बदल हा स्थायीभाव आहे. बदलाच्या फेऱ्यात टिकून राहण्यासाठी सव्‍‌र्हायव्हल ऑफ फिटेस्टचा मंत्र चार्ल्स डार्विन यांनी देऊन ठेवलाय. मनुष्याला लागू असलेली ही उक्ती उद्याची रद्दी होणाऱ्या वर्तमानपत्राला लागू होते? ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भाषेतलं वृत्तपत्र अस्तित्वासाठी झगडतंय. संस्कृतिरक्षणाचा मक्ता घेतलेल्या राजवटीतही असं व्हावं!

धबधबा आणि बदाबदा हे तुम्हाला सख्खे भाऊ वाटू शकतात. धबधब्यात कसं पाण्याच्या प्रपातासमोर आपण न्हाऊन निघतो. अगदी तस्संच इंटरनेटवरच्या बदाबदा माहिती आक्रमणात आपण वाहून जातो. काय टिपावं, काय वेचावं, काय सोडून द्यावं हेच उमगेनासं होतं. त्यातच हल्ली तुमचा इव्हेंट किंवा हॅपनिंग सोशल मीडियावर व्हायरल करून देतो अशी कंत्राटंही घेतात म्हणे लोक. पेडन्यूजसारखं पेड व्हायरलत्व बूमिंग आहे. पण तुमच्यापर्यंत सकस गोष्टी पोहोचवण्यासाठी आम्ही खास चाळणी अ‍ॅप्लाय करतो. जेणेकरून नंबर क्रंचिंगचे बुडबुडे बाजूला सारले जातात आणि सत्त्वशील गोष्टी राहतात. ही कहाणी भाऊगर्दीत हरवून जाईल अशी. सुधर्म नावाच्या संस्कृत वर्तमानपत्राची ही कहाणी. वर्षभर सातत्याने याविषयी छापून येतंय, ऐकायला मिळतंय. अगदी परवाच ‘सुधर्मा’ संदर्भात एक बातमी आली. खर्चाचा ताळेबंद मॅनेज होत नसल्याने सुधर्मची अखेर होऊ शकते अशा आशयाची बातमी.

स्मार्टफोन, टॅबमध्ये भाषिक कीबोर्ड उपलब्ध आहेत. आपले परममित्र गुगलजी यांनीही भाषिक कवाडं खुली केली आहेत. स्थानिक भाषेतल्या वृत्तवाहिन्या जोम धरत आहेत. यूटय़ूबवरही स्थानिक भाषेतल्या कार्यक्रमांना दमदार प्रतिसाद आहे. पण सुधर्मच्या नशिबी हा लोकाश्रय नाही. लहान मुलांना शुभंकरोती शिकवलं जातं ते संस्कृतात आहे. शाळेत टक्केवारी फुगावी यासाठी १०० मार्काचं संस्कृत मिळवण्यासाठी अहमहमिका असते. घरची पूजा किंवा सत्यनारायण असो, शुभमंगल सावधान असो किंवा अंतिम निरोप असो- संस्कृत मंत्रपठणाचे शुभाशीर्वाद प्रत्येकजण मिळवतो. पण संस्कृतात निघणारे ‘सुधर्मा’ हे वृत्तपत्र शेवटच्या घटका मोजत आहे. संस्कृतच्या प्रसारासाठी १९७० मध्ये हे वृत्तपत्र कलाले नाडाडूर वरदराज अय्यंगार यांनी सुरू केलं. कर्नाटकातल्या टुमदार अशा म्हैसूर शहरातून हे वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. ४६व्या वर्षांनंतरही हे वृत्तपत्र सुरू आहे. असंख्य भाषिक वृत्तपत्रांना फाँटचा इश्यू असतो. पण सुधर्मचा ई-पेपर गेली दहा र्वष निघतोय आणि मुख्य म्हणजे कोणतेही तांत्रिक जुगाड न करता सहजपणे वाचताही येतो. दोन पानी अशा या दैनंदिन वृत्तपत्राचे देशभर वाचक आहेत. देशभरातल्या यच्चयावत घडामोडींची नोंद या वृत्तपत्रात असते. वार्षिक शुल्क फक्त ४०० रुपये आहे. सरकारची सबसिडी आणि तुटपुंज्या जाहिराती यावर सुधर्मचा डोलारा आहे. देशभरातल्या विद्यापीठांमधले संस्कृत विभाग, शिक्षकमंडळी, संस्कृतात संशोधन करणारे विद्यार्थी आणि अभ्यासक, संस्कृत विद्यापीठे, वाचनालये हे सुधर्माचे ‘टीजी’ (टार्गेट ग्रुप) आहेत. आता टीजीच कमी होतोय त्यामुळे टीजीवर अवलंबून असलेला सुधर्माही अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. वर्षांला १८ लाखांचा हा गाडा हाकण्यासाठी सुधर्माला सुज्ञ दात्यांची आवश्यकता आहे. भाषा म्हणजे मनुष्याचा कणा, संस्कृत आपला वारसा आहे, तो जतन करायला हवा अशा बोलीव लोकांपेक्षा कृतिशील माणसांची गरज आहे.

वर्तमानात जगावे असं म्हणतात. पण इतिहासात डोकावलं तर संस्कृत तत्कालीन वर्तमान होतं हे लक्षात येतं. संस्कृत कुठल्या वर्गाची, वंशाच्या लोकांची मक्तेदारी होती यावर खल करणाऱ्या बुद्धिजीवींपेक्षा या भाषेतले प्रचंड साहित्य आणि त्याचा आवाका लक्षात घ्यायलाच हवा. ही जनमानसाची भाषा होती. संगणकीय प्रणालीला साधम्र्य असणारी भाषा म्हणून संस्कृतचं वर्णन होतं. जिभेवर चांगले संस्कार होण्यासाठी संस्कृत पठणाचा आधार घेतात आधुनिक मंडळी. हे सगळं आपल्या पूर्वजांनी आधीच जाणलं होतं. ‘पॉझिटिव्ह वाइब्ज’ अर्थात शुभ विचार रुजण्यासाठी आजही संस्कृत मंत्रांचा आधार घेतला जातो. आता रूढ झालेल्या स्थानिक भाषांतले  असंख्य शब्द संस्कृतातूनच आलेत. या भाषेला रीतसर व्याकरण आहे. वैविध्यपूर्ण शब्दभांडार आहे. एवढे फायदे असले तरी आपल्यासाठी आठवी ते दहावी दरम्यानचा ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ एवढय़ासाठीच संस्कृत आपले प्राधान्य आहे. संस्कृतात बोलणारं, व्यवहार होणारं केरळमधलं गाव आपल्यासाठी ‘व्हिंटेज साइट’ आहे. अर्थात ‘लँग्वेज माझा फोर्टे नाही’ अशी मराठी वदणाऱ्या मंडळींना संस्कृत झेपणारं नाही.

शाश्वत धर्म, राजधर्म, स्वदेशी, मंदिरं, साधू-साध्वी, संस्कृतिपाईक स्वरूपाची राजवट देशात आहे. भाषा संचालनालय, भाषा अकादमी यांच्या घोषणा होतात आणि हवेत विरतात. सुधर्माचे संपादक संपत कुमार म्हणतात- ‘पत्रकारिता आणि संस्कृतचा मी निष्ठावान सेवक आहे. वृत्तपत्र बंद करणे माझ्यासाठी कठीण असेल. पण देशविदेशातले संस्कृतप्रेमी माझ्यामागे उभे राहतील असा विश्वास आहे’. आता आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे. स्वराज्य, सुराज्य या संकल्पनांनी काय किमया केली आहे याची तुम्हाला जाणीव आहेच. आता सुधर्माला कुठच्या दिशेने न्यायचं हे आपल्या हाती!