विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कोणत्या राजकीय पक्षाकडे राहिल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सत्तास्थापनेत कशी राजकीय समीकरणे तयार होतील यावर विरोधी पक्षनेतेपद ठरणार आहे.
सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असा क्रम लागतो. सत्ता स्थापनेसाठी भाजपला कोण मदत करते यावर सारे अवलंबून आहे. भाजप आणि शिवसेना हे जुने नैसर्गिक मित्र एकत्र आल्यास तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचा या पदासाठी दावा असेल. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी असे समीकरण तयार झाल्यास विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाईल. भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले तरीही विरोधी पक्षनेतेपद तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसकडे जाईलच असे नाही. कारण काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला एकच जागा कमी मिळाली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आघाडी केलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन आमदार निवडून आले आहेत. निवडणूकपूर्व आघाडीच्या आधारे काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ आहे या मुद्दय़ावर राष्ट्रवादी या पदावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रापाठोपाठा राज्यातही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे.