मुक्तसरमधला लंबी, फजिलकातला जलालाबाद आणि अमृतसरच्या पोटातला मजिठा हे तीन मतदारसंघ प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबीयांचे बालेकिल्ले. बादलांच्या राजकीय ताकदीची ही चालतीबोलती प्रतीकं. पण या तीनही ठिकाणची बदलती हवा बादलांच्या एकमुखी वर्चस्वाला धडक देत असेल, तर उर्वरित पंजाबबद्दल वेगळं काय सांगायचं..?

‘सत् श्री अकाल..’ गुरुद्वाराच्या पायऱ्या चढताना समोर दिसलेल्या धर्मगुरूंना अदबीनं नमस्कार केला. हे म्हणजे आपल्याकडं जसं ‘रामराम पाहुणं’, तसं पंजाबमध्ये ‘सत् श्री अकाल’. एकदम आपलेपणाचाच भाव निर्माण होतो. त्यांनी स्मित हास्य केलं. मुख्यग्रंथी कव्वलजितसिंग असं त्यांचं नाव. जुजबी बोलणं झाल्यानंतर त्यांनी जरा आश्चर्यानेच विचारलं, ‘एवढय़ा लांबून निवडणुकीसाठी आलात?’

म्हणालो, ‘हो. तुमचा मतदारसंघ व्हीआयपी आणि तुमचं हे गाव तर व्हीव्हीआयपी..’

ते हसले. माझ्या म्हणण्याचा रोख त्यांना कळला. म्हणाले, ‘निवडणुकीत एवढं काय आहे? निकाल जवळजवळ निश्चित आहे. बडय़ा बादलसाहेबांना काही अडचण नाही.’

‘एवढी खात्री..?’

‘त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय. भव्य स्टेडियम, आयटीआय, मोठे हॉस्पिटल, शाळा-कॉलेज आहे. रस्ते, वीज, पाणी.. या गावात काय नाही ते सांगा.’

‘पण..मग.. लोकांना बदल का हवाय?’

‘मला पंजाबचं माहीत नाही. मी इथलं सांगू शकतो. नव्या पिढीला बदल हवा असतो. ती एका जागी स्थिर नसते. म्हणून तुम्ही तसं म्हणताय. पण बादल सरकारला आणखी एक संधी मिळाली पाहिजे, अर्धवट कामं पूर्ण करण्यासाठी. ते सत्तेवर आले नाहीत तर मग ती कामं तशीच राहतील.’

हरियाणातील सिरसाला मागं टाकून पंजाबमध्ये शिरताना पहिलंच मोठं गाव लागतं, ते लंबी. जिल्हा मुक्तसर. लंबी हा पंजाबातला ‘व्हीआयपी’ मतदारसंघ. तिथून मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल १९९७पासून चार वेळा निवडून आलेत आणि आता ऐन नव्वदीत पाचव्यांदा शड्डू ठोकलाय. प्रकाशसिंग बादल – शरद पवार आणि अकाली दल – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकारणात खूप साम्य आहे. म्हणून सहज वाटून गेलं होतं की, लंबीसुद्धा कदाचित आपल्या बारामतीसारखी असेल, पण तसं काही दिसलं नाही. मग वाटलं, लंबीपासून तीन-चार किलोमीटर बादल हे प्रकाशसिंग बादलांचं ‘व्हीव्हीआयपी’ गाव तरी बारामतीसारखं असेल, पण नाहीच. म्हणायला सर्व काही होतं, पण कोणता तरी ‘एक्स फॅक्टर’ गायब असल्यासारखा वाटत होता. रया गेल्यासारखं हे गाव.. पाच वेळा मुख्यमंत्री झालेल्या नेत्याचं वाटत नव्हतं.

मुख्यग्रंथी कव्वलजितसिंग यांना बादलांबद्दल असलेली सहानुभूती स्पष्टपणे दिसत होती, पण ते बोलण्याच्या ओघात एक खूप महत्त्वाचं वाक्य बोलून गेले.. ‘बादल यांच्याबद्दल तक्रार नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल खूप नाराजी आहे.’ यावर आणखी खोदून माहिती घेण्याचा प्रयत्न; पण त्यांनी काही दाद दिली नाही. त्यांच्याकडील ऐवज संपल्याचं लक्षात येताच पुढे निघालो.

पण इथं बादलांबद्दलचा पहिला खडा लागला होता. तोही त्यांच्याच एका सहानुभूतीदाराकडून. पुढं काय काय हाती येतं याची उत्सुकता होती.

बादल गावातून खेओवालीकडे निघालो. रस्त्यात अधूनमधून बादलांचे झेंडे लावलेल्या गाडय़ा दिसायच्या. जातानाच ओमप्रकाश शर्मा नावाचे निवृत्त डॉक्टर भेटले. या माणसाला पंजाबच्या राजकारणाची खडान्खडा माहिती असावी. त्यांच्या गप्पांतून ते जाणवत होतं. ‘मी बादलसाहेबांचा कार्यकर्ता’ असं अगोदर सांगणारे डॉक्टरसाहेब थोडय़ाच वेळात बादलांच्या जवळच्या कोंडाळ्याच्या कारवाया सांगू लागले. त्यांच्या दहशतीच्या कथा सांगू लागले. मग म्हणाले, ‘टक्कर काँटे की है. बादल कदाचित हरतीलसुद्धा. विजयी झालेच तरी काठावर सुटतील. पण बादलांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यांची इज्जत आम्हाला वाचवावी लागेल. एवढय़ा प्रदीर्घ कारकीर्दीचा मानहानीकारक शेवट होणं कोणालाच आवडणार नाही..’

सत्तेचं राजकारण भावनेवर चालतं बरंचसं. तेव्हा शर्माची ही भावना अतिशय महत्त्वाची होती. त्यांच्यासारखांच्या अनेकांच्या मनातील हळवा, भावनिक धागा बादलांनी घट्ट पकडलाय. म्हणून तर आपली शेवटची निवडणूक असल्यावरच ते भर देऊ  लागलेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही चेहरा ते वापरू लागलेत. संपूर्ण मतदारसंघात मोदींबरोबरची त्यांची शेकडो होर्डिंग्ज लागलीत. यापूर्वी बादलांना जिंकण्यासाठी इतरांची गरज भासली नव्हती. स्वत:च्या लंबीमध्ये मोदींच्या नावानं मतं मागणं म्हणजे पवारांनी बारामतीतून सोनिया गांधींच्या नावानं मतं मागण्यासारखं. पण ही वेळ त्यांच्यावर आलीय. लंबीमधून बादलांच्या पराभवाच्या शक्यतेची साधी चर्चा होणं हेसुद्धा खूपच विलक्षण आहे. बारामतीतून पवारांच्या, अमेठीतून राहुल गांधींच्या, रायबरेलीतून सोनियांच्या, सैफई किंवा मैनपुरीतून मुलायमसिंहांच्या पराभवाची साधी कल्पना तरी आपण करू शकतो का? पण लंबीमध्ये बहुतेक जण हल्ली हेच बोलत आहेत.  आतापर्यंत याच लंबीवासीयांनी बादलांना डोक्यावर घेतलं होतं. आता अचानक ते त्यांना नकोसे वाटू लागले की काय? पंजाबच्या इतर भागांतून वाहू लागलेलं बदलाचं वारं लंबीच्या सीमेवर थडकलं की काय? असे प्रश्न पडण्यासारखी राजकीय स्थिती लंबीत जाणवली. बादलांविरोधात आतापर्यंत ‘ब्र’ काढण्याची हिंमत कुणात नव्हती. त्यांच्या चमच्यांची दहशत मुकाटय़ाने सहन केली जायची. अजूनही केली जाते. गावातल्या चौकाजवळ असणाऱ्या एका दुकानदाराला जरा चावी मारली, तर घडाघडा सांगू लागला, ‘पोलीस त्यांचेच. गुंड त्यांचेच. अवैध धंदे करणारे त्यांचेच. सगळी एकाधिकारशाही. सारे उद्योग त्यांच्याच हातात एकवटलेले. धनधांडगे, जमीनदार यांना त्यांचंच संरक्षण. बादल मंडळींविरुद्धचा सर्वात मोठा आरोप म्हणजे खोटे खटले भरायचे आणि नंतर उपकार केल्याच्या थाटात तडजोड घडवायची. म्हणजे पैसे तर उकळायचे आणि वर उपकाराच्या ओझ्याखाली दाबूनही ठेवायचे. आमचा श्वास आता गुदमरायला लागलाय,’ तो रागारागाने सांगत होता.

आता एवढं आहे म्हटल्यावर बादल नक्कीच पडायला हवेत, पण त्याचं म्हणणं वेगळं होतं. तो म्हणाला, ‘वो बडे लोग हैं. मॅनेज कर सकते हैं. कुछ बता नहीं सकते!’  हा दुकानदार बोलला भरपूर. अगदी बादलांविरुद्ध बोलला, पण अखेपर्यंत त्याने त्याचं नाव नाही सांगितलं. हे भय!

पंजाबात कसलीही लाट येवो, लंबीमध्ये बादल अजिंक्यच राहिलेत. त्यांच्या पराभवाची शक्यता व्यक्त करण्यासही कुणी धजावत नाही, पण आम आदमी पक्षाने जर्नेलसिंगांना तिथं पाठविल्यानंतर चित्र हळूहळू बदलू लागलं.  पी. चिदंबरम यांच्यावर बूट भिरकावणारे हेच ते जर्नेलसिंग. बादलांविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. शिवाय आता तर बादलांना धडा शिकवण्यासाठी कॅ. अमरिंदरसिंग हेसुद्धा पतियाळा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघाबरोबर लंबीतही उतरले आहेत. त्यामुळे एकूणच इथली लढत विलक्षण रंगतदार आणि औत्सुक्याची झालीय.

कॅ. अमरिंदरसिंग. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार. त्यांच्या पक्षाचं कार्यालय चांगलंच गजबजलेलं होतं. अमरिंदर यांचं तरुणापणातलं लष्करी गणवेशातलं भारदस्त छायाचित्र लक्ष वेधून घेत होतं. कार्यालयात पेट्रोल-डिझेलसाठी कूपनं आणि प्रचारासाठी रोख पैशांचं वाटप खुलेआम चाललं होतं. तिथल्या मुख्य नेत्याच्या कपाटात नव्या दोन हजारांच्या नोटांची बंडलंच्या बंडलं होती. वाटपातून मान वर काढायला वेळ मिळाल्यावर तो नेता म्हणाला, ‘बादल तो गये.. आणि जर्नेलसिंगांनी नुसतीच हवा केलीय. त्यांना १५ हजारांपेक्षा जास्त मतं मिळणार नाहीत. या मतदारसंघात ५० टक्के दलित आहेत. आता बसपाचा उमेदवार नसल्याने ही सगळी मते कॅप्टनसाहेबांनाच पडणार, बघा तुम्ही.’ तिथल्या बसपा उमेदवाराचा अर्ज आश्चर्यकारकरीत्या बाद झालाय. ‘प्रसाद’वाटपामुळे कार्यालयातली गर्दी वाढली. तेव्हा तिथून काढता पाय घेतला.

काँग्रेस कार्यालयाला चिकटूनच आपचं कार्यालय. गर्दी खूप होती; पण कार्यालयामागच्या न्याहारी-भोजन मंडपात. न्याहारी आटपून प्रचारासाठी निघालेल्या एका कार्यकर्त्यांला हटकलं, ‘काँग्रेस आणि तुमच्या लढाईत बादल निसटणार का?’ त्यावर त्याचं उत्तर मोठं मार्मिक होतं. तो म्हणाला, ‘बादल नहीं, बदलाव!’ मग तो आपच्या प्रचाराबद्दल सांगू लागला. त्यांचे कार्यकर्ते प्रचार कसा करतात, जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय, बादलांची दहशत कशी झुगारून दिली जातेय, वगैरे वगैरे. बोलता बोलता त्यानं हातातील डायरी दाखविली. त्यात त्याच्या गावातल्या मतदान केंद्रावरच्या २० स्वयंसेवकांची यादी होती. असे २०-२० स्वयंसेवक प्रत्येक बूथवर नेमले आहेत. एकूण आपचं काम पद्धतशीर चाललंय.

जाता जाता तो म्हणाला, ‘पाजी, झेंडय़ावरून जाऊ  नको. झेंडा त्यांचा असला, तरी मत आम्हाला असेल.’ त्यानं आणखी एक माहिती दिली. कदाचित जर्नेलसिंग हे आमचे मुख्यमंत्री असतील. म्हणून तर केजरीवालांनी त्यांना बादलांविरोधात उभं केलंय. त्यात तथ्य असल्यास लंबीमधून तीन भावी मुख्यमंत्री आमनेसामने आहेत म्हणायचं.

लंबीपासून जलालाबाद तासाभराच्या अंतरावर आहे. बादल यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचा हा मतदारसंघ. तिथंही लंबीसारखीच घमासान लढाई सुरू आहे. सुखबीरसिंग यांच्याविरोधात अरविंद केजरीवालांनी उभं केलंय खासदार भगवंत मान यांना. हे वादग्रस्त आणि वायफट आहेत, पण लोकप्रिय आहेत. तेव्हा मग काँग्रेसनंही रवनितसिंग बिट्टू या लुधियानाच्या आपल्या युवा खासदारासारखा मोहरा तिथं पणाला लावला. बिट्टू हे हत्या झालेले, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांचे नातू.

जलालाबादच्या मुख्य चौकामध्ये फळगाडा लावून एक तिशीतला तरुण बसला होता. गुरुप्रीतसिंग त्याचं नाव. त्याला सहजच विचारलं, तर तो एकदम बिनधास्तपणे म्हणाला, ‘इस बार वोट झाडू को. सब को देखा है. अब..’

जलालाबादपासून मजिठा सुमारे चार तासांवर. तिथं जाण्यासाठी पाकिस्तान सीमेला लागून माझ्झा प्रांत (फरीदकोट, तरणतारण वगैरे) ओलांडावा लागतो. वाटेतल्या धाबामालकाकडे जाता जाता निवडणुकीचा विषय काढला. तर तो म्हणाला, ‘हवा बदली हुई है.. फक्त आप की काँग्रेस एवढाच प्रश्न आहे.’ पंजाबमध्ये सध्या सर्वत्र दिसत असलेल्या राजकीय संभ्रमाचा तो प्रतीक होता. या मजिठय़ात उभे आहेत बिक्रमजित मजिठिया. हे सुखबीरसिंगांचे मेहुणे. म्हणजे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे बंधू. इथं ते सर्वात मोठय़ा आव्हानाला सामोरे जात आहेत. पंजाबमधील व्यसनाधीनतेचे सगळं खापर मजिठियांच्या माथी फोडलं गेलं आहे. अमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय तस्कर अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यातून सुटण्याची त्यांची धडपड सुरू आहे.

मजिठय़ातल्या  गॅरेजमध्ये चार-पाच मुलं गप्पा मारत बसली होती. त्यातल्या एकाचं नाव हॅपीसिंग. त्याला विचारलं, ‘काय म्हणतेय मतदारसंघातील हवा?’ एका क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, ‘झाडू की हवा है! इस बार कुछ नया ट्राय करेंगे.. सभी यही कहते हैं. गाव गाव में झाडू की हवा है.’

‘काय म्हणता? म्हणजे इथून मजिठिया हरतील?’

दुसऱ्या तरुणाने होकारार्थी मान हलवली. म्हणाला, ‘हार सकते हैं वो! उनकी दादागिरी बहोत है और नशे का तुम्हें पता ही है..’ त्यानं यूटय़ूबवरची एक क्लिप दाखविली. त्यात मजिठियांचे अमली पदार्थाच्या तस्करांशी संबंध असल्याची बातमी होती.

‘खरोखरच मजिठियांचे तस्करांबरोबर संबंध आहेत?’ दोघेही सूचक हसले. पहिला तरुण म्हणाला, ‘सब उनके ही धंदे है. लेकिन अब उन्होंने कम किया है..’

मुक्तसरमधला लंबी, फजिल्कातला जलालाबाद आणि अमृतसरच्या पोटातला मजिठा हे मतदारसंघ बादल कुटुंबीयांचे शक्तिशाली गड. बादलांच्या राजकीय ताकदीची चालतीबोलती प्रतीकं. साम-दाम-दंड-भेद यांतून अनभिषिक्त स्वामी बनलेल्या बादलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात नमविण्याची गोष्ट सोपी नाही. पण तरीसुद्धा या तीन बालेकिल्ल्यांमधली हवा पालटताना दिसते आहे. बादलांच्या सामर्थ्यांला, एकमुखी वर्चस्वाला ही हवा धडक देऊ  लागल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे. बादलांना कंटाळून भाजपमधून काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ केलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने या वातावरणाचं वर्णन करताना म्हटलंय.. ‘भाग बादल भाग’ जाबमध्ये फिरताना त्याचं प्रत्यंतर जागोजागी येतंच. पण लंबी-जलालाबाद-मजिठामधूनसुद्धा एखादा ‘जायंट किलर’ जन्माला येऊ शकतो, हे दिसतं..

एक तरूण म्हणाला, ‘इस बार कुछ

नया ट्राय करेंगे.. सभी यही कहते हैं. गाव

गाव में झाडू की हवा है.’

‘काय म्हणता? म्हणजे इथून

मजिठिया हरतील?’

दुसऱ्या तरुणाने होकारार्थी मान हलवली. म्हणाला, ‘हार सकते हैं वो. उनकी दादागिरी बहोत है!’

 

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com