सामाजिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींना सदैव अलर्ट असावं लागतं. एखादी कृती ‘बवाल’ घडवू शकते. सोशल मीडियारूपी कलियुगात तर जागोजागी सापशिडीतल्या सापासारखे ९३वरून ७वर आणणारे जागले टक्क जागे असतात. असाच व्हायरल झालेला एक फोटो. निमित्त होतं पूर परिस्थिती पाहणीचं. लोकांसमोर आलं ते भलतंच. काय घडलं नेमकं?

सदरहू फोटो तुम्ही पाहिला असेल. नसल्यास नीट पाहून घ्या. मध्य प्रदेशचे मा.मुख्यमंत्री राज्यातल्या अमनगंज तेहसीलमधल्या पन्ना जिल्ह्य़ातील कामटा या पूरग्रस्त गावाची पाहणी करण्यास गेले होते. पाहणीदरम्यान दोन पोलीस त्यांना उचलून घेऊन जात असल्याचा हा फोटो. फक्त घोटाभर पाणी आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्पोर्ट्स शूज आणि सॉक्स परिधान केले आहेत. या फोटोवरून नेटिझन्सच्या प्रतिभेला बहार आला. राजकारण्यांवर टीका करायला टपलेल्या लोकांना आयती संधी मिळाली. फोटोत एक क्षण कैद होतो. कॅप्शन द्यायला लागू नये इतका बोलका फोटो. आपण फोटो पाहतो. पण फोटोआधीचं आणि फोटोनंतरचं आपल्याला ठाऊक नसतं. खरंच मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांना उचलायला सांगितलं की सहकाऱ्यांच्या आग्रहरूपी हौसेला त्यांनी मान दिला? आणखी एका पक्षात तर वरिष्ठ नेत्यांचे जोडेही उचलतात. मुख्यमंत्र्यांच्या पायाला लागलं आणि पाण्यात सापांची भीती होती म्हणून हा खटाटोप असं कारण देण्यात आलं. पहिलं कारण वैध असू शकतं. पण दुसरं कारण असेल तर तशी भीती पाण्यातून चालणाऱ्या सगळ्यांनाच होती. आता दौरा होता पूरपाहणीसाठी. चर्चा झाली फोटोची. मागे एकदा मा.पंतप्रधानांनी पूरग्रस्त चेन्नईचा हवाई दौरा केला. जे फोटो रिलिज करण्यात आले त्यामध्ये आकाशातून वेगळंच शहर दिसत होतं. आता ती फोटो टाकणाऱ्याची चूक होती. पुन्हा काय झालं- पूरसंकट राहिलं बाजूला, चर्चा फोटोची. लोकप्रतिनिधींच्या सांत्वन दौऱ्यांचं असं का होतं?

एखादी दुख:द घटना घडलेल्या घराला भेट द्यायची असेल तर आपण शांतपणे जातो. एकतर त्या घरातली माणसं आपल्या जवळची असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण नेहमीचा पवित्रा बदलतो. शांत होतो आणि जातो. आपले कपडेही साधेसेच असतात. दु:खाचे कारण काहीही असो. आपण थोडा वेळ जाऊन बसतो. त्या दुर्दैवी घटनेबद्दल विचारतो. दु:ख व्यक्त करतो, त्यांना धीर देतो. एरव्ही ज्या घरात चहापाणी, नाश्ता-जेवण विचारलं जातं तिथून आपण फक्त पाणी पिऊन निघतो. ही परिस्थिती आपल्यासारख्या सामान्य माणसांची. हे चित्र असतं तुमच्याआमच्या घरात. सर्वसामान्य माणसाचं. पण सरकारी पातळीवरूनही सांत्वनाला येतात माणसं. लोकशाहीचा हा फायदा. संकट मोठं असेल तर अगदी पंतप्रधानही येऊ शकतात. संकटाचं स्वरूप थोडं कमी असेल तर मुख्यमंत्री येतात. पण हे सगळं वाजतगाजत होतं. म्हणजे कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ नेता येणार कळलं की त्या पंचक्रोशीतले पक्षाचे खरे कार्यकर्ते जागृत होतात. साहेब आले किंवा नाही तरी त्यांचं काम आधीपासूनच सुरू असतं. यांच्या जोडीला एक गट साहेब येणार म्हटल्यावर सुखावतो. पक्षकार्य नावाखाली सेटिंग, जुगाड, झोल करणारे पंटर आणि चमचे मंडळींना साहेब येणार म्हटलं की स्फुरण चढतं. प्रत्यक्षात साहेब कोणाचं तरी सांत्वन करायला येणार असतात. पण या मंडळींना साहेब मला वैयक्तिक ओळखतात हे दाखवण्यासाठी निमित्त मिळतं. साहेब दुसऱ्याच कोणाशी तरी बोलत असताना ते फोटो टिपून घेतात. करामती फोटोशॉपच्या माध्यमातून ते या फोटोत स्वत:ला आणतात. मग व्हॉट्स अ‍ॅप आणि तमाम सोशल मीडियावर धाडून देतात. त्यावर लाइक्स, शेअर, कमेंट्सचा पाऊस पडतो. साहेब आल्या क्षणापासून जाईपर्यंत ते त्यांच्या ‘पायात पायात’ असतात. या मंडळींचा सांत्वनाशी काहीही संबंध नसतो. आता साहेब विमानाने किंवा हेलिकॉप्टरने येणार असतील तर गावभर बभ्रा होतो. प्रचंड घर्रघर्र करणारं हेलिकॉप्टर जमिनीवर उतरतं. त्याच्या गरगर करणाऱ्या पात्यांनी गवत हुळहुळू लागतं. ‘अजि म्या हेलिकॉप्टर पाहिले’ हा आनंद घेण्यासाठी सेल्फीत्सुक बघ्यांची तोबा गर्दी जमते. हेलिकॉप्टरपासून त्या परिसरात किंवा घरात जायला गाडी असते. चिखलराडाने भरलेल्या चॉकलेटी रंगाच्या रस्त्याच्या कॅनव्हासवर पांढऱ्या रंगाची एसयूव्ही ‘ऑड मॅन आऊट’ वाटते. बरं साहेब एका गाडीत, एका सीटवर बसतात. पण त्यांच्या मागे किमान सात आणि पुढे किमान सात सिक्युरिटी गाडय़ा पळत असतात. काही विशेष गरज नसताना सफारी घातलेला एक सेवक चालत्या गाडीत दरवाजा उघडून पुढच्या गर्दीला हटवत असतो. आता साहेब येणार म्हटल्यावर एका रात्रीत ‘खड्डे कम रस्ता’ गुळगुळीत होतो. परिसरातल्या कचऱ्याकुंडय़ाही सुशोभित होतात. साहेबांच्या दृष्टीला वंगाळ काही पडू नये आणि आटपाट नगरी वाटावी असं चित्र तयार केलं जातं. साहेब येणार म्हणून झाडून सगळा पोलीस फोर्स बंदोबस्तावर असतो. पोलिसांकडे बाकी कामंही तुंबळ असतात. पण साहेब येणार म्हटल्यावर ते सगळं बाजूला. साहेबांची इच्छा शांततेत जावं यावं अशी असली तरी निवांत पहुडलेल्या गावासाठी तो दिवस इव्हेंट असल्याने दु:ख बाजूला राहतं आणि चमकोगिरीची हौस यथेच्छ भागवून घेतात लोक.

आपण आणि आपले लोकप्रतिनिधी यांच्यात असलेल्या तफावतीचं हे द्योतक. जेवढं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं आर्थिक, सामाजिक अंतर वाढत जाणार तशी ही उदाहरणं वाढतच जाणार. ‘दु:ख नको पण सांत्वन आवर’ अशी गत नित्याचीच. सर्वसमावेशक विचार न करता मताची पिंक टाकणारे स्वयंघोषित क्रिटिक्स सोशल मीडियामुळे तयार झालेत. त्यांना आयतं कोलीत मिळतं. अनेकदा त्यांचं शाब्दिक झोडपणं उद्वेगातून आलेलं असतं. पण काही वेळेला मनघडत किंवा फोटोशॉप्ड गोष्टींवर केलेलं भाष्य बूमरँगसारखं पलटू शकतं. सत्य-असत्य, फेक-ओरिजनल पडताळण्याची जबाबदारी आपली. अन्यथा दु:ख आहेच आपल्या वाटय़ाला..