ऑक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत एमआयएमने एकदम ११ जागा जिंकल्यानंतर राजकीय निरीक्षकांनी तेव्हाच एमआयएम हा कॉँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकेल असा इशारा दिला होता. पण कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे दोन आमदार निवडून आले. एक आमदार औरंगाबादचा असल्याने तेथील महापालिका निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला यश मिळाले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली असतानाच एमआयएमने मात्र सोलापूर, अमरावती, अकोला, पुणे, ठाणे, मुंबईत आपले अस्तित्व दाखवून दिले. कॉँग्रेसने मतांसाठी फक्त मुस्लिमांचा वापर करून घेतला,  समाजाच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केले यावर ओवेसी बंधू आपल्या प्रचारात भर देत असल्याने हा पक्ष राज्यात वाढत चालल्याचे दिसत आहे. या निमित्ताने एमआयएमच्या वाटचालीचा ऊहापोह..

महानगरपालिका निवडणुकांमध्ये अमरावतीत दहा तर सोलापूरमध्ये नऊ जागांवर विजय, मुंबई, पुणे, अकोला, ठाण्यातही खाते उघडले. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये निवडून आलेले उमेदवार, बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसरा क्रमांक, दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेत २० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे हा सारा कल बघितल्यावर एमआयएम म्हणजेच ‘ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ या पक्षाचा आलेख महाराष्ट्रात चढता राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद आणि मुंबईतील भायखळा या दोन मतदारसंघांतून एमआयएमचे आमदार निवडून आले आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या महानगरपालिका किंवा त्याआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला मिळालेले यश यावरून राज्याच्या विविध भागांमध्ये या पक्षाचे अस्तित्व वाढत चालले आहे किंवा पतंग (पक्षाचे चिन्ह) हवेत उडू लागला आहे.  महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ११.५४ टक्के (२०११ जनगणना) मुस्लिमांचे प्रमाण आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात एमआयएमचे प्रस्थ वाढणे हा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य निधर्मवादी पक्षांसाठी धोक्याचा इशाराच मानला जातो. असदुद्दीन किंवा अकबरुद्दीन ओवेसी बंधूंच्या राज्यात मुस्लीमबहुल भागांमध्ये होणाऱ्या सभांना गर्दी किंवा मिळणारी मते लक्षात घेता अल्पसंख्याक समाजात या पक्षाबद्दल आकर्षण वाढले आहे. एमआयएम म्हणजे भाजपचा ब संघ किंवा निधर्मवादी मतांच्या विभाजनाकरिता भाजपकडून एमआयएमचा वापर केला जात असल्याचा आरोप किंवा टीका काँग्रेस नेत्यांकडून केली जात असली तरी मुस्लीम समाजात पक्षाबद्दल विश्वासाची भावना का वाढते आहे, याचे आत्मपरीक्षण करावे हा पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेत्यांना दिलेला सल्ला बराच बोलका आहे.

महाराष्ट्रात मुस्लीम समाजात नेतृत्वाचा अभाव असल्यानेच एमआयएमचा प्रभाव वाढत असल्याचा सूर ऐकू येतो. अल्पसंख्याक समाजात विश्वासाची भावना निर्माण करेल, असे काँग्रेसमध्ये राज्यात नेतृत्वच दिसत नाही. आपले प्रश्न मांडणारा किंवा त्यासाठी भांडणाऱ्या नेत्याच्या मागे मुस्लीम समाज उभा राहतो. याची दोन ताजी उदाहरणे. मुंब्रा-कौसा या अल्पसंख्याकबहुल भागात राष्ट्रवादीच्या जीतेंद्र आव्हाड यांनी समाजाचे प्रश्न उचलून धरले किंवा इशरत जहाँ चकमक वा अन्य प्रश्नांवर उघडपणे बाजू घेतल्याने या परिसरात त्याचे नेतृत्व प्रस्थापित झाले. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त मुंब्रा या मुस्लीमबहुल भागात एकहाती यश मिळाले. मुंबईतील मालवणी भागात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे चांगले प्रस्थ आहे. महापालिका निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले. तेथे एमआयएमचा प्रभाव पडू शकला नाही. आघाडी सरकारच्या काळात दहशतवादी कृत्यांच्या आरोपांवरून मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर तरुणांची धरपकड करण्यात आली होती. त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. एमआयएमचे मूळ हे हैदराबादचे. साहजिकच हैदराबादला लागून असलेल्या किंवा पूर्वीच्या निजामाचा प्रभाव क्षेत्र असलेल्या मराठवाडय़ात पक्षाला ताकद मिळत गेली. मुस्लीम समाज आपले प्रश्न मांडेल या पर्यायांच्या नेहमीच शोधात असतो. १९७१ मध्ये मुंबईत मुस्लीम लीगची ताकद वाढली होती. बाबरी मशीद पडल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत समाजवादी पक्षाचे महत्त्व वाढले. मुंबई व राज्याच्या अन्य भागांमध्ये मुलायमसिंग यादव किंवा अबू असिम आझमी यांच्यामुळे समाजवादी पार्टीला मुस्लीमबहुल भागांमध्ये पाठिंबा मिळाला. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय असलेल्या मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार काँग्रेसपेक्षा पुढे होते. सपाची जागा आता एमआयएमने घेतली आहे.

मुस्लीम समाजाचे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे कायम आहेत. आतापर्यंत मतांच्या राजकारणाकरिता समाजाचा वापर करून घेण्यात आला होता. ओवेसी बंधू नेमका यावरच प्रकाश टाकतात. मुस्लीम समाजाला हे मुद्दे भावतात. समाजात असुरक्षितेची भावना वाढीला लागल्यास आपल्या मागे भक्कमपणे कोण उभा राहील याचाही समाज विचार करतो. एमआयएमचे राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते असते, अशी टीका केली जाते. काहीही असले तरी एमआयएमचा जनाधार राज्यात वाढत आहे, हे निवडणूक निकालांवरून तरी स्पष्ट होते.

काँग्रेसच्या जागा का घटू लागल्या ?

विधानसभेपाठोपाठ औरंगाबाद महानगरपालिका नंतर नगरपालिका व आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमचा जनाधार वाढत चालला आहे. मुस्लीम समाजात पक्षाबद्दल आकर्षण आहे. वषानुवर्षे मुस्लीम समाज काँग्रेसला डोळे झाकून मतदान करायचा, पण समाजाच्या प्रश्नांकडे काँग्रेसने साफ दुर्लक्षच केले. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातच हजारो मुस्लीम तरुण तुरुंगांमध्ये खितपत पडले. एमआयएमला यश मिळू लागल्यावर आम्ही भाजपला मदत करतो, अशी टीका काँग्रेसने सुरू केली. पण लोकसभा निवडणुकीपासून राज्यातील काँग्रेसच्या जागा का घटत चालल्या किंवा मतांच्या टक्क्यांवर परिणाम का झाला याचे आत्मपरीक्षण काँग्रेस नेत्यांनी करणे आवश्यक आहे. मुस्लीम समाज काँग्रेसपासून दूर जात असून, एमआयएमला समाजाचा पाठिंबा वाढत आहे. त्यातूनच काँग्रेसच्या जागा अलीकडच्या काळात घटल्या आहेत. पक्षाला मराठवाडय़ात चांगले यश मिळाले आहे. विदर्भातही महापालिका आणि नगरपालिकांमध्ये खाते उघडले आहे. मुंब््रय़ात यश मिळाले. फक्त मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही. पुण्यात ख्रिश्चन समाजाची महिला निवडून आली. काही ठिकाणी हिंदू, दलित समाजाच्या उमेदवारांना बऱ्यापैकी मते मिळाली आहेत. एमआयएम हा फक्त मुस्लिमांचा पक्ष हा प्रचारही खोटा ठरला आहे. पक्षाला जनमानसाचा चांगला पाठिंबा असला तरी पक्षाची संघटनात्मक बांधणी योग्य नसल्याने त्याचा फटका बसला. भविष्यात पक्षाची चांगली बांधणी करावी लागेल.    इम्तियाज जलिल, आमदार एमआयएम

 काँग्रेसचे अपयश कारणीभूत

एमआयएमच्या वाढीस काँग्रेस आघाडीचे सरकार कारणीभूत ठरले. हजारो मुस्लीम तरुणांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. गृह खाते तेव्हा राष्ट्रवादीकडे होते. अनेकदा मागणी करूनही गृह खाते किंवा पोलिसांकडून काहीच सुधारणा झाली नाही. मुस्लीम समाजात नाराजी का आहे याचा साधा आढावाही पक्षात घेतला गेला नाही. एमआयएमचे नेते चिथावणीखोर भाषणे करून समाजाला भरीस पाडतात. त्यातून समाजाचेच नुकसान होणार आहे. पण मुस्लीम समाजाशी संवाद साधण्याचा काँग्रेसमध्ये कोणी प्रयत्न करीत नाही. वास्तविक काँग्रेसच्या नेत्यांनी याचे चिंतन करणे आवश्यक आहे. एमआयएम वाढणे याचा भविष्यात काँग्रेसलाच फटका बसणार आहे. एमआयएमचे नेते काँग्रेसपेक्षा भाजप बरा, अशी भाषणे करतात. त्यांचा हेतू स्पष्टच आहे. मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. मुंबईतील महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी साधे बेंच नाहीत. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणूनही सुधारणा होत नाही. अशाने लहान मुलांमध्ये वेगळेपणाची भावना निर्माण झाल्यास समाज मुख्य प्रवाहात येणार कसा ? मुस्लीम समाजात नेतृत्वाची वानवा असल्यानेच एमआयएमच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले.   खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस

असुरक्षिततेच्या भावनेतूनच पाठिंबा

निधर्मवादी पक्ष आपले संरक्षण कमी करण्यात कमी पडतात अशी भावना बहुधा मुस्लीम समाजात झाली असावी. असुरक्षिततेच्या भावनेतूनच एमआयएमसारख्या जहाल आणि भडक नेत्यांच्या पक्षास पाठिंबा मिळत असावा. मुस्लीमबहुल विभागात साऱ्याच ठिकाणी एमआयएमला पाठिंबा मिळालेला नाही किंवा त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही. समाजात विश्वासाची भावना निर्माण झाली तरच जातीयवादी पक्षांना पाठिंबा मिळणार नाही.  डॉ. मोहसिना मुकादम, इतिहासाच्या प्राध्यापिका