कुठलंही प्रदूषण घातकच. विचारांवर झालेलं प्रदूषण तर दृष्टिकोनच गढूळ करतं. गुलाबी रंगाबाबत आपल्या मनात आणि मेंदूत अनेक सुखद गोष्टी निगडित आहेत. दुर्दैवाने गुलाबी रंग प्रतीक असणाऱ्या मंडळींचं जगणं मात्र तितकंसं सुखावह नाही. समाज म्हणून आपल्याला पिछाडीवर टाकणाऱ्या या वैचारिक प्रदूषणाविषयी.

रंग आणि आपलं नातं गहिरं आहे. समोर दिसणाऱ्या गोष्टींचं ब्लॅक किंवा व्हाइट, फारतर ग्रे असं वर्गीकरण झालं असतं तर जगणं किती सोपं झालं असतं. डिजिटल क्रांतीच्या लाटेनंतर रंगांधळेपण येईल एवढय़ा रंगांच्या शेड्स गर्दी करून आहेत. साहजिकच रंगांशी संलग्न असणाऱ्या भावनाही बदलल्या आहेत. म्हणजे कसं लाल किंवा भगवा म्हणजे शौर्य, काळा म्हणजे नकारात्मक, अशुभ वगैरे. गुलाबी म्हटल्यावर काय डोळ्यासमोर येतं तुमच्या? सगळ्यात महत्त्वाचं डोळ्याला खुपत नाही. अंगावर येत नाही. चित्तवृत्ती विषण्ण करत नाही. सॉफ्ट, हळवा, कलात्मक आणि ‘सुकून’ देणारा रंग. तमाम मुली तसंच महिला वर्गाचा रंग. वुमनिया थाटात लगेच राग आळवू नका. भावनाओं को समझो. सॉफ्ट म्हटलं म्हणजे कणखर नाही असं नाही. हळवं म्हटलं म्हणजे भावनिक रडुबाई असं नाही. कलात्मक म्हटलं म्हणजे राकट नाही असं नाही. ‘सुकून’ आहे म्हणजे धडा शिकवू शकत नाही असं नाही. महिला आणि गुलाबी रंगाचं कनेक्शन या सामाजिक-वैज्ञानिक-मानववंशशास्त्रीय अभ्यासात आपण अडकायला नको. गुलाबी गारुडाच्या अल्यापल्याडचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा.

‘नो म्हणजे नाही’ याची शिकवण देणारा ‘पिंक’ सिनेमा चर्चेत आहे. कपडय़ांवरून, बोलण्यावरून आणि महिलांच्या राहणीमानावरून जजमेंटल होऊन त्यांच्याबाबत शेरेबाजी आणि पुढे जाऊन अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अशाच एका घटनेला सामोरे गेलेल्या तीन तरुणींची व्यवस्थेविरुद्धच्या लढय़ाची कहाणी पिंक सिनेमाचा गाभा आहे. पुरुषी मानसिकतेवर बोट ठेवण्याऐवजी समाज म्हणून आपल्या उण्या विचारप्रक्रियेवर सिनेमा आक्रमण करतो. परंपरागत आहे म्हणजे बरोबर आणि मॉडर्न म्हणजे चूक या मापदंडाला आव्हान मिळते. झाडांमागे गाणी गात फिरणारे नायकनायिका, प्रेम-इश्क-मोहब्बताचा त्रिकोण चौकौन, परदेशातली एक्सपेनसिव्ह लोकेशन्स, लॉजिकशी अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेले कथानक अशा चित्रपटांची सवय लागल्याने पिंक वेगळा भासतो. कथा काल्पनिक आहे मात्र देशाची राजधानी असूनही अत्यंत असुरक्षित असणाऱ्या दिल्लीत अशा घटना दररोज घडत आहेत. दिल्लीच्या जगण्यावर कॅमेरारुपी आरसा धरलाय. वास्तव जगतात पिंकचं प्रतीक असणाऱ्या महिलांचं जगणं किती नकारात्मक वावटळींनी वेढलं आहे याची जाणीव होते.

तयार झाल्यापासून भलत्याच कारणांसाठी चर्चेत ‘पाच्र्ड’ सिनेमाही प्रदर्शित झालाय. ‘पाच्र्ड’चा अर्थ होतो तहानलेला किंवा वठलेला. राजस्थानातल्या छोटय़ा गावातल्या तीन महिलांची ही गोष्ट. समाजाने ज्यांच्या आयुष्यातल्या गुलाबी भावनेला विस्कटून टाकलंय अशा तिघींची ही कहाणी. ग्यान नाही, उपदेशाचे डोस नाहीत पण गुलाबी रंगाशी जोडल्या गेलेल्या महिलांचं जगणं आजही किती विदारक आहे याचं टोकदार चित्रण चित्रपटात आहे. मूलभूत न्यायहक्कांसाठी संघर्ष करावा लागणाऱ्या महिलांची आणि पर्यायाने गुलाबी रंगाची होणारी फरफट अस्वस्थ करते. करिअर, स्पेस, प्रायव्हसी या संकल्पना रुजत असतानाच्या काळात महिलांमधलाच मोठा वर्ग यापासून शेकडो मैल दूर आहे याची जाणीव होते. आशयघन भूमिकांसाठी प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे या चित्रपटात आहे. सवंग गोष्टी चघळण्याची सवय झालेल्यांनी पायरसीच्या माध्यमातून रिलीज होण्यापूर्वीच पाच्र्ड मिळवला आणि पाहिला. पण अभिनय, कथानक, वातावरण, संदेश यामध्ये त्यांना रस नव्हताच. अधिकृतपणे रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचं कौतुक होतंय. पण आठवडाभर आधीचं चित्र नक्कीच गुलाबी नव्हतं.

अहमदनगर जिल्ह्य़ातलं कोपर्डी गाव म्हणजे नकाशावर एका टिंबाचं अस्तित्व. याच गावातल्या एका ‘ती’ बाबत घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी. अनन्वित अत्याचार सहन करून ती गेली. आयुष्याची गुलाबी स्वप्नं बघण्याच्या वयात तिचा प्रवास यातनांमध्येच कायमसाठी संपला. गुन्हेगाराला जात-धर्म-पंथ-वंश नसतो असं म्हणतात. तेच तिलाही लागू होतं ना? नगर जिल्ह्य़ातच नाही तर राज्यात, देशात अशा घटना घडत आहेत. आरोपींना शिक्षा होण्यासाठी लागणारा वेळ तुमच्याआमच्या समोर आहे. कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने तिची जात अधोरेखित झाली आहे. लाखोंच्या संख्येने निघणारे मोर्चे खरंतर एका विशिष्ट जातीचे असण्याऐवजी संपूर्ण समाजाचे हवेत. अशी घटना कोणाबाबतही घडणं दुर्दैवी आहे. जातीपलीकडे जाऊन आरोपींना लवकरात लवकर अद्दल घडेल अशा शिक्षेसाठी सदसद्विवेकबुद्धी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र यायला हवं. नृशंस अशा या घटनेआडून वैयक्तिक हितसंबंध जोपासणाऱ्यांचा हिणकस डाव आपणच मुळापासून उपटायला हवा. पत्ता विचारायला लागू नये म्हणून जीपीआरएस ऑन करण्याच्या काळातही आपली ओळख जातीपुरती सीमित असावी हे आपलं एकत्रित अपयश आहे. कोपर्डीच्या निमित्ताने आमची जात कशी भारी, इतर कसे टाकाऊ असा फॉरवर्डेड जातीवाचक कचरा पाठवणाऱ्यांना तुम्ही केराची टोपली दाखवायला हवी.

आपल्याकडे लोकशाही आहे. जगण्यासाठी आदर्श अशी प्रणाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि त्यावर बेतलेले चित्रपट आपण लोकशाहीसाठी प्रगल्भ नसल्याचे द्योतक आहे. पोकळ चर्चा आणि गप्पांमध्ये मताची ‘पिंक’ टाकण्यापेक्षा माणुसकीची जात जपली तर विमनस्क गुलाबी काजळी दूर होईल हे नक्की.

पराग फाटक