अरुणा शानबागला दयामरण द्यावं, असा अर्ज पत्रकार आणि ‘अरुणाज स्टोरी’ या पुस्तकाच्या लेखिका पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला होता. या पार्श्वभूमीवर अरुणा शानबाग हिच्या भेटीविषयी ‘अरुणाज स्टोरी’ पुस्तकाच्या मराठी अनुवादिका मीना कर्णिक यांनी २०१० मध्ये ‘लोकसत्ता’त लिहिलेला लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत….

केईएम हॉस्पिटलच्या तळमजल्यावर असलेल्या ‘वॉर्ड नंबर ४’ च्या त्या खोलीच्या दरवाजावरचं कुलूप नर्स उघडत होती. आपल्याला काय बघायला मिळणार आहे याची पूर्ण जाणीव असली तरीही मनातली धडधड वाढली होती. इतके दिवस जिची ओळख आपल्याला अक्षरांमधून झाली होती, तिला आज प्रत्यक्ष भेटतोय, असा विचार तर मनात होताच, पण एक बाई म्हणून आपलं काहीतरी परस्पर नातं निर्माण झालंय, असंही वाटू लागलं होतं. तिला भेटावंसं वाटलं होतं ते याचमुळे.
अरुणा शानबाग तेव्हा बरोबर ५० वर्षांची झाली होती आणि तो भयंकर प्रसंग तिच्यावर ओढवला त्याला झाली होती २५ वर्ष. म्हणजे ११ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पिंकी विराणीने लिहिलेल्या ‘अरुणाज स्टोरी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद मी केला होता आणि त्याचा प्रकाशन समारंभही ठरला होता. पण त्या आधी मला अरुणाला भेटायचं होतं. पिंकीचीही तशी इच्छा होती. केईएमच्या तेव्हाच्या अधिष्ठाता प्रज्ञा पै यांची भेट घेतली आणि अरुणाला भेटण्यासाठी लागणारी विशेष परवानगी मिळवली. तिच्यासाठी काहीतरी घेऊन जावं अशी मनापासून इच्छा होती. पण काय न्यायचं? तिला दिसत नाही. ऐकू येतं, पण ते मेंदूपर्यंत कितपत आणि कसं पोहोचतं माहीत नाही. तिला वास येत असेल का? येत असावा, असं स्वत:लाच सांगितलं आणि रजनीगंधाच्या फुलांचा एक मोठा गुच्छ घेऊन मी केईएममध्ये पोहोचले.
अरुणा विकलांग होऊन पडली आहे, तिची अवस्था भयंकर आहे, हे माहीत होतं. पुस्तकाचा अनुवाद करताना ती एखाद्या जवळच्या मैत्रिणीसारखी वाटायला लागली होती आणि तरीही नर्सबरोबर त्या खोलीत शिरल्यावर माझ्या अंगावर काटा आला. समोरच्या पलंगावर पडलेल्या त्या शरीराकडे बघवत नव्हतं. केस पिकलेले होते. दात किडलेले होते. त्वचा पांढरीफट्टक झालेली होती. डोळे सताड उघडे, पण चेहऱ्यावर काही भावच नाहीत. हात-पाय पोटाशी मुडपून अरुणा पडली होती.
‘अशी झोपते ही आणि मग हात किंवा पाय सरळ करायला गेलं की दुखतं तिला. हाताची नखंही काही वेळा पंजात घुसतात,’ पलंगाशेजारी ठेवलेल्या टेबलवर माझ्या हातातला फुलांचा गुच्छ ठेवत नर्सने माहिती पुरवली आणि आपल्या जवळच्या कुणाशी तरी बोलावं तसं अरुणाला म्हणाली, ‘बघ, किती छान फुलं आणलीत तुझ्यासाठी. आवडतील हं तिला ही फुलं खूप,’ हे शेवटचं वाक्य माझ्यासाठी होतं. मी हळूच तिचा हात हातात घेतला. मग काय करावं ते कळेना म्हणून तो तसाच खाली ठेवला. माझ्या घशाशी आवंढा आला होता.
‘अरुणाज स्टोरी’चा मराठी अनुवाद करत असताना अरुणा माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती. तिच्याविषयी पिंकीशी बोलताना, पुस्तकाविषयी चर्चा करताना अनेकदा अस्वस्थ व्हायला व्हायचं. २५ र्वष असं खितपत जगणं याला जगणं म्हणायचं का, हा प्रश्न तेव्हाही अनेकदा मनात आला होता. सगळ्यात चीड आली होती ती अरुणावर बलात्कार करणाऱ्या सोहनलालवर बलात्काराचा गुन्हाच दाखल झाला नाही, ही वस्तुस्थिती कळल्यावर. सोहनलालने कुत्र्याची साखळी तिच्या मानेभोवती आवळली. एवढय़ा जोरात की तीनेक मिनिटांसाठी तिच्या मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा बंद झाला. मेंदूतल्या अनेक पेशी मेल्या. त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती म्हणून त्याने अरुणाला पालथी पाडली आणि गुद्द्वारे बलात्कार केला! पण आपल्या बलात्काराच्या व्याख्येत अशा प्रकारची जबरदस्ती बसत नाही म्हणे! म्हणजे एका बाजूने आपला कायदा तिला मरू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूने तोच कायदा तिच्यावर योनीमार्गाने जबरदस्ती झालेली नाही म्हणून जे काही घडलं, त्याला बलात्कार म्हणणार नाही! म्हणजे ती आहे त्या परिस्थितीत फक्त जगत राहाणार किंवा रोज मरत राहणार. अरुणाचं शरीर तरी किती चिवट पाहा, गेली ३६ र्वष तग धरून आहे. कशासाठी? कसली वाट बघतेय ती? स्वत:ला आणखी किती त्रास व्हायला हवाय तिला?
अरुणाची केस अतिशय वेगळी आहे, याचं कारण तिला दयामरण द्यावं, अशी विनंती करायला तिच्यापाशी एकही नातेवाईक नाही. त्यांनी तिला केव्हाच परकं करून टाकलं होतं. केईएमच्या नर्सेस नसत्या तर.. कदाचित अरुणा इतकी जगलीच नसती. ३६ र्वष एखादा रुग्ण पलंगावर पडून आहे आणि त्या रुग्णाला बेडसोअर्स झालेले नाहीत, असं अरुणाच्या बाबतीत घडलं ते केवळ तिची काळजी घेणाऱ्या नर्सेसमुळे. त्यामुळे आजही ‘आम्ही अरुणाची आणखी कितीही र्वष अशीच काळजी घेत राहू, तिच्यासाठी दयामरणाचा अर्ज करणं म्हणजे आमच्या भावना दुखावण्यासारखं आहे,’ अशा केईएममधल्या मंडळींच्या भावना असणंही स्वाभाविक आहे.
अरुणावर आता कोणतेही उपचार काम करणार नाहीत, असं लक्षात आल्यानंतर केईएमच्या डॉक्टरांनी तिच्या बहिणीला, तिच्या भावाला तिला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. त्यांनी नकार दिला आणि नंतर ते अरुणाला भेटायलाही येईनासे झाले. पण त्यांना दोष देण्याचा अधिकार मला नाही. मूळ इंग्लिश पुस्तक वाचल्यापासून ते पुस्तकाचं भाषांतर करेपर्यंत ज्या अरुणाबरोबर मी जगत होते, तिच्याशी गेल्या ११ वर्षांत मी तरी कुठे संपर्क ठेवला? आज, पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आल्यावरच मलाही तिची आठवण झाली आणि आताही मी असं काय करू शकते तिच्यासाठी, ही अपराधी भावना मनात आहेच. पण एक गोष्ट मात्र मी निश्चित करू शकते. न्यायालय तिच्या दयामरणाच्या अर्जाचा सहानुभूतीने विचार करो वा न करो, निसर्गाने तिच्यावर दया दाखवावी, यासाठी प्रार्थना तरी करू शकते. मीच का, आपण सगळेच, तेवढं तरी किमान करूया.
– मीना कर्णिक

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”