सावंतवाडी तालुक्यातील एक छोटेखानी पण आखीव-रेखीव गाव म्हणजे आजगाव. मुंबईपासून अंदाजे  ५२५ किलोमीटर अंतरावर आणि गोव्यापासून अगदी चिकटलेले. तर सावंतवाडीपासून अवघ्या २० ते ३० किलोमीटर अंतरावर. या गावात गेली १५० वर्षे दोन शाळा होत्या. आज गावात इंग्रजी माध्यमाच्या धरून चार शाळा झाल्या आहेत. तर आजगाव-मळेवाड पंचक्रोशीत जवळजवळ दहाच्या वर शाळा आहे. या मुख्यत्वे मराठी किंवा सेमी-इंग्रजी पद्धतीच्या आहेत. त्यातील आजगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ही शाळा शिक्षणक्षेत्रातील नवनवीन बदल सामावून घेत आजही ज्ञानवृक्ष बनून मोठय़ा दिमाखाने उभी आहे.

मुंबईतील अनेक मराठी शाळा आज पुरेशा विद्यार्थिसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात ‘आजगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १’ ही शाळा १४५ वर्षांतही अजूनही सुदृढ आणि तरतरीत अवस्थेत आहे. २७ नोव्हेंबर १८७१ साली सुरू झालेल्या या शाळेने काळानुरूप बदल करत अध्ययन-अध्यापन पद्धतीत सुधारणा करत आणल्या. काही वर्षांपूर्वी कुठल्याशा देशभक्तीपर हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यामुळे शाळेच्या इमारतीला नवतेचा साज चढला. सुरुवातीला शाळेत तिसरीपर्यंतचेच वर्ग होते. आता ते वाढून सातवीपर्यंत झाले आहेत. सुमारे १०० विद्यार्थ्यांना सेमी-इंग्लिश पद्धतीने शिकता येते. कोकणात कुटुंब कल्याण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या काही वर्षांत येथील जन्मदर घटला आहे. त्याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवरही झाला आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी १५० पर्यंत असलेली शाळेची पटसंख्या कमी झाली आहे. मात्र त्यानंतर पटसंख्या स्थिर आहे. शाळेत सर्व प्रकारचे खेळ, अद्ययावत सभागृह, ग्रंथालय, संगणक कक्ष व महत्त्वाचे म्हणजे विस्तीर्ण पटांगण आहे. शाळेच्या एकूण चार इमारती असून १२ वर्गखोल्या आहेत.

Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

उपक्रमांमधील सातत्य

नवी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती शाळेने अनुसरली आहे. वाक्य, शब्द स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. याशिवाय पाढे पाठांतर, मनाचे श्लोक, हस्ताक्षर स्पर्धा, लेखन स्पर्धा, श्रुतलेखन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इंग्रजी शब्दवाचन, समूह गीत स्पर्धा, काव्यलेखन, अक्षरावरून शब्द तयार करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती-पुण्यतिथीनिमित्त भाषण कला विकसित करणे, शालेय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम शाळेत दर वर्षी न चुकता राबविले जातात. शाळेतच उपलब्ध होणाऱ्या या व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धामध्ये यश प्राप्त केले आहे. अक्षरावरून शब्द, शब्दावरून वाक्यरचना करण्याचा उपक्रम शाळेत राबविला जातो. यामुळे शब्दरचनेत भर पडण्याबरोबरच विद्यार्थ्यांची भाषावृद्धी होते. हाच प्रयोग इंग्रजी भाषेकरिताही राबविला जातो. मराठीसाठी शब्दावरून कविता तयार करणे, कथा तयार करणे, नाटक बसविले जाते. विद्यार्थ्यांना त्याचे सादरीकरणही करावयास सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येतो, असे शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव सांगतात.

मुलांचे हस्ताक्षर सुधारावे यासाठी हस्ताक्षरलेखन, अनुलेखन, श्रुतलेखन नियमितपणे करवून घेतले जाते. याचा उपयोग भाषा सुधारण्याकरिता होतो. किल्ले, शिवार भेट, गणपती चित्रशाळेला भेट असे क्षेत्रभेटीचे कार्यक्रम शाळेतर्फे घेतले जातात. यंदा नेहरू वसुंधरा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले आहे. शाळेत संगणक असून इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या विषयांवरील माहिती मिळवून ती वाचण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

पंचरंगी कवायत

संगीत शिक्षण हे शाळेचे वैशिष्टय़. पंचरंगी कवायत हा या शाळेचा आणखी एक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम. २६ जानेवारीला होणारा हा उपक्रम पाहण्याकरिता अख्खा गाव लोटतो. डम्बेल्स, लेझीम, साधी कवायत, बॅण्ड पथक अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सक्रिय असतात. माजी विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, बुद्धिबळ, दोरीच्या उडय़ा आदी खेळाचे साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे, मुलांना वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटता येतो. कार्यानुभवात मातीच्या वस्तू तयार करण्याचा उपक्रम आवर्जून राबविला जातो. या वेळी मुले मातीच्या वस्तू, मूर्ती तयार करून त्यांना रंगवितात.

स्वच्छ सुंदर शाळा

आजगाव शाळेला २०१३-१४ मध्ये तालुका गुणवत्ता स्पर्धेत स्वच्छ सुंदर शाळेचे पारितोषिक मिळाले होते. स्वच्छता, टापटीपपणा हे या शाळेचे वैशिष्टय़ आहे. शाळेच्या प्रयत्नांना पालक, ग्रामपंचायतीचाही हातभार लागतो, असे शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव सांगतात.

नुकताच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचा वाढदिवस साजरा केला. या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेण्याच्या दृष्टीने सराव वर्ग, ज्येष्ठ व तज्ज्ञांची भाषणे, शिष्यवृत्ती परीक्षेकरिता माजी शिक्षकांकडून मार्गदर्शनपर अभ्यासवर्गाचे आयोजन, मुलांना खेळाचे साहित्य व शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या पाठबळामुळे हा ज्ञानवृक्ष आणखी बहरणार यात शंकाच नाही.

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

अभिमन्यू लोंढे