गेल्या काही वर्षांपासून औषधांच्या दुकानांमध्ये पूर्ण वेळ फार्मासिस्ट ठेवले असले तरी पूर्ण देशातील सात लाख दुकाने व हजारो रुग्णालये पाहिली तर फार्मासिस्टची आरोग्यसेवक, समुपदेशक अशी काही संकल्पना रुजलेली दिसतच नाही. आपले फार्मसीचे शिक्षणही फार्मासिस्टची योग्य जडणघडण करण्यास यशस्वी झालेले नाही. याला काही सरकारी घोरणेही कारणीभूत आहेत.. २५ सप्टेंबर या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने या व्यवसायाचा  चिकित्सक वेध घेणारा लेख..

स्वित्झर्लंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा आतडय़ाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. काही प्रयत्न करायला हवेत, असे ‘फार्मास्वीस’ ही फार्मासिस्टची संघटना ठरवते व चालू होते देशव्यापी ‘Say No to Coloretal Cancer’ ही मोहीम. यात देशातील निम्म्याहून अधिक औषध दुकाने सामील होतात. सर्व दुकानांमधून कॅन्सरविषयक माहिती प्रसारित होत राहते. फार्मसीमध्ये येणाऱ्या ग्राहकांशी एका प्रश्नावलीच्या साहाय्याने बातचीत केली जाते व ज्यांच्यामध्ये या कॅन्सरची लक्षणे किंवा शक्यता वाटते त्यांना शौच तपासणी करण्याची विनंती करण्यात येते. या टेस्टचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ असल्यास रुग्णास डॉक्टरांकडे पाठवले जाते. निगेटिव्ह असल्यास पुढे जाऊन कॅन्सर होऊ नये म्हणून जीवनशैली कशी ठेवावी वगैरे समुपदेशन केले जाते. पूर्ण एक-दीड महिना ही मोहीम तीव्रतेने राबवली जाते आणि चक्क कॅन्सरच्या ६० केसेसचे व कॅन्सरसदृश गाठी असलेल्या ५५० केसेसचे निदान यातून होते व ताबडतोब योग्य ते वैद्यकीय उपचार चालू होतात. फार्मासिस्टने केलेल्या या प्रयत्नांमुळे रोगनिदान लवकर होण्यास मदत होते.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

दक्षिण कोरियातील नागरिकांमध्ये तशी आरोग्य व औषध साक्षरता फारशी रुजलेली नाही. औषधांचा चुकीचा वापर, नशिल्या औषधांचा वापर, स्वमनाने औषधे घेणे हे सारे कॉमन. ही परिस्थिती सुधारण्यासाठी फार्मासिस्ट एकत्र येतात व ग्राहकांसाठी ‘एज्युकेटर्स’ होतात. कम्युनिटी फार्मसीमध्ये व रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला औषधविषयक सखोल माहिती व नेमक्या औषधांचा कसा जबाबदारीने विनियोग करायचा याविषयी समुपदेशन केले जाते. इतकेच नाही तर ही औषधांचा जबाबदारीने वापराची मोहीम फार्मासिस्ट समाजात सर्वत्र मिसळून चालवतात. अशा प्रकारे देशातील एक पंचमांश म्हणजे दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात फार्मासिस्ट यशस्वी होतात.

स्कॉटलंडमधील एका वृद्धाश्रमात तेथील नियमांप्रमाणे डॉक्टर्स, नर्सेस व फार्मासिस्टही वृद्धाश्रमाशी संलग्न. कम्युनिटी फार्मासिस्ट येथे दर आठवडय़ाला भेट देतो. गेल्या दोन-तीन भेटींमध्ये फार्मासिस्टला एक महिला रुग्ण कायम खुर्चीत डोके खाली घालून, ग्लानीत बसलेली दिसून येते. पुढच्या भेटीच्या वेळी जेव्हा तेच दृश्य दिसते तेव्हा फार्मासिस्ट तिची अधिक चौकशी करते. तेव्हा या वृद्धेला रोज झोपेच्या गोळ्या व मानसिक आजारांवरील औषधे दिली जातात असे निदर्शनास आले. ती दोन वर्षांपूर्वी जेव्हा वृद्धाश्रमात दाखल झाली तेव्हा ती अत्यंत आक्रमक  होती, तिचा भावनिक उद्रेक वारंवार व्हायचा, म्हणून या औषधांचा मारा तिच्यावर होत होता. फार्मासिस्टने डॉक्टरांशी व नर्सशी सल्लामसलत केली व आपल्याला ही औषधयोजना थोडी खटकते, असे नमूद केले व आता दोन वर्षे होऊन गेली आहेत, आपण गोळ्या कमी करू, डोस कमी करू, तिच्या घरगुती समस्या आठवण करून बघू या, असे सांगितले. सर्वसंमतीने तसे फेरफार उपचारात केले व काही दिवसांतच ही वृद्धा चालू-फिरू लागली व तिची जीवनशैली सुधारली.

नेदरलॅण्ड्समधील औषध दुकाने. आधुनिकीकरण अर्थातच ठायीठायी.  पण सविस्तर आरोग्य व औषधविषयक समुपदेशन तितकेसे सर्वत्र दिसत नव्हते. डच शासनाला फार्मासिस्टच्या या समुपदेशक भूमिकेचे मोठेच महत्त्व वाटत होते व रुग्णांनी औषधे सजगपणे घ्यायची व उपचारांचा अपेक्षित फायदा व्हायचा असेल तर फार्मासिस्टने ही भूमिका करावी यावर शासन ठाम होते. शासनाने एक नवीन नियम केला. एखादा रुग्ण जेव्हा एखादे औषध प्रथमत: घेत असेल तर त्याला फार्मासिस्टने सविस्तर समुपदेशन करावे व रुग्णाने फार्मासिस्टला फी द्यावी. या नियमाने सर्वत्र ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यांनी अशी फी भरण्यास नकार दिला; पण डच फार्मसी संघटनेने शासनाच्या सहकार्याने पूर्ण देशात जनजागरण केले.  ही मोहीम परिणामकारक ठरली. हळूहळू रुग्णांना या सेवेचा अनुभव येऊ लागला व त्यामुळे त्यांच्या औषधोपचाराचे चांगले परिणामही दिसू लागले. फार्मासिस्टची समुपदेशन सेवा उपयुक्तच नव्हे तर आवश्यकही असल्याचा प्रत्यय आला.

विविध देशांत फार्मसी व्यवसायात होणारी प्रगती, फार्मासिस्टची विस्तारत चाललेली भूमिका व त्यासाठी तेथील संबंधितांचा फार्मसी संघटना, शासन, वैद्यकीय व्यावसायिक सहभाग याविषयी थोडी कल्पना वरील उदाहरणे वाचून नक्कीच यावी. फार्मसी व्यवसायाचा आवाका तसा फार मोठा. औषधनिर्मिती, संशोधन, नियंत्रण, शिक्षण यांपासून ते रुग्णांपर्यंत औषध पोहोचविण्याचे काम करणारी कम्युनिटी फार्मसी (औषध दुकाने) व रुग्णालयातील फार्मसी यापर्यंत फार्मसीचे रीतसर शिक्षण घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट. वरील सर्वच क्षेत्रांमध्ये म्हणजे औषधांच्या जन्मापासून ते त्याचा रुग्णाने विनियोग करण्यापर्यंत फार्मासिस्टचा सहभाग समाजाच्या थेट संपर्कात येणारा. फार्मासिस्ट म्हणजे कम्युनिटी फार्मासिस्ट व रुग्णालयातील फार्मासिस्ट. आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू मुख्यत: फार्मासिस्टच्या याच समाजाभिमुख भूमिकेबाबत.

दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे  नुकतीच ७७वी जागतिक औषध परिषद  संपन्न झाली. १२० देशांतील ३००० प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. ‘मेडिसिन्स अ‍ॅण्ड बीयॉँड- द सोल ऑफ फार्मसी’ असे औषधांच्या पलीकडे जाऊन फार्मसी व्यवसायाचा आत्मा शोधणे, असे ध्वनित करणारे बोलके ब्रीदवाक्य या परिषदेचे होते. फार्मासिस्टची भूमिका कशी औषधविक्रीपुरती मर्यादित नाही, तर ती कशी रुग्णाभिमुख होत आहे, फार्मासिस्ट हा कसा आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक आहे, डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासोबत कसे टीमवर्क आहे, याची विविध देशांतील उदाहरणे येथे चर्चा, परिसंवादातून पाहावयास मिळतात व जागतिक स्तरावर फार्मासिस्ट या व्यावसायिकाच्या भूमिकेचा उंचावलेला व रुंदावलेला परिघ लक्षात येतो. ‘ मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब यांचे व्यवस्थापन, रक्तदाब/ रक्तशर्करा तपासणे, रुग्णांच्या घरी जाऊन औषधोपचार तपासणे, औषधांचे दुष्परिणाम रिपोर्ट करणे अशा अनेक प्रगत सेवा बहुतांश देशांत फार्मासिस्टच्या माध्यमातून चालू असल्याचे आपल्या लक्षात येते. या पाश्र्वभूमीवर आपल्या देशातील परिस्थिती पाहिली तर निश्चितच मन विषण्ण होते. काही दुकानांतील संगणकीकरण, उजळणी पाठय़क्रमाला हजेरी लावणारे फार्मासिस्ट व थोडय़ाफार रुग्णसेवा देऊ लागलेले फार्मासिस्ट, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात स्वेच्छेने, आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करणारे डॉट्स फार्मासिस्ट असे चांगले बदल दिसतात; पण ते किती ठिकाणी? मूठभर दुकानांतूनच. पूर्ण देशातील सात लाख दुकाने व हजारो रुग्णालये पाहिली तर फार्मासिस्टची आरोग्यसेवक, समुपदेशक अशी काही संकल्पना रुजलेली दिसतच नाही. आपले फार्मसीचे शिक्षणही फार्मासिस्टची योग्य जडणघडण करण्यास यशस्वी झालेले नाही. शिक्षण, कायदा अंमलबजावणी, धोरणे या आघाडय़ांवर आपण कमीच पडतोय. जे देश फारसे विकसित, प्रगत नाहीत व जेथे फार्मासिस्टची भूमिका आपल्यासारखी एक ट्रेडर- औषधविक्रीपुरती मर्यादित होती, तेथेही बदलाचे वारे दिसू लागले आहेत. फार्मासिस्टची दुकानात गरज आहे का, ही मनोवृत्ती आजही देशात अनेक ठिकाणी आढळते. मग पुढचे बोलणेच खुंटले. केवळ औषधे नव्हे तर रुग्ण हा फार्मसी व्यवसायाचा आत्मा आहे. हा व्यवसाय केवळ इतर वस्तूंसारखा केवळ धंदा नाही, तर तो सामाजिक उद्देश असलेला व्यवसाय आहे; पण हे लक्षात कोण घेतो? मुळात अपुऱ्या शिक्षणामुळे व एकंदर वातावरणामुळे फार्मासिस्टलाच त्याच्या अपेक्षित भूमिकेची जाणीव कमी झाली. धोरणकर्ते, प्रशासन, ग्राहक, इतर आरोग्य व्यावसायिक यांनाही फार्मासिस्टच्या आरोग्य क्षेत्रातील स्थानाची पूर्ण व नेमकी कल्पना नाही. औषधांच्या किमती, जेनेरिक औषधे, जनौषधी इत्यादीबाबत काही घडामोडी होताना दिसतात, त्या स्वागतार्ह आहेतच, पण फार्मासिस्टची भूमिका व्यापक रुग्णहितासाठी सकस व्हावी या दृष्टीने विचार फारसा दिसत नाही. ऑनलाइन मार्गाने औषधविक्रीला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी केंद्र स्तरावर वेगाने होणाऱ्या हालचाली कोडय़ात टाकणाऱ्या आहेत. फार्मसी व्यवसायासमोर खरे तर प्रचंड संधी आहे. आपल्या देशातील आजारांचे ओझे, वृद्धांची वाढती संख्या, समाजातील एकंदर आरोग्याबाबतचे औदासीन्य हे सारे पाहता फार्मासिस्टच्या रुग्णकेंद्रित भूमिकेची देशाला नितांत गरज आहे. हे खरे की, परदेशाप्रमाणेच इथे सर्व रुग्णसेवा फार्मासिस्टने द्याव्यात, ही अपेक्षा सध्या तरी रास्त नाही. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धोरणात्मक असे अनेक फरक इतर देश व आपल्यात आहेत; पण आपला फोकस हा औषधांबरोबरच रुग्णकेंद्रित असला पाहिजे व त्यासाठी सर्व संबंधितांनी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. फार्मसी शिक्षणाची व व्यवसायाची निश्चित दिशा ठरवून पावले उचलणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षीच्या फार्मासिस्ट दिनानिमित्त लिहिताना काही नवीन, सकारात्मक घडामोडी लिहावयास मिळोत, हीच आशादायी सदिच्छा .

प्रा. मंजिरी घरत

लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

 

प्रिय फार्मासिस्ट मित्रा,

नमस्कार!

तुला माझे हे पत्र पाहून खूप आश्चर्य वाटेल. कदाचित ग्राहकांतर्फे लिहिले गेलेले हे पहिलेच खुले पत्रही असेल.

मित्रा, खरे तर तुझी समाजाला फारशी ओळख नाहीच. फार थोडय़ा जणांना फार्मासिस्ट म्हणजे नेमके कोण, हे माहिती असते. काही जणांना वाटते, फार्मसीमधील काऊंटरमागील व्यक्ती फार्मासिस्ट असते. (पण ते तसे असतेच असे नाही. मला अनुभवावरून समजलेय.) मी पहिल्यापासून चौकस ग्राहक व सतर्क रुग्ण. मी तुला पत्र लिहायचे निमित्त म्हणजे २५ सप्टेंबरचा फार्मासिस्ट दिन. ग्राहकांतर्फे तुझ्याकडे मन मोकळे करायचे आहे. सर्वप्रथम आमच्यातर्फे तुला फार्मासिस्ट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आता असं बघ की, आम्ही सारेच प्रत्येक दुखण्या-खुपल्याला तुझ्याकडे धावतो. तुला विचारून व स्वत:ला माहिती असलेली औषधे आम्ही घेतो. तूही आम्हाला सल्ला देतो, अहोरात्र खपून औषधे पुरवतोस.  खरंच ऋणी आहोत आम्ही तुझे. आमचा तुझ्यावर भरपूर भरोसा असतो.

पण जरा वेगळे सांगायचेय तुला. तू जेव्हा आम्हाला औषधे देतोस ना, तेव्हा त्याची थोडी तरी महत्त्वाची माहिती सांग ना आम्हाला. अरे आमच्या प्रिस्क्रिप्शन्समध्ये हल्ली औषधांची भाऊगर्दी असते. आम्हाला त्यातले काही समजत नाही. आम्ही औषधे घेताना किती चुका करतो. गोळ्या घ्यायच्या वेळा विसरतो. मध्येच गोळ्या बंद करतो. तू जर आम्हाला औषधांबद्दल, त्याचा उपयोग, कसे घ्यायचे, जेवणाआधी का नंतर हे सर्व प्रिस्क्रिप्शननुसार समजावून दिलेस तर फार उपयोग होईल आम्हाला त्याचा. तुझ्या दुकानात तू जर आमचे ब्लडप्रेशर वगैरे चेक केलेस ना तरी आवडेल आम्हाला. अरे, आम्हा वृद्धांची संख्या वाढत चाललीये. बीपी, मधुमेह इतकी कॉमन आहे, तुला माहिती आहेच. जागरूक, सजग करण्याची गरज आहे. नुसती औषधांची नाही. आणि ते काम, ते समुपदेशन तुझ्याशिवाय अधिक चांगले कोण करेल? आणि हे तुझे काम डॉक्टरांसाठी पूरकच ठरेल आणि हो, किती जण स्वमनाने काहीबाही घेत असतात.  काही दुकानांतून त्यांना बिना-प्रिस्क्रिप्शनचेही दिले जाते. का करतोस तू असे? काही फार्मासिस्ट अजिबात देत नाहीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय; पण तू म्हणशील कदाचित रुग्णांना समजावण्यास, काऊन्सेलिंगसाठी वेळ नसतो आमच्याकडे. बरोबर आहे; पण तू एकदा रुग्णांसाठी जास्त वेळ देऊ लागलास की रुग्णांनाही त्याचे महत्त्व वाटेल.  तू असेही कदाचित विचारशील की, या रुग्णसेवांचा काही मोबदला? तर असं बघ, सेवा दिली की मेवा (मोबदला) यथावकाश या ना त्या रूपात मिळेलच ना? तू एक चांगला फार्मासिस्ट म्हणून ‘वर्ड ऑफ माऊथ’ने तुझा बिझनेस वाढेल, बोलबाला होईल. पुन्हा आम्हा रुग्णांना तुझ्या सेवेची उपयुक्तता जशी पटेल तसे आम्ही त्यासाठी काही फी द्यायलाही तयार होऊ. परदेशातील फार्मासिस्ट मी पाहिलेत. ते कसे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा असतात, हे मी पाहिलेय. त्यांच्या रुग्णस्नेही कामामुळे प्रत्येक सव्‍‌र्हेमध्ये नागरिक यांना सर्वात विश्वासार्ह व्यावसायिक असा मान देतात. तसे उच्च स्थान तुला देण्यास आम्हाला आवडेल. आम्हाला औषधांसोबतच तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. अजून एक. अगदी मूलभूत मुद्दा.  इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात तुलनेने याबाबतीत स्थिती खूप चांगली आहे. तुझ्या दुकानातील उपस्थितीचे प्रमाण चांगले आहे, असे अलीकडेच कळाले. ते ऐकून बरे वाटले. मला कल्पना आहे की, तुझी भूमिका विस्तारित होण्यास काही अनुकूलता लागेल. तुला स्पर्धा खूप असते या व्यवसायात. अनेक देशांत म्हणे लोकसंख्या किंवा भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणेच दुकानांची संख्या नियंत्रित करतात. तसा काही विचार इथे चालू आहे का? ऑनलाइन फार्मसीनेही तुला स्पर्धा वाटत असेल. या आंतरजालात तुझे मार्गदर्शन, सेवा रुग्णांना कशी मिळणार? या साऱ्या परिस्थितीत तुला ग्राहकांची काही मदत हवी असेल तर जरूर सांग; पण तू जर हा व्यवसाय स्वीकारलास तर या व्यवसायाला अनेक सामाजिक उद्दिष्टे आहेतच ना? आणि खरंच समाजाला तुझी गरज आहे.

तुझा स्नेहांकित

– एक ग्राहक

symghar@yahoo.com