वैद्यकीय दुर्घटना झाली की डॉक्टरांना शिक्षा करण्याचे प्रकार वाढत चालले असून आरोग्यसेवेसाठी ही बाब अत्यंत घातक आहे. म्हणूनच सरकार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन अराजकाकडे जाणारी ही वाटचाल थांबवणे गरजेचे आहे..

रुग्ण हक्कांच्या बाजूने आम्ही काही मोजके डॉक्टर्स व आरोग्य-कार्यकर्ते गेली काही वर्षे करत असलेल्या कामामागे एक समाजशास्त्रीय भूमिका आहे- आजाराने त्रस्त झालेला रुग्ण एका अर्थाने नाडलेला असतो. व्याधीतून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी, प्रसंगी जीव वाचण्यासाठी तो डॉक्टरवर अवलंबून असतो. डॉक्टर करेल ते उपचार त्याला घ्यावे लागतात. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण नात्यात अटळपणे वैद्यकीय सत्ता निर्माण होते. तिचा उपयोग रुग्णाच्या हितासाठी मी करेन अशी शपथ डॉक्टर्सनी घ्यायची असते. पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी डॉक्टरांनी पाळायची आचारसंहिता बनवून, त्याला कायद्याचा आधार देऊन शिवाय त्याबाबत परिणामकारक तक्रार-निवारण यंत्रणा बनवली गेली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. पण आज असलेल्या तक्रार-निवारण यंत्रणांमार्फत रुग्णांना वेळेवर न्याय मिळणे फारसे घडत नाही. त्यामुळे रुग्णांना ज्याबद्दल विश्वास वाटेल अशी परिणामकारक तक्रार-निवारण यंत्रणा उभारणे याची खरी आवश्यकता आहे. पण ते होत नाही या नावाखाली रुग्णांच्या आप्तेष्टांनीच न्यायनिवाडा, कायदा आपल्या हातात घेणे घातक आहे. नेमके हेच वाढत्या प्रमाणावर होऊ  लागले आहे. उपचार करताना काही दुर्घटना घडली आणि रुग्णाचे नातेवाईक सामाजिक-राजकीयदृष्टय़ा बलवान असतील तर तेच झटपट न्यायदानाचे काम करून टाकतात! असे न्यायदान करताना सोयीस्कररीत्या गृहीत धरले जाते की, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळेच वैद्यकीय दुर्घटना घडली. त्यामुळे डॉक्टरला किती शिक्षा द्यायची, किती पैशाची मागणी करायची एवढाच प्रश्न फक्त शिल्लक राहतो! अशीच एक पैसे उकळू पाहणारी घटना नुकतीच आमच्या एका डॉक्टर-मैत्रिणीबाबत घडली. ती अशी-

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!

ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा द्यायची या ध्येयाने एक डॉक्टर-दाम्पत्य ‘इंडिया’ सोडून ‘भारतात’ नाशिकजवळच्या लहान गावात ३० वर्षांपूर्वी गेले. वैद्यकीय नीतिशास्त्र पाळत, सामाजिक भान राखत, साधनसामग्री व प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या तुटवडय़ाशी तोंड देत त्यांनी २८ वर्षे छोटे रुग्णालय चालवून लौकिक कमावला. पण एका घटनेने दाखवले की, या चांगल्या लौकिकाचा आजच्या जगात काही उपयोग नाही. त्यांच्या रुग्णालयात एका मातेला नॉर्मल बाळंतपणानंतर अचानक जोरदार रक्तस्राव झाला, कारण ‘अटॉनिक पीपीएच’ नावाची गुंतागुंत झाली. सर्व डॉक्टर्सना माहीत आहे की, डॉक्टरची काहीही चूक नसताना ही जीवघेणी गुंतागुंत अतिशय क्वचितप्रसंगी उद्भवू शकते. अशा वेळी प्राप्त परिस्थितीत करायचे सर्व औषधोपचार व इतर उपचार लगेच केले गेले. लहान गाव असूनही ताबडतोबीने चार बाटल्या रक्त मिळवून देण्यात यश आले. मातेची परिस्थिती जरा सुधारताच नाशिकमध्ये मोठय़ा रुग्णालयात  पोचवले. डॉक्टर स्वत:ही तिथे गेल्या. रात्रीची व तातडीची वेळ असल्याने सर्व खर्च डॉक्टरांनी स्वत: केला. कुठल्याच बाबतीत वेळ जाऊ  दिला नाही तरी त्या रात्रीच ती माता दगावली. सर्व परिस्थिती नातेवाईकांना समजावून दिली. पण नातेवाईकांनी काहीही समजावून न घेता या दुर्घटनेसाठी या डॉक्टर्सनाच जबाबदार धरले. ‘मृत्यू आमच्या चुकीमुळे झाला’ असे लिहून द्या, त्याशिवाय प्रेत नेणार नाही; तुम्हाला प्रेताबरोबर जाळू अशी धमकी दिली. नवजात बाळाला आम्ही नेणार नाही तुम्हीच सांभाळा अशी भूमिका घेतली. बाळाला आयसीयूमध्ये ठेवायची गरज होती, त्याचे पैसे डॉक्टरांनीच भरावे असा आग्रह धरला. तसेच नंतर २० लाखांची मागणी केली. नाशिकमधील त्या मोठय़ा रुग्णालयामधील सुरक्षा रक्षक व पोलिसी हस्तक्षेप यामुळे डॉक्टर्स बचावले. विशेष दु:खदायक गोष्ट म्हणजे त्या परिसरात इतकी वर्षे इतकी चांगली सेवा देऊनही ‘या डॉक्टरची काहीही चूक नाही; त्यांच्याकडे पैसे मागू नका’ असे आप्तेष्टांना समजावून सांगणारे कोणी नाही. ३५०० बाळंतपणे केल्यानंतर आता मात्र आपल्या रुग्णालयात बाळंतपणे करायची नाहीत असे त्यांनी या घटनेनंतर ठरवले आहे! परिणामी त्या परिसरातील अनेक स्त्रिया बाळंतपणासाठीच्या एका चांगल्या पर्यायाला मुकल्या आहेत.

ही घटना अपवादात्मक नाही. ठिकठिकाणी अशा घटना घडत आहेत. त्या अशाच वाढत राहिल्या तर डॉक्टर-रुग्ण संबंध आणखी बिघडत जातील; प्रश्नाची निरगाठ बनेल. डॉक्टरवर शारीरिक हल्ला, रुग्णालयाची मोडतोड असे काही केले तर आता त्याबाबतचा कडक कायदा झाला असला तरी गुन्हेगाराला प्रत्यक्ष शिक्षा होईल याची खात्री नाही. डॉक्टरला बसणारा मानसिक धक्का, अकारण बदनामी ही फार मोठी शिक्षा असते (डॉक्टरी व्यवसायात लौकिकाला फारच महत्त्व असते हे लक्षात घेऊन डॉक्टर दोषी आहे असे सिद्ध झाल्याशिवाय वृत्तमाध्यमांनी अशा घटनांना प्रसिद्धी देऊ  नये.). अशा दादागिरीमुळे डॉक्टर्सवर तर परिणाम होईलच, पण एकूणच रुग्णांचाही तोटा होईल, कारण एक तर आपल्या रुग्णालयात वैद्यकीय दुर्घटना झाल्यास खंडणी द्यावी लागेल म्हणून डॉक्टर्स त्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवण्यासाठी रुग्णालयाची बिले वाढवतील. दुसरे म्हणजे वैद्यकीय दुर्घटना झाली व नातेवाईक आक्रमक झाले तर त्याला तोंड द्यायला अनेक मोठय़ा रुग्णालयात एक संरक्षण यंत्रणा असते. त्याचा खर्च अर्थात शेवटी रुग्णांवरच पडतो. पण छोटय़ा रुग्णालयांना हे करणे परवडणार नाही. ती फक्त किरकोळ उपचार करतील आणि त्यासाठी जास्त दर आकारतील. त्यामुळे मोठय़ा रुग्णालयाजवळ असलेली छोटी रुग्णालये बंद पडतील. मग मोठय़ा, महागडय़ा रुग्णालयाशिवाय रुग्णांना पर्याय राहणार नाही.

लक्षावधी रुपये खर्च करूनच डॉक्टर्स बनता येईल अशा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमुळे व कॉर्पोरेट रुग्णालये व इतर व्यापारी हितसंबंधांमुळे वैद्यकीय पेशा हा सुसंस्कृत व्यवसाय न राहता केवळ पैसार्थी धंदा बनत चाललेला आहे. त्यामुळे रुग्णांना कटू अनुभव येण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांचा डॉक्टरवरील विश्वास उडू लागला आहे, पण त्याचबरोबर वैद्यकीयशास्त्र व वैद्यकीय नीतिमत्ता यांना अनुसरून व्यवसाय करू बघणारेही अनेक डॉक्टर्स आहेत. सर्व डॉक्टर्सना एका मापाने तोलून चालणार नाही तसेच तोडफोड, धमक्या, पैसे उकळणे या पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकांनी न्याय-निवाडा आपल्या हातात घेऊनही चालणार नाही. दुसरे म्हणजे वैद्यकीय उपचारांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत; पैसे टाकले की यशस्वी उपचार व्हायलाच पाहिजेत अशी मानसिकता बाळगून चालणार नाही. योग्य प्रयत्न करणे एवढेच डॉक्टरच्या हातात असते. अनपेक्षित गुंतागुंत होणे, उपचाराचा दुष्परिणाम होणे हे योग्य काळजी घेऊनही होऊ  शकते. डॉक्टरने मोठी चूक केली (छोटय़ा चुका केव्हा ना केव्हा होतातच) किंवा बेफिकिरी केली, पैसे काढण्यासाठी अकारण शस्त्रक्रिया/ उपचार इ. केले तरच डॉक्टर दोषी असतो व हे ठरवण्याची सुयोग्य यंत्रणा, पद्धत उभारायला हवी.  वैद्यकीय सत्तेपुढे रुग्ण हतबल असतो व भारतात अनेक रुग्णांवर अन्याय होतो हे अगदी खरे आहे. पण प्रश्न आहे की यातून मार्ग कसा काढायचा? वैद्यकीय दुर्घटना झाली तर आप्तेष्टांनी न्याय-निवाडा हातात घेऊन डॉक्टरला सोयीस्करपणे दोषी ठरवून पैसे काढणे, मारहाण करणे हा मार्ग नाही. वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणीकरण होणे, डॉक्टरांनी रुग्णाशी, नातेवाईकांशी नीट संवाद ठेवणे, रुग्ण-तक्रार निवारणाची चांगली व्यवस्था निर्माण होणे हे रुग्णांच्या हतबलतेवर मात करणारे, अन्याय टाळणारे उपाय आहेत. वैद्यकीय दुर्घटना झाली की डॉक्टरला शिक्षा करा हे समीकरण व रुग्णांच्या आप्तेष्टांनी कायदा हातात घेणे घातक आहे. सरकार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, सामाजिक संघटना यांतील सुजाण लोकांनी एकत्र येऊन अराजकाकडे जाणारी ही वाटचाल थांबवली पाहिजे.

 

– डॉ. अनंत फडके