घरात अगदी गडबड चालली होती. अरुण आणि वरुणची बॅग आवरण्यात आईची धांदल उडाली होती. खरे तर एवढय़ा छोटय़ा मुलांना सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात पाठवायला ती राजी नव्हती. आणि तेही एकदम आठवडाभर! दुसरीत तर आहेत दोघे! कसे राहतील एकटे? पण त्यांच्या वर्गशिक्षिकेनं तिला समजावलं होतं. ‘‘व्यवस्थित राहतात मुलं अगदी. शिवाय जिथे जाणार आहेत तिथले पालकही सांभाळून घेतात त्यांना. आता जूनमध्ये तिकडची दोन मुलं तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्हीही त्यांची काळजी घ्यालच ना? तसंच! काही चिंता करू नका. अरुण आणि वरुण एकदम व्यवस्थित राहतील. छान मजाही करतील. आणि खूप काही शिकूनसुद्धा येतील.’’ शेवटी मनाची तयारी करून तिने होकार दिला होता.
घरातून बाहेर पडताना दोघांनी आजोबांना कडकडून मिठी मारली. त्यांना आजोबांचा अतिशय लळा होता. हे आजोबा म्हणजे खरे तर त्यांचे सख्खे आजोबा नव्हते. त्यांचे दोन्ही- कडचे आजी-आजोबा ते जन्माला यायच्या आधीच वारले होते. अरुण-वरुण एकच वर्षांचे असताना बाबांच्या जुन्या मित्राची आई वारली. मित्र परदेशी होता. तिथल्या हवेशी आणि परदेशी सुनेशीही त्याच्या बाबांचे जमले नाही. ते परत आले आणि एकटेच राहिले. तेव्हा बाबांनीच त्यांना त्यांच्याकडे बोलावून घेतले. आपल्या मुलांना आजोबा नाहीत याचे दु:ख त्यांना तसेही होतेच. आत्ता त्या दोघांनी आजोबांना मारलेली घट्ट मिठी बघून त्यांना भरून आले. बरे झाले आजोबांना घरी घेऊन आलो.. असे परत एकदा वाटून गेले. पटकन् त्यांनी क्लिक् करून ती गोड मिठी फोनमध्ये जपून ठेवली.

र्वष भराभर उलटत गेली होती. बघता बघता अरुण आणि वरुण नववीत पोचले होते. ते आज त्यांच्या मित्राकडे अभ्यासाला गेले होते आणि तिकडेच राहणार होते. झोपताना बाबा अस्वस्थ होते. सगळं आटपून झाल्यावर आईने विचारलं, ‘‘आज कसल्या तरी चिंतेत दिसताय?’’
‘‘हं..’’ बाबा म्हणाले, ‘‘आजोबांची काळजी घेणं हळूहळू अवघड होत चाललंय ग.’’
‘‘का बरं, काय झालं?’’
‘‘आता तेरा र्वष झाली ग त्यांना. त्यांचे पार्ट्स मिळणं खूप अवघड होत चाललंय. मला भयंकर ताण येतो त्यांना तपासणीला घेऊन जाताना. मागच्या वेळी एक-दोन पार्ट्स मिळतच नव्हते. मग कितीतरी प्रयत्न करून कुणाकडून तरी वापरलेले पार्ट्स मिळवावे लागले. प्रत्येक वेळी ते मिळतीलच असं नाही.’’
‘‘पण कितीतरी दुकानं, कंपन्या आता यंत्रमानव वापरतात की! त्यांना अशी अडचण येत नाही? ’’
‘‘अगं, सगळेजण चार-पाच र्वषच वापरतात. आजकाल तर चार वर्षांतच पूर्ण डेप्रिसिएशन दाखवतात. आणि बहुतेक सर्वजण स्टील फिनिश वापरतात ना! स्किन फिनिश कुणीही वापरत नाही. एजिंग स्किन तर त्याहून कमी वापरली जाते. आता या मॉडेलशी कॉम्पॅटिबल पार्ट्स मिळणं खूप अवघड झालंय. त्यातून आपलं मॉडेल मेड-टू-ऑर्डर आहे. इतरांना काय, बंद पडलं तर उघड उघड दुरुस्तीला नेता येतं. आपल्याला तीही सोय नाही. अचानक काहीतरी बंद पडलं तर मुलांना कळेल ना!’’
आईपण विचारात पडली. ‘‘मग आपण मुलांना सांगूनच टाकूयात ना- म्हणजे मग सारखं टेन्शन नाही.’’
‘‘नको! सहन नाही होणार त्यांना! लहानपणापासून ‘आजोबा.. आजोबा’ करत त्यांच्यामागे असतात.’’
‘‘पण आता कमी झालंय जरा त्यांचंसुद्धा. मोठे झाले आहेत ते आता. घेतील दोघं समजून.’’
‘‘नाही.. नाही. भयंकर मोठा धक्का बसेल त्यांना. अगं, एक वर्षांचे असल्यापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेत ते. आठवतं तुला- लहानपणी किती वेळा घोडा घोडा खेळायचे. गोष्टी ऐकायचे. लपाछपी खेळायचे. मग आजोबांबरोबर कॉम्प्युटर गेम्स खेळायचे. फिरायला जायचे. मग चक्क त्यांच्याबरोबर अभ्याससुद्धा करायचे. आता जरी ते आजोबांबरोबर खेळत नसले तरी खूप लळा आहे दोघांना आजोबांचा.’’
‘‘आणि काळजीही.’’ आई म्हणाली- ‘‘जेवताना आठवणीनं त्यांना बोलावतात. सकाळी त्यांच्या हातात पेपर आणून देतात. नवीन माहिती कळली की त्यांना सांगतात. बरोबर आहे.. कळता कामा नये त्यांना.’’
‘‘होय. मी ऑफिसमध्ये एकाशी बोलतो आणि काही सुचतं का बघतो.’’

जेमतेम आठवडा झाला असेल, शाळेत अरुण-वरुणला सरांनी वर्गाबाहेर बोलावून घेतलं. त्यांना थोडे पैसे देऊन लगेच आधार हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. आई-बाबांचा फोन आला होता. आजोबांना काहीतरी झालं होतं. आधार हॉस्पिटल डॉ. गुप्तांचं.. त्यांच्या फॅमिली डॉक्टरचं छोटं हॉस्पिटल होतं. बाबांना मोठी हॉस्पिटल्स आवडत नसत. नुसते पैसे उकळायला बसलेले असतात सगळे.. असं त्यांचं मत होतं. त्यामुळे ते शक्यतोवर डॉ. गुप्तांकडेच जात. दुर्दैवाने अरुण-वरुण तिथे पोहोचेपर्यंत आजोबा गेलेले होते. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता.

आजोबांना जाऊन आज एक वर्ष झालं होतं. त्यामुळे घरात जरा नरम वातावरण होतं. बाबा खोलीत वाचत बसले होते. अरुण आणि वरुणसुद्धा त्यांच्या खोलीत होते. मुलांशी जरा बोलावं म्हणून आई त्यांच्या खोलीजवळ गेली तर तिला ऐकू आलं..
‘‘आजोबांना ऑफ करून आज र्वष झालं रे.’’
न राहवून आई लगेच खोलीत गेली. मुले एकदम गप्प झाली. ‘‘काय म्हणालास आत्ता वरुण?’’ तिनं विचारलं. दोघंही काही बोलेनात. शेवटी काही इलाज नाही म्हटल्यावर हळूहळू ते जराशानं बोलायला लागले.
‘‘आई, आम्हाला माहितीय, की आजोबांना हृदयविकाराचा झटका नव्हता आला.. त्यांना ऑफ केलं होतं. ते यंत्रमानव होते.’’
आता गप्प बसण्याची पाळी आईची होती. शेवटी धीर धरून तिनं विचारलं- ‘‘कसं कळलं तुम्हाला? आणि केव्हा?’’
‘‘आई, आठवतंय- आम्ही दुसरीत सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात आठवडाभर गेलो होतो ते? तिथं आम्हाला पहिल्यांदा जाणवलं, की आपले आजोबा वेगळे आहेत. त्यांच्या वागण्यातले काही फरक आम्हाला तिथे कळले.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे तिथले जे आजोबा होते ना, ते थोडे वेगळे वागायचे. म्हणजे आम्ही मुलं त्यांच्याबरोबर खेळायला गेलो तर ते नेहमी खेळायचेच असं नाही. कधी कधी ‘आत्ता मला झोपायचं आहे,’ असं म्हणायचे. आम्ही मुलं खेळताना ओरडलो की त्यांना त्रास व्हायचा. ते कधी कधी त्यांच्या गोळ्या घ्यायला विसरायचे. आपल्या आजोबांचं असं कधीच व्हायचं नाही. पहिल्यांदा आम्हाला वाटलं, की ते आजोबा जरा वेगळे आहेत. पण तिथे आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तिथल्या आजीसुद्धा तिथल्या आजोबांना गोळ्या घेण्याची आठवण करत होत्या. आपल्याकडे असं कधीच बघितलं नव्हतं. आणि तुमच्या वागण्यातला फरकसुद्धा आम्हाला जाणवे.’’
‘‘आमच्या वागण्यातला फरक?’’
‘‘हो. तिथे आजोबांनी टीव्ही लावला असेल तर तिथले आई-बाबा आम्हाला लांब जाऊन खेळायला सांगायचे. आम्ही तेव्हाच कार्टून लावायचा प्रयत्न केला तर रागवायचे. आजोबा झोपले असतील तर गप्प बसायला सांगायचे. आपल्याकडे असं व्हायचं नाही.’’
‘‘हो, आणि आपले आजोबा पूर्वीच्या आठवणी सांगायचे. पण त्या सांगताना तिथल्या आजोबांना खूप छान वाटायचं तसं आपल्या आजोबांना नाही वाटायचं. आणि आपल्या आजोबांना कधी कुठली गोष्ट अर्धवट आठवायची नाही. त्यांना एकतर एखादी जुनी आठवण माहीत असायची किंवा नसायची. तिथल्या आजोबांना काहीतरी धूसर आठवायचं. मग त्याविषयी बोलायला लागले की कधी थोडं जास्त आठवत जायचं.’’
‘‘आणि आई, आम्ही त्या आजोबांच्या खोलीत दोन रात्री झोपलो. दोन्ही रात्री ते उठून बाथरूमला जाऊन आले. आपल्या आजोबांबरोबर आम्ही किती वेळा झोपलोय. पण ते एकदाही गेले नाहीत असे.’’
‘‘शिवाय बाबा ‘अपोलो रोबोटिक्स’मध्ये! तरी खात्री नव्हती. मग आम्ही बाकी आजोबांचं जरा जास्त निरीक्षण केलं आणि आम्हाला नक्की कळलं. बाबांनी आणि अपोलोनी आजोबांना खूप खऱ्यासारखं बनवलं. पण त्यांच्यात पुरेसे बारीकसारीक दोष घातले नाहीत. त्यामुळेच आम्हाला कळलं.’’
पाच मिनिटं आई काही बोलली नाही. मुलं किती हुशार आणि शहाणी आहेत याचा तिला अभिमान वाटला. विचार करून मग ती म्हणाली, ‘‘चला, आपण बाबांना सांगू या.’’
‘‘नको! सहन नाही होणार त्यांना!’’ दोघेही एकदमच म्हणाले.

– पराग देऊसकर
deuskars@gmail.com