहता इतरांनी आपणच मोठा भाऊ आहोत असे समजू नये असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला.
महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. जनमताचा कौल ध्यानात घेऊन कोणा एका व्यक्तीने किंवा पक्षाने स्वत:ला मोठे समजू नये. सध्याच्या स्थितीत आम्हीच मोठा भाऊ आहोत, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीसाठी उपमुख्यमंत्रिपद किंवा गृह, अर्थ, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग ही महत्त्वाची खाती मागितल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. उद्धव यांनी निकालानंतर अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा तसेच मलाही दूरध्वनी केला असे माथूर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेणार काय असे विचारता याबाबत केंद्रीय संसदीय मंडळ निर्णय घेईल असे माथूर यांनी स्पष्ट केले. आम्हाला बहुमतासाठी काही जागा कमी पडत असल्याने काही पक्ष पाठिंब्यासाठी पुढे येणे स्वाभाविक आहे, मात्र संसदीय मंडळच निर्णय घेईल, असे माथूर यांनी सांगितले.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत घेण्यास प्राधान्य – जेटली
नवी दिल्ली : शिवसेना हा आमचा जुना मित्र आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी त्यांची मदत घेण्यास प्राधान्य दिले जाईल, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. मात्र यात काही अडचण आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला असल्याचे सांगत हाही पर्याय खुला ठेवला आहे. महाराष्ट्रात सरकारस्थापनेवरून अजून संभ्रम  आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करणारा दूरध्वनी केला होता. त्यावरूनच जुने मित्र पुन्हा एकत्र येण्याचे हे संकेत आहेत, असे जेटली यांनी स्पष्ट केले.  शिवसेनेशी अजून विशेष चर्चा झाली नसल्याचे त्यांनी मान्य केले. केंद्रात शिवसेना आमच्याबरोबर सत्तेत आहे. तर मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र आहेत. त्यामुळे दोन स्तरांवर एकत्र आहोत. निकालानंतर आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले आहे. याबाबत काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे जेटली यांनी सांगितले.