स्पॉटलाइटमध्ये येणारी माणसं आणि त्यांना तिथवर नेणारे पत्रकार फेमस होतात. मात्र स्पॉटलाइटपर्यंतची प्रोसेस अर्थात बातमीचा प्रवास पडद्यामागेच राहतो. इतिहासातल्या रोचक अशा बातमीच्या प्रोसेसला यंदा मोठ्ठं अवॉर्ड मिळालंय. नॉर्मल लाइटमध्ये वाचा व्हायरल ‘स्पॉटलाइट’ची कहाणी..

पत्रकारांना डोमकावळे आणि पत्रकारितेला लष्करच्या भाकऱ्या भाजणं म्हणतात. रोजीरोटीला छद्मीपणे हिणवणाऱ्या अँटी मीडिया एलिमेंट्सना आमचा आंशिक पाठिंबा आहे. म्हणजे सदरहू विधान आम्हाला बहुतांशी पटत नाही, पण ते अगदीच नाकारताही येत नाही. स्टोरी, स्कूप, बायलाइन आणि डेडलाइन.. तुमच्या नजीकच्या मॉलमध्ये नव्याने लाँच झालेले हे यमी सिझलर्स नव्हेत, या जर्नलिझममधल्या टम्र्स आहेत. तर या चार गोष्टींत पत्रकारांचं विश्व सामावलेलं आहे. या चौकडीच्या मागे धावता धावता ते समाजातल्या गुणिजनांना स्पॉटलाइटमध्ये आणतात आणि गुणिजनांच्या कार्याचं सोनं होतं तर कधी ते समाजातल्या दांभिकांचे झोल उघड करतात. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचणारी त्यांची लेखणी कधी तलवार होऊन वार करते तर कधी गरजूंच्या पाठीवर शाबासकीची थाप देते. स्पॉटलाइटमध्ये कोणाला आणायचं हे काम मात्र जोखमीचं. कारण कोणतीही चूक विश्वासार्हतेला ठेच पोहोचवणारी.

अमेरिकेतला ‘बोस्टन ग्लोब’ नावाचा प्रतिष्ठित पेपर. कॅथलिकांचे प्रभावक्षेत्र असलेल्या बोस्टनमधल्या या पेपरच्या संपादकपदी २००१ मध्ये ज्यूधर्मीय मार्टी बॅरन यांची नियुक्ती केली जाते. खणखणीत स्टोऱ्या उकरून शोधपत्रकारिता करणाऱ्या ‘स्पॉटलाइट’ नावाच्या शोधपत्रकारितेला डेडिकेटेड टीमच्या संपादकांची बॅरन भेट घेतो. एकमेकांच्या संभाषणातून कॅथलिक चर्चमधील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय समोर येतो. धर्म, लहान मुलं आणि शोषण सगळंच खपाचे पण नाजूक मुद्दे. ठोस पुरावे नसतील तर पत्रकारितेतूनच गाशा गुंडाळायला लागू शकते असं अवघड सगळं. पण बॅरन स्पॉटलाइटच्या टीमला कामाला लागा सांगतात आणि सुरू होते अडथळ्यांची शर्यत. विषय नक्की काय, दोषी कोण आहेत, त्यांचं रॅकेट कसं चालतं, मुलं या ट्रॅपमध्ये कशी सापडतात यावर कोणी बोलत का नाही, कायदा असूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष का होतं या आणि असंख्य प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा ही टीम प्रयत्न करते. सुरुवातीला विरोध होतो, हितसंबंधांचं राजकारणही केलं जातं, दबाव आणला जातो, त्यांना कायदेशीर लढाईही खेळावी लागते, धमक्याही येतात. पण ही टीम चिकाटीने काम करतच राहते. सगळे अडथळे पार करून ही टीम धक्कादायक वास्तव वाचकांसमोर ठेवते आणि पीडित लहान मुलं आणि पालकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. शोषण करणाऱ्या धर्मगुरूंविरुद्धचा विरोध तीव्र होतो. सरकारला यासंदर्भातला कायदा कठोर करायला भाग पडतं. धर्माच्या बुरख्याआड कृष्णकृत्यं करणाऱ्यांना चाप बसतो. पण ही बातमी उकरणं सोपं नव्हतं. जटिल अशा या नाटय़मय प्रवासाने टॉम मॅकार्थी यांना भुरळ घातली. त्यानुसार त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं. निर्मात्यांनी नाकारलेल्या उत्तम स्क्रिप्ट्स या नावाखाली २०१३ मध्ये बॅडबुकात गेलेली ही रंजक कथा. २०१५ मध्ये टॉम मॅकार्थीना निर्मात्यांची चौकडी मिळाली आणि तयार झाला ‘स्पॉटलाइट’. रेव्हरंट, ट्रम्बो अशा चर्चित चित्रपटांना बाजूला ठेवून स्पॉटलाइटला सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. पत्रकार आणि त्यांच्या संस्थांनाही मॅनेज करता येतं अशा काळातही खरीखुरी पत्रकारिता जिवंत राखणाऱ्यांप्रती आदर म्हणून हा सन्मान. संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत नसलेल्या ‘स्पॉटलाइट’ची निवड झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. या चित्रपटालाही कथानक आहे पण मसाला नाही. हिरो, हिरॉइन, गाणीबिणी असा मामला नाही. पण तरीही दोन तास, दहा मिनिटं तो तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. काही वर्षांपूर्वी प्रत्यक्षात घडलेल्या घटनाक्रमाला पडद्यावर बटबटीत होऊ न देता मांडणी करणाऱ्या प्रयत्नांना सलाम म्हणून हा पुरस्कार.
पेड न्यूजने ग्रासलेल्या, राधे माँपासून पूनम पांडेपर्यंत सगळ्यांना न्यूजव्हॅल्यू देणाऱ्यांना, प्रो-गव्हर्न्मेंट, अँटी एस्टॅब्लिशमेंट अशी विभागणी झालेल्या, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या जुगाडात अडकलेल्या, पोकळ चर्चाची गुऱ्हाळं जमवणाऱ्या भारतीय मीडियासाठीही ऑस्कर महत्त्वाचा. ‘स्पॉटलाइट’ सर्वोत्तम ठरल्यावर सोशल मीडियावर बोस्टन ग्लोब, हे प्रकरण उकरणारे पत्रकार, चित्रपटातले कलाकार ट्रेंडिंगमध्ये आले. आपल्याकडेही कव्हरेज दणक्यात होतं, पण आपला ‘स्पॉटलाइट’ होता प्रियांकाजींच्या हॉट गाउनवर!