वैद्यक शास्त्रातील आंतरपॅथी संशोधनाबद्दल गेला सुमारे महिनाभर ‘लोकसत्ता’तून चर्चा सुरू राहिली. ती चर्चा पुढे नेण्यासाठी ही आयुर्वेदाची बाजू, अर्थातच रुग्णकेंद्री. रुग्ण आधुनिक वैद्यकातील तपासण्यांसाठी तयार असतात, काही रोगच आयुर्वेदासारख्या उपचारपद्धतीत पुरेसे स्पष्टपणे वर्णिलेले नसतात, असे असताना काळाची आव्हाने ओळखून आपापल्या वैद्यकशाखेत उत्तरे शोधता येतात, पण हे करत असताना मूळ ज्ञान विसरू नये, अशा अपेक्षेसह..
साधारण तीन आठवडय़ांपासून ‘लोकसत्ता’मध्ये देशातील जनतेच्या वैद्यकीय समस्यांकरिता ‘आंतरपॅथी संशोधन ’ कसे असावे, याबद्दलचे लेख (डॉ. जगन्नाथ दीक्षित : ‘आंतरपॅथी करायचे, पण कोणी?’ – २३ सप्टेंबर आणि डॉ. मंदार जोशी : ‘‘आंतरपॅथी’तील होमिओपॅथी’- ७ ऑक्टोबर) वाचतो आहे. या लेखांवर काही निवडक प्रतिक्रिया ‘ या सदरात प्रसिद्ध झालेल्याही वाचल्या. ‘लोकसत्ता’ लोकहिताकरिता अनेकानेक वैद्यकीय क्षेत्रांतील नामवंतांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध करत असतेच. या मोठय़ा ज्ञानयज्ञात माझा लेख एक छोटीशी समिधा असेल, याची मला जाणीव आहे.
 गेली ४६ वर्षे मी आयुर्वेद प्रधान चिकित्सा कार्यात माझ्या परीने छोटेसे योगदान करीत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशी लहान-मोठी प्रगत शहरे; तसेच मराठवाडय़ातील बीडसारखा मागास जिल्हा, कोकणातील छोटय़ा-छोटय़ा वाडय़ांवरील गोरगरीब, नागपूर विदर्भ व बेळगाव, कारवार अशा दूरस्थ ठिकाणाहून, आपापल्या ‘आरोग्य/ अनारोग्य’ समस्यांकरिता; आयुर्वेदात काही उत्तर आहे का? याकरिता मोठय़ा भाबडय़ा आशेने येत असतात. अलीकडे अशी रुग्णमित्र मंडळी खूप खूप जाडजूड फायली, रक्ताचे रिपोर्ट, विविध एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी रिपोर्ट, मलमूत्र तपासणी अहवाल आणतात. ‘माझ्या अशा शारीरिक किंवा रोगसमस्या आहेत. त्याला तुमच्याकडे काही ‘आयुर्वेदीय उपाय’ आहेत का?’ असे मोठय़ा अपेक्षेने विचारतात.
त्यांच्या या प्रश्नातच आंतरपॅथी संशोधन असावे का नाही, याचे उत्तर मिळू शकते.
भारतात आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी- आधुनिक वैद्यक, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध, बाराक्षार पद्धती, निसर्गोपचार अशा विविध प्रकारच्या वैद्यक प्रणाली आपापल्या परीने रुग्णांचे आजार दूर करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन करत असतातच. अशा पाच-सहा प्रकारच्या वैद्यक प्रणालीतील ज्येष्ठ चिकित्सकांनी एकत्र येऊन, भारतीय नागरिकांच्या वैद्यकीय स्वास्थ्याकरिता काही ठोस घडेल असे मला वाटत नाही. या सर्व शास्त्रांचे मूळ तत्त्वज्ञानाचा पाया व त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर गेली किमान शंभर वर्षे तयार होत असणारी औषधे खूप खूप भिन्न प्रकारची असतात.
माझे ज्ञान मी आयुर्वेदातील थोर ग्रंथांपुरते मर्यादित ठेवले आहे. ज्यावेळेस एखादा मधुमेह, हृदरोग, संधिवात, आमवात, त्वचाविकार, प्राणवहस्रोतस किंवा स्त्री-पुरुषांचे विशिष्ट आजार याकरिता रुग्ण येतो, तेव्हा त्यांची संबंधित वैद्यकीय कागदपत्रे जरूर तपासतो. त्या तपासण्यांबद्दल रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड, रक्ताच्या विविध चाचण्या, सोनोग्राफी यांचा मागोवा जरूर घेतो. पण त्या व्यक्तीची विविध रोग लक्षणे यांच्यामुळे शरीरातील विविध अवयव; रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे सात धातू व मल, मूत्र, स्वेद व आर्तव अशा मळांच्या कमी-अधिक समस्यांचा व त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा थोडक्यात अभ्यास करतो.
आयुर्वेदीय चिकित्साशास्त्र हे ‘प्रत्यक्ष प्रमाणावर’ आधारित आहे. ती नुसती ‘घटपटादि’ चर्चा नव्हे. आलेल्या रुग्णाच्या व्याधी समस्येला नेमक्या काळात उत्तर देण्याची क्षमता आयुर्वेदात निश्चित आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. आपल्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण हा वैद्य डॉक्टरांच्या विचाराला नवनवीन खाद्य पुरवत असतो. आयुर्वेदीय महाविद्यालयात झालेले शिक्षण हा वैद्यकीय सागरातील एक बिंदू आहे. मी गेली अनेक वर्षे सर्वसामान्यांकरिता आयुर्वेदाचे शिक्षण वर्ग घेत आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या थोर थोर मूळ ग्रंथांचे वाचन, मनन नित्य होत असते. आपलेकडे येणारे नवनवीन रुग्ण जेव्हा आपल्या समस्या सांगतात तेव्हा त्यांचेकरिता आपल्या आयुर्वेदीय औषधी महासागरात भरपूर उत्तरे आहेत; यावर विश्वास ठेवून रुग्णांकरिता अल्पमोली, सुटसुटीत, कमीतकमी घटक द्रव्ये असणारी; रुग्णाला कोणत्याही प्रकारची वाईट रिअ‍ॅक्शन येणार नाही, याकरिता वैद्यमंडळींनी व्यापक वाचन करण्याची गरज आहे व त्या आधारे योग्य ती औषध योजना करायला हवी.
यासाठी, औषधी योजनेबरोबरच खाण्या-पिण्याचे, राहणीचे नेमक्या नियमांची माहिती रुग्णाला देणे हा रुग्णहिताचा भाग आहे. कोणतेही वैद्यकीय संशोधन हे ‘कॉमनसेन्सला’ सोडून असू शकत नाही, याचे भान वैद्यकीय चिकित्सकाला हवे.
आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या रोग समस्येकरिता जेव्हा आपण नव्याने विचार किंवा संशोधन करत असू, तेव्हा त्याकरिता जवळपास दोन अडीचशे औषधी उपयोगाच्या वनस्पती, पंचवीस-तीस प्रकारचे विविध धातू, प्राणिज द्रव्ये व सागरी द्रव्यांचा मूलभूत अभ्यास हवा. या सर्व वनस्पती व विविध द्रव्ये ही कोणा एका शास्त्राचीच मालकी असणारी नव्हे, हे भान मला नेहमीच जरूर असते. इथे वैद्य मंडळींनी विविध वनस्पती शास्त्रज्ञ तसेच वनस्पतींच्या गुणकर्माचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक व रास्तच आहे.
याचबरोबर विविध पॅथॉलॉजिस्ट, आधुनिक वैद्यकांतील रेडिओलॉजिस्ट, स्त्रीविकार तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, विविध रोगांचे स्पेशालिस्ट अशांशी सल्लामसलत करणेही खूप मोलाचे ठरते. मी गेलय़ा जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ एचआयव्हीग्रस्त रुग्णांकरिता पुण्यातील डॉक्टर कोटणीस दवाखान्यात आजपर्यंत शेकडो रुग्णांना आयुर्वेदीय औषधे यशस्वीपणे देत आलेलो आहे.
नमुन्यादाखल हे एक आंतरपॅथी संशोधन ‘लोकसत्ता’च्या जिज्ञासू वाचकांकरिता सांगत आहे. इथे मला अनेक पॅथॉलॉजिस्ट व एम. डी. मेडिसीन तज्ज्ञ डॉक्टरांशी केलेली सल्लामसलत खूपच उपयोगी पडली. त्यामुळे आयुर्वेदीय यशस्वी उपचार करणे खूपच सुलभ झाले, हेही नमूद केले पाहिजे.
 रुग्णहिताकरिता आधुनिक वैद्यक, आधुनिक वनस्पती व विविध रसायनांचे तज्ज्ञ यांच्याशी केलेली सल्लामसलत नवीन आयुर्वेद संशोधकांना निश्चित मदत करेल, असा माझा दृढ विश्वास आहे. त्याकरिता नव्याने आयुर्वेद क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांनी मूळ आयुर्वेदीय ज्ञानाचा पाया विसरून कसे चालेल!