लोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच. कोणी सीरियलच्या कास्टिंगवर बोलत होतं, तर कोणी अ‍ॅड फिल्मच्या स्क्रिप्टवर. इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे विद्याला सोयीचं पडणार होतं. ती बिचारी ओपीडी आटोपून संध्याकाळच्या क्लिनिकला जायच्या आधी येणार होती. क्लिनिक इथेच. राहते पण इथेच.. लोखंडवालाला. म्हणूनच एक तास काढून साडेचारला येणार होती.
पंधरा मिनिटं होऊन गेली. म्हणजे आपल्याला पाऊण तासच मिळणार तिच्याबरोबर.. आणि सांगायचं इतकं काही आहे.. अलकाच्या डोक्यात विचार चालू होते.
भर्रकन् वळण घेऊन एक लाल गाडी समोर लागली तसा अलकाने नि:श्वास टाकला. आली!
‘‘ऑर्डर केलंयस का काही?’’ हातातले सनग्लासेस टेबलवर टाकत विद्याने झपझप बोलायला सुरुवात केली.
‘‘कर कसलीही कॉफी आणि बोलू या लगेच..’’ संभाषणाची सूत्रं हातात घेत अलका म्हणाली.
‘‘ओके. बोल. सायलीबद्दल ना?’’ सवयीने विद्याने आपले लांब केस एका बाजूने खांद्यावर पुढे आणले आणि तिने मोबाइलवर मेसेजेस चेक करायला सुरुवात केली.
‘‘अगं, असं इथे बसून बोलताना खूप अवघड वाटतंय. थोडक्यात सांगते. तिचं वागणं बदलायला लागलं आहे. खूप बेफिकिरीने वागते. मुख्य म्हणजे तिला पैशांची अजिबात तमा नाही.’’
‘‘ती आता चौदा वर्षांची आहे. बरोबर? हॉर्मोन्स- आणखी काय! डोन्ट वरी!’’
‘‘डोन्ट वरी काय? मी इथे एकटी कमावतेय. मलाही कितीतरी आघाडय़ांवर लढायचं असतं.’’ अलकाने समोर आलेल्या कॉफीत साखर पेरत आपल्या मोबाइलवर एक नजर टाकून घेतली.
‘‘ठीक आहे. काही बॉयफ्रेंड ट्रबल नाही ना?’’
‘‘अजून तरी नाही वाटत. आणि टीनएज वगैरे सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आईचं ऐकायचं नाही, बंडखोरी करत बसायचं- वगैरेच्या पलीकडचं सांग काही..’’
‘‘ठीक आहे. पैसे खूप उडवते का? तेवढाच प्रॉब्लेम आहे का?’’
‘‘नाही गं. मागच्या महिन्यातली गोष्ट. ऑनलाइन होती. हाका मारून मला बोलावून घेतलं. जाऊन बघते तर तिला एक ड्रेस घ्यायचा होता आणि मला क्रेडिट कार्ड वापरून पे करायला सांगत होती. मी रागावले. विचारलं- तुला तुझं डेबिट कार्ड दिलेलं आहे ना? मी महिन्याला तुझ्या अकाऊंटमध्ये आठ हजार भरते ते? तर म्हणते की, मी मागच्या महिन्यात एका साइटवर वापरलं, ते हॅक झालं. मी एकदम पेटून उठले. हॅक झालं? आणि ते मला कधी सांगणार? कार्ड ब्लॉक नको करायला? तर म्हणाली की, विसरलेच. ते जाऊ दे. पण हा ड्रेस घे नं- पे करशील ना?’’
‘‘ओह!’’
‘‘आणि कितीतरी किस्से सांगू शकेन.’’ अलका हताश होऊन म्हणाली.
‘‘ती निष्काळजी आहे की खरोखरच विसरते? तिच्या बाजूने पण विचार करायला हवा.’’
‘‘तेवढंच नाही गं, त्या दिवशी मैत्रिणीकडे जाते म्हणून निघाली. मी वर बाल्कनीतून पाहत होते. खाली उतरली ती गेटपाशीच थांबली. भांबावून. पुतळ्यासारखी. शेवटी मी खाली गेले आणि हलवून विचारलं तेव्हा झोपेतून जागी झाल्यासारखी बघायला लागली. मी घाबरले खूप अगं.’’
‘‘एकेकदा ब्लँक होते. काही दिवशी खूप खाते, तर काही वेळा जेवण स्किप करते. कधी कधी तब्येत एकदम बिनसते. दुलईत तोंड खुपसून पडून असते दिवसभर घरी. मी दमून आले तर या बाई म्हणतात, शाळेत गेलेच नाही म्हणून! दहावी आली आता. करू तरी काय मी?’’
विद्या सावधपणे म्हणाली, ‘‘असं करू या का- एकदा तिला माझ्या क्लिनिकवर आण.’’
‘‘ऐकत नाही गं ती. खूप भडकते एकदम कधी कधी. मी अशी कधीच नव्हते.’’ आणि अचानक अलका चपापली. मग विद्याची नजर टाळत ती उगीचच हातातल्या मोबाइलशी खेळ करायला लागली.
‘‘काही चेकअप्सना ती तयार होणार नाही. हो ना? काहीतरी युक्ती करायला हवी.’’ विद्या काळजीने म्हणाली, ‘‘आणि सॉरी. हा विषय काढतेय, पण प्रभातशीसुद्धा बोलायला हवं.’’
‘‘का?’’
‘‘अगं, तुम्ही नसाल राहत एकत्र; पण ती त्याची पण मुलगी आहे ना? का गं? एकदम काय झालं?’’
आपले पाणावलेले डोळे पुसत अलकाने फक्त मान हलवली.
‘‘ओके.. ओके.’’ आजूबाजूला पाहत विद्याने सावरून घेतलं. ‘‘लेट्स टॉक डिटेल्स लेटर. मात्र एक- तिला सांभाळून घे. ओरडू नकोस. आपल्याला तिचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कम्पाऊंड करायचा नाही.’’
बाजूला काही कॉलेजकन्यका येऊन थडकल्या. त्यांचा चिवचिवाट सुरू झाला तशी अलकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना उमटली.
‘‘कॉफी झालीय पिऊन. गाडीत बसून बोलूयात?’’ तिने अर्धवट उठत विचारलं. विद्यालाही हायसं वाटलं. आपले सनग्लासेस उचलत ती निघाली. दोघी कारमध्ये बसल्या तशी अलकाने अवघडत सुरुवात केली..
‘‘विद्या, एक मला सांगायला हवं. सायली प्रभातची मुलगी नाही.’’
‘‘म्हणजे?’’ विद्याला धक्का सहन झाला नाही. ‘‘व्हॉट डू यू मीन?’’
‘‘ती माझी एकटीचीच मुलगी आहे.’’
‘‘हाऊ इज दॅट पॉसिबल?’’ विद्या जवळजवळ ओरडलीच. ती दोघांना कित्येक र्वष ओळखत होती.
‘‘ती- आय मिन मी ती वंदनाच्या मदतीने.. क्लोन..’’
‘‘क्लोन? आर यू सीरियस? केवढी मोठी मिस्टेक केलीस! मला का नाही विचारलंस एकदाही?’’ विद्या आता खूपच चिडली..
‘‘तुला माहीत आहेत क्लोनिंगचे प्रॉब्लेम्स?’’
‘‘हो. म्हणजे नंतर वाचले मी.’’ चाचरत अलका उत्तरली.
‘‘एक तर क्लोनिंगचा सक्सेस रेट अगदी अल्प.. म्हणजे एक-शतांशापेक्षाही कमी असतो. तुझ्याबाबतीत झालं ते सक्सेसफुल. पण पुढचा विचार केलास का? मेंढय़ांवर प्रयोग झाले त्यात म्हणतात की मुख्य अवयवांची वाढ अपुरी तरी असते, नाहीतर अति झालेली असते. माणसात तर किती गुंतागुंत होईल! त्यात क्लोनच्या मेंदूवर, विचारांवर काय काय परिणाम होत असतील याचा अभ्यास कुठे झालाय? आणि तू कशी अशी?’’ संतापाने तिच्या तोंडून शब्ददेखील फुटेना.
‘‘विद्या, तेव्हा मला वंदनाने ग्वाही दिली होती की हे सेफ आहे म्हणून.’’
‘‘वंदना ढीग सांगेल, पण म्हणून तू कशी बधलीस? गेलीस तरी कशी या वाटेला?’’
‘‘काय सांगू?’’ डोळ्यातलं पाणी पुसत अलका म्हणाली, ‘‘प्रभातवरचं प्रेम कधी आटलं, कळलंच नाही. वाद विकोपाला जात होते. अवघ्या दोन वर्षांतच. काही समजतच नव्हतं. मन भरकटत होतं आणि त्या भरात ठरवलं, की मूल हवं, पण त्यात प्रभात नको. फक्त आपलं एकटीचं मूल.’’
‘‘मी एकटीने बॉटनीची वाट धरली होती. पण आपल्या ग्रुपमधल्या तुम्ही बऱ्याच जणी मेडिकलला गेला होतात. वंदना तेव्हा मला खूप जवळची. मीही तिच्याशी खूप मनापासून बोलायचे. माझी ही इच्छा सांगितली तेव्हा तिने हा क्लोनिंगचा मार्ग सुचवला. तिचे काही सहकारी हे प्रयोग करत होते. चुपचापच करायचं होतं सगळं. तेव्हा ते खूप एक्सायटिंग वाटलं होतं. एक प्रकारे प्रभातवर सूड उगवल्यासारखं.’’
‘‘काय करून बसलीस हे?’’ डोकं हातात गच्च दाबत विद्या म्हणाली.
‘‘तुला माहीत आहे पुढचं. सायली झाल्यावरही आमच्या संसाराचा विस्कटलेला सूर पूर्ववत झालाच नाही. आणि मग फक्त लेक्चररशिप सांभाळत एकटीने तिला मोठं करत धडपडत राहिले..’’
‘‘वंदना- तिच्याशी कधी बोललीस नंतर?’’
‘‘न.. नाही. ज्यांनी प्रयोग केले ते नंतर ऑस्ट्रेलियाला सेट्ल झाले तिघेही. आणि मी काही साइन नव्हतं केलं, की कुठेही रेकॉर्ड्सही नाहीत.’’
‘‘बिग मिस्टेक अलका. अगं, आरशात पाहावं असं नसतं पाहायचं मुलांमध्ये!’’
‘‘मान्य आहे.’’
‘‘उलट, आरसा समोर घेऊन आपले गुण-दोष सगळे नीट पाहिले असतेस तर तू हा निर्णय घेतलाच नसतास. आपलीच प्रतिमा तशीच्या तशी बनवण्यात काय अर्थ? पुढच्या पिढीत वेगळेपण नसेल, विविधता नसेल, तर हव्यात कशाला नव्या पिढय़ा? आणि आपल्याच आवृत्त्या परत परत काढत बसलो तर नवीन काय? आई-बापांमधले गुण-दोष मिक्स करून पुढे न्यायचे, हे निसर्गाचं काम. आपण त्यात ढवळाढवळ नाही करायची. तंतोतंत बापासारखा मुलगा, हुबेहूब आईसारखी मुलगी अशा एकसुरीपणाने टिकेल का मानवजात?’’
अलकाकडे तिच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
प्रज्ञा सहस्रबुद्धे – pradnya2@gmail.com
(समाप्त)