जगातील सर्वात गजबजलेला उपनगरीय रेल्वेमार्ग म्हणून मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गाकडे बघितले जाते. पण रेल्वेमार्गाबरोबरच एकेकाळी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ट्रामचाही आढावा घ्यायलाच हवा. हे करताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे. इतर कोणत्याही सक्षम पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केल्याशिवाय ट्राम बंद करणे, ही मुंबईतील वाहतूक नियोजनकारांची घोडचूक होती..
मुंबई शहराच्या इतिहासात १९ वे शतक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शतकाने सात बेटांच्या या शहरात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणले. ही सात बेटे एकत्रित करून भौगोलिकदृष्टय़ा त्यांचे एक शहर करण्याची प्रक्रिया १८३०मध्ये म्हणजे १९व्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्ण झाली. त्यानंतर या शतकाच्या उत्तरार्धाची सुरुवात होतानाच १८५३ मध्ये मुंबईत रस्ते आणि रेल्वे या दोन गोष्टींची भर पडली. त्यामुळे एक बंदर आणि व्यावसायिक केंद्र म्हणून शहराचा विकास झाला. शहरातील कापड गिरण्या आणि नव्याने सुरू झालेले मुंबई विद्यापीठ यांमुळे शहराकडे येणारे लोंढे वाढत होते. त्यातच जगाच्या दुसऱ्या टोकाला, अमेरिकेत १८६१मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धामुळे भारतातील कापडाची मागणी खूपच वाढली. याचा परिणाम एकंदरीत शहराच्या वाढीवर न होता, तरच नवल! १८२६ मध्ये केवळ १,६२,५७० एवढीच असलेली या शहराची लोकसंख्या १८७२ मध्ये, म्हणजेच केवळ ४६ वर्षांच्या कालावधीत ६,४४,४०५ एवढी वाढली. एकेकाळी मलेरिया, ताप यांचे शहर अशी ओळख असलेली मुंबई हळूहळू कात टाकत होती.
याच दरम्यान मे. स्टर्न्‍स होबार्ट अँड कंपनी या अमेरिकन कंपनीने मुंबईत घोडय़ांची ट्राम चालवण्याचा प्रस्ताव १८६५मध्ये बॉम्बे प्रांताच्या सरकारला सादर केला. सरकारने त्यांना परवानाही देऊ केला होता. मात्र आíथक कारणांमुळे ही ट्राम धावू शकली नाही. १८७१ मध्ये बॉम्बे ओम्निबस सíव्हस या कंपनीने मलबार हिल ते फोर्ट यांदरम्यान घोडय़ांनी खेचल्या जाणाऱ्या बसची सेवा सुरू केली. मात्र ही सेवा खूपच महागडी असल्याने ती ठरावीक स्तरावरील लोकांपुरतीच मर्यादित राहिली.
ट्रामचा जन्म आणि बाल्यावस्था
याच दरम्यान काही कंपन्यांनी मुंबईत ट्राम कार सेवा चालवण्यासाठी मुंबई प्रांतातील सरकारकडे अर्ज केले होते. हे अर्ज पीस ऑफ जस्टिसच्या काही ठरावीक सदस्यांच्या समितीपुढे मांडले. या समितीने मुंबईतील रस्त्यांवर ट्राम धावणे व्यवहार्य ठरेल काय, या ट्रामचे भाडे या आणि अशा अनेक अटी-नियमांवर खल केला. या समितीने आपल्या निष्कर्षांवर आधारित एक मसुदा सादर केला आणि स्टर्न्‍स कंपनीने तो स्वीकारण्याची इच्छा दाखवली. या कंपनीबरोबरच इतरही अनेक कंपन्यांनी मुंबई ट्राम चालवण्याचा परवाना मागितला होता. पण पूर्ण अभ्यास करून अखेरीस मे. स्टर्न्‍स होबार्ट कंपनी आणि मेसर्स जी. ए. किट्टरेज यांना परवाना देण्यात आला. १ मार्च १८७३ रोजी या दोन कंपन्यांबरोबर झालेल्या करारानुसार विल्यम फ्रेन्च स्टर्न्‍स आणि जॉर्ज अल्वाह किट्टरेज या दोघांना मुंबईच्या रस्त्यांवर ट्राम बांधण्याचा, देखभाल दुरुस्तीचा, चालवण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. या करारानुसार एक मल अंतराच्या दोन मार्गासाठी वार्षकि ३००० रुपये आणि तेवढय़ाच अंतराच्या एका मार्गासाठी वार्षकि दोन हजार रुपये एवढी रक्कम दोन टप्प्यांत सरकारला देण्याचे निश्चित झाले. या दोघांनी मिळून न्यूयॉर्कमध्ये द बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मार्च १८७३ मध्ये तिची नोंदणी मुंबईत केली.
ही कंपनी २० वर्षांनंतर किंवा त्यानंतर प्रत्येक सात वर्षांनी विकत घेण्याचा अधिकार द बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला (बीएमसी) बहाल करण्यात आला. मुंबईतील रस्त्यांवर ट्राम चालवण्याबाबत या दोन्ही पक्षांमध्ये करार झाल्यानंतर १८७४मध्ये बॉम्बे ट्रामवेज अ‍ॅक्ट तयार झाला. ९ मे १८७४ रोजी या कंपनीने एका घोडय़ाने खेचल्या जाणाऱ्या आणि दोन घोडय़ांनी खेचल्या जाणाऱ्या अशा दोन प्रकारच्या ट्राम मुंबईच्या रस्त्यांवर आणल्या. पहिल्या दिवसाच्या अनुभवानंतर दुसऱ्याच दिवशी या दोन्ही सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सेवा चालताना त्यांच्या मार्गामधील अडथळे, अनियमितता यांचा निकाल लावण्यासाठी हा उपाय केला गेला. त्यानंतर पहिल्याच आठवडय़ात म्हणजेच ९ मे ते १५ मे यांदरम्यान ३१३५ प्रवाशांनी २९४ फेऱ्यांतून प्रवास केला. या फेऱ्या कुलाबा ते पायधुनी क्रॉफर्ड मार्केटमाग्रे आणि बोरीबंदर ते पायधुनी काळबादेवीमाग्रे या दोन मार्गावर सुरू करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २० गाडय़ा आणि त्या खेचायला २०० घोडय़ांची पागा तनात होती. मुंबईतल्या ट्राम पर्वाची ही सुरुवात होती.
वीज मिळाली ट्रामला..
aniv04मुंबईत ट्राम सेवा रुळल्यानंतर १८९९मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेडने आपल्या ट्राम गाडय़ा विद्युत प्रवाहावर चालवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. सहाच वर्षांनी मुंबई महापालिकेने १९०५मध्ये द बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड (बी. ई. एस. अँड टी. सीओ. एलटीडी.) या कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या ट्रामची ऑर्डर लंडनच्या ब्रश इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आली. ही पहिली ट्राम जानेवारी १९०६मध्ये मुंबईत येऊन पोहोचली. या ट्रामचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. पण ही ट्राम मुंबईकरांच्या सेवेत येण्यासाठी साधारण दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अध्यक्ष वल्लभदास ठाकरसी यांच्या हस्ते ७ मे १९०७ रोजी या विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या ट्रामचे उद्घाटन करण्यात आले. विद्युत यंत्रणेवर चालणारी पहिली ट्राम या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून निघाली. पहिल्या दिवशी ती फक्त क्रॉफर्ड मार्केटपर्यंत जाऊन परत आली. मात्र लवकरच ट्रामला मिळणारा प्रतिसाद एवढा वाढला की, सप्टेंबर १९२०मध्ये शहरातील रस्त्यांवर डबलडेकर ट्रामही धावू लागल्या.
..आणि ट्रामला उतरती कळा लागली
स्वातंत्र्योत्तर काळात तर मुंबईकडे येणाऱ्या लोंढय़ांमध्ये वाढ झाली. १९५२मध्ये ट्राम वाहतुकीबाबत एक सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारे बेस्ट उपक्रमाने काही निवडक मार्गावर थोडय़ाच ट्राम कार्यरत ठेवल्या. मात्र, त्यामुळेही फार काही मदत झाली नाही. ट्राम हे वाहतुकीचे कालबाह्य़ साधन ठरू लागले. त्यामुळे १९५३ पासून बेस्ट उपक्रमाने हळूहळू तोटय़ात जाणाऱ्या मार्गावरील ट्राम बंद करण्यास सुरुवात केली. नळ बाजार ते जेकब सर्कल यांदरम्यान धावणारी १२ नंबरची ट्राम सर्वात पहिली बंद झाली. या मार्गावर बस धावू लागली. त्यानंतरच्या वर्षांत अधिकाधिक ट्रामचे मार्ग बंद पडू लागले. सरतेशेवटी बोरीबंदर ते दादर या एकाच मार्गावरील ट्राम धावत होती. अखेर तीदेखील बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला. आणि ३१ मार्च १९६४ या दिवशी रात्री १० वाजता मुंबईतील शेवटच्या ट्रामने बोरीबंदर ते दादर असा प्रवास सुरू केला. या ट्रामला मुंबईकरांनी साश्रुनयनांनी निरोप दिला होता. मुंबईतील ट्रामपर्व संपले.
लोकलायन
या दरम्यान, १८५३ मध्ये सुरू झालेल्या रेल्वेने आपली दौड सुरूच ठेवली होती. शहराचा विकास होत गेला, तशी या रेल्वेची व्याप्तीही वाढली. हळूहळू शीवपर्यंत आणि माहीमच्या खाडीपर्यंत असलेली मुंबई पुढे सरकत गेली आणि मुंबईतील रेल्वेचे जाळेही विस्तारले. त्यातूनच उपनगरे या संकल्पनेचा उदय झाला. उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाली. १९२५ साली डीसी विद्युत यंत्रणेवरील पहिली ट्रेन मुंबईत धावली. आजही या विद्युत यंत्रणेवरील गाडी हार्बर मार्गावर धावत आहे. विशेष म्हणजे याआधी चार डब्यांची असलेली उपनगरीय रेल्वे सेवा हळूहळू सहा, नऊ, बारा आणि आता पंधरा डब्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची दर दिवशीची प्रवासी संख्या ७५ लाख एवढी आहे. म्हणजे जवळपास पूर्ण शहर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करते. काही ऐतिहासिक कारणांमुळे शहरात दोन समांतर रेल्वेमार्ग आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १३०५ सेवा चालत असून त्यातून ३५ लाख प्रवाशांची वाहतूक होते, तर मध्य रेल्वेवर फेऱ्यांची संख्या १६०० एवढी असून प्रवासी संख्या साधारण ४० लाख एवढी प्रचंड आहे. एवढय़ा प्रचंड प्रवासी संख्येमुळे अपघातांची संख्याही वाढली असून त्यावर सध्या तरी एकच उपाय आहे.
एकात्मिक वाहतूक व्यवस्थेची गरज
शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल, याबाबत वाहतूक नियोजनकारांमध्ये भरभरून चर्चा सुरू आहे. ११.८ किमीचा मेट्रो मार्ग किंवा १९.५ किमीचा मोनोरेल मार्ग तयार करतानाही या नियोजनकारांनी ते दोन्ही एकमेकांना जोडण्याचा साधा विचार केलेला नाही. बेस्ट उपक्रमही आपल्या बसगाडय़ांसाठी नियोजित माíगकांचे नियोजन करत आहे. तर राज्य सरकार अधिकाधिक मेट्रो मार्ग तयार करण्याच्या मागे आहे. या सर्वामध्ये एकत्रित नियोजनाचा प्रचंड अभाव दिसत असून तीच मुंबईपुढील डोकेदुखी ठरणार आहे. वास्तविक एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन १९६४ मध्ये ट्राम बंद करतानाच व्हायला हवे होते. मुंबईतील ट्राम बंद करताना त्या जागी बेस्टपेक्षा सक्षम पर्याय निर्माण व्हायला हवा होता किंवा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रामलाच अधिक प्रभावशाली करता आले असते. मात्र त्या वेळी तसा विचार झाला नाही. कदाचित वाहतूक नियोजनकारांची ही सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल.
(लेखक रेल्वे व ट्राम वाहतूक अभ्यासक असून ‘हॉल्ट स्टेशन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
dombivli police marathi news, police died after falling from moving local train marathi news
कोपर रेल्वे स्थानकाजवळ पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू
khair tree costing of rupees 50 lakhs
वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त