पहिली घंटा झाली आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. तारखेसंबंधी उत्कंठा चांगलीच ताणली गेली होती. अखेर १५ ऑक्टोबर ठरली. पत्नीच्या डिलिव्हरीची तारीख ऐकणारा पती आणि निवडणुकीची तारीख ऐकणारा नेता यांची उत्सुकता समानच असते. निवडणुकीची समीकरणं जुळवण्यापासून ते विजय मिरवणुकीच्या स्वप्नरंजनात रममाण होणे इत्यादी सगळ्या भावना तो नेता एका क्षणात जगतो. आता दुसऱ्या घंटेची म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा. मग तिसरी घंटा म्हणजे प्रत्यक्ष मतदान.
या वर्षी महाराष्ट्रात चार जंगी उत्सवांची मेजवानी आहे. लोकसभा निवडणूक, गणेशोत्सव मग विधानसभा आणि पाठोपाठ दिवाळी. कार्यकर्त्यांची चैनच चैन झाली आहे. ज्यांचे उमेदवार जिंकतील त्या कार्यकर्त्यांची दणक्यात दिवाळी होणार.
मागच्या आठवडय़ाच्या ओपिनीयन पोल वरून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे भाकीत केले आहे. महायुतीला महाबहुमत वर्तवण्यात आले आहे. सामान्य जनतेला कोण जिंकला, कितीनी जिंकला, किती मतदान झाले या निवडणूक संख्याशास्त्रात रस राहिलेला नाही. सत्तांतर होताना जीवनमानात परिवर्तन होतेय का एवढय़ा साध्या अपेक्षेने मतदार चिंतित आहे. काय मागतोय महाराष्ट्राचा मतदार नवीन सत्तेकडून –
१) मुलं संध्याकाळी अभ्यासाला बसल्यावर मेणबत्या शोधाव्या लागू नयेत.
२) प्रत्येक शेताला आणि प्रत्येक घराला हक्काचे किमान पाणी मिळावे. ते घर कोणाचे मतदार आहे हे न बघता.
३) दुय्यम निबंधकाच्या कचेऱ्यांमध्ये अ‍ॅग्रीमेंट झाल्याबरोबर लगेच ओरिजनल डॉक्युमेंट कुठल्याही खर्चाशिवाय मिळावे.
४) प्रत्येक चौकात वाहतूक हवालदार असावा आणि योग्य वेळात इच्छित स्थळी पोहोचता यावे.
५) स्कॉर्पिओ, झायलो वाल्या भाऊंनी अंगावरून गाडय़ा नेऊ नयेत.
६) झाडावरची फळे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी काढून न्यावीत, तशी स्त्रियांची मंगळसूत्रे चोरसाहेबांनी दिवसाढवळ्या नेऊ नयेत.
नेल्यास पोलिसांनी दोन दिवसांत परत मिळवून द्यावीत. मागे एकदा मुंबईतील भिकारी वर्षांला ५०० कोटी मिळवतात, असा आकडा आला होता. सोने चोरणाऱ्या इसमांनी ठरवले, तर एक देशस्तरीय बँक चालवू शकतील.
७) वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, सर्टिफिकेट मिळवण्याकरिता अजिबात खेपा घालाव्या लागू नयेत.
८) टेकडय़ांवर हिरवळ दिसावी. सिमेंट-चुना नव्हे.
९) रस्ते गुळगुळीत असावे. अस्थिशल्य विशारदांबरोबर संधान बांधल्यासारखे रस्ते बनवू नयेत.
१०) मैदाने मुलांच्या पायाखाली असावीत, बिल्डरच्या घशाखाली नाही.
११) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वक्तशीर, आरामदायी, विसंबून राहण्यासारखी असावी.
अशा काही अगदी सामान्य अपेक्षा मतदार बाळगून आहे. तो स्वर्ग मागत नाहीये. शाळेत जाणारा मुलगा बाबांना गणवेश, वह्य़ा, पुस्तकं, पेन, पेन्सिल या मूलभूत गोष्टी मागतो तसा बिचारा मतदार त्याचे दैनंदिन जीवन तणावमुक्त व्हावे इतकेच मागणे मागतो आहे. छोटे व्यावसायिक, कारखानदार यांच्या मागण्या देखील अवास्तव नाहीत. सर्वाना चिंतामुक्त, काळजीविरहित, भयमुक्त जगायचे आहे. कोणीही येवो एवढा बदल व्हायलाच हवा याविषयी दुमत नसावे.
टिळा बदलला पण गळा कापला तो कापलाच; हे होऊ नये. बास एवढेच.
– रवी पत्की
sachoten@hotmail.com