दिल्लीच्या आधुनिक कलासंग्रहालयात आपण अमृता शेरगिल यांची चित्रं पाहात उभे आहोत किंवा पॅरिसमधल्या लुव्र म्युझियममध्ये लिओनार्दोचं मोनालिसा बघत असतो असा क्षण फार कमी जणांच्या आयुष्यात येतो. अगदी कला शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी, कलाकार, समीक्षक यांचं कलेविषयीचं ज्ञान, समज हे जगभरातल्या असंख्य चित्रांच्या ‘रिप्रॉडक्शन’ किंवा पुनर्मुद्रणातून तयार झालेलं असतं. मासिकं, पुस्तकांची मुखपृष्ठ, पोस्टर्स आणि आता ऑनलाइन उपलब्ध असलेल्या या चित्र आणि शिल्पांच्या पुनर्मुद्रित प्रतिमांतून हे साकारत जातं; पण ऑनलाइन जगाच्या आधी जेव्हा केवळ छपाईतंत्र वापरून अनेक प्रती छापल्या जायच्या, त्या विविध माध्यमांतून वाचक-समीक्षकांपर्यंत पोहोचायच्या; पण हे छापायचं तंत्र तेवढय़ापुरतं मर्यादित नव्हतं. छपाईची निरनिराळी तंत्रं वापरून चित्रनिर्मिती करणं हेही समांतरपणे घडत होतं. वसाहत काळापासून कलाकारांनी या माध्यमात काम सुरू केलं. बंगालमधल्या बटतला आणि कालिघाटच्या पिट्र्समधून ते लोकप्रिय बनलं. अगदी राजा रविवर्माचं उदाहरण घ्यायचं झालं तर, स्वत:च्या चित्रांची छपाई करून त्यांचा सहजपणे प्रसार त्यांनी केला; पण नंतर मात्र, भारताच्या संदर्भात बघायचं झालं तर, मुद्राचित्रणाची वेगवेगळी तंत्रं ही फक्त पुनर्मुद्रणाचं एक साधन म्हणून न वापरता, स्वतंत्रपणे ‘कलानिर्मिती’साठी वापरली गेली. मग याची मुळे नेमकी कशात शोधायची? चित्रकलेत, रेखाटनात की छपाईतंत्रात? याची वृत्ती आणि दृष्टी कशी समजून घ्यायची? चित्र किंवा शिल्प हे ‘अद्वितीय’ असल्यामुळे त्याच्याभोवती तयार होणारं वलय हे या पट्र्सना लाभलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या माध्यमात काम करणाऱ्या कलाकारांनाही त्यापासून वंचित राहावं लागलं; पण तरीही अनुपम सूदसारखे काही कलाकार यातून स्वत:ला व्यक्त करत राहिले, त्यात प्रयोग करत राहिले.

लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्टमध्ये अनुपम पिट्रमेकिंग शिकल्या. दिल्ली कॉलेज ऑफ आर्टमध्ये अनेक र्वष त्यांनी पिट्रमेकिंग शिकवलं. त्या दिल्ली कॉलेजला शिकत असताना ‘आधुनिक पिट्रमेकिंगचे पितामह’ मानले जाणारे सोमनाथ होर तिथे पट्रमेकिंग विभागाचे प्रमुख होते. होर आणि जगमोहन चोप्रांनी पिट्रमेकिंगला ‘फाइन आर्ट’ म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले. वेगवेगळ्या प्रकारे जुळणी आणि मिश्रणं करून पाहायला ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत. बराच काळ एकाच पिट्रवर त्यांचं काम चालत असे. लिथोग्राफ, एचिंग, वुडकट इत्यादी प्रक्रियांतून मनाजोगते पोत, रंगरचना आणि प्रतिमा तयार होत. याच देवाणघेवाणीतून ‘ग्रुप ८ (एट)’ या पिट्रमेकर कलाकारांच्या गटाची स्थापना झाली. पिट्र्स तयार करायला लागणाऱ्या साहित्याला स्वस्त पर्याय वापरायला त्या काळात सुरुवात झाली. िझक प्लेटऐवजी कार्डबोर्ड वापरून प्रयोग केले गेले किंवा अगदी उसाच्या चरकासारखी यंत्र वापरून त्यात थोडे फेरफार केले. ही यंत्राची सुधारित आवृत्ती इंटॅग्लिओ प्रेस म्हणून कलाकार सहजपणे वापरू शकत. अनुपम सूद या गटातल्या सर्वात तरुण कलाकार. पिट्रमेकिंगविषयी कलाजगतात आणि इतरत्र भान तयार करण्याचं मोठं काम या गटाने त्या काळात केलं. ते करताना चोप्रांनी तरुण कलाकारांना साधनंही उपलब्ध करून दिली. अनुपम सूद सांगतात, ‘‘कॉलेजबाहेर पडलं की पिट्रमेकिंग करायला दुसरी कुठलीच जागा नव्हती. त्यामुळे कलाविष्काराचं एक माध्यम म्हणून त्याचं भवितव्य काय अशी मला तेव्हा भीती होती. एक तर पिट्रमेकिंगला नेहमीच कमी लेखलं जायचं. दुसरं म्हणजे, त्याची मोठाली यंत्रं, रसायनं याचा खूप खर्च असायचा. त्यामुळे आपापल्या स्टुडिओत बसून एकटीनं चित्रं काढण्याइतकं ते सहज नव्हतं.’’

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

अनुपम मुख्यत्वे करून इंटॅग्लिओ प्रक्रियेने चित्रनिर्मिती करू लागल्या. त्यात एचिंग, ड्राय पॉइंट, विस्कॉसिटी अशी विविध तंत्रं वापरून त्या पिट्र्स तयार करत आल्या आहेत. यात माध्यमावर त्यांचा असलेला ताबा आणि त्या प्रक्रियांचा संयमित वापर हा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यम प्रक्रियेचा गाभा राहिलेला आहे. सुरुवातीला वास्तुरचना, पडक्या िभती, बाकडी, चौकोनी तुकडे आणि त्यानंतरच्या टप्प्यात मानवी वेदना-संवेदना आणि सहवेदनेचं चित्रण त्यांच्या या चित्रांतून आणि पिट्र्समध्ये दिसून येतं. माणसं आणि त्यांचं अस्तित्व या अवकाशात वरचढ ठरलेलं दिसतं; पण एकच एक अवकाश आणि माणसाचं असणं यापुरतं ते मर्यादित राहात नाही. माणसांची समांतर आयुष्य, त्यांची भावविश्वं, त्यातले कधी एकमेकांना छेदणारे अनेक मार्ग आणि प्रवृत्ती यांनी ते अवकाश व्यापलेलं असतं. रस्ते, फुटपाथ, वस्त्यांमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहणारी माणसं यांच्या पाश्र्वभूमीवर उच्चभ्रू वर्गातल्या माणसांचं आरेखन सहानुभावातून येतं. माणसा-माणसांतील सामाजिक-आíथक दरी, ‘आयसोलेशन’ या मालिकेतून माणसाच्या एकाकीपणाचं, त्यातूनही टिकाव धरताना आलेल्या असहायतेचं चित्रण समोर येतं, तर ‘डायलॉग’ या मालिकेतून माणसांमधल्या संवादाचं आणि सांधलेपणाचं.

सुंदर पृष्ठभागीय रचना, चित्रातले तेजस्वी रंग अशी वैशिष्टय़ं असलेल्या या पिट्र्स मानवी नात्यातल्या भावभावनांचं, आनंदाचं, वेदनेचं, ताणतणावाचं चित्रण करतात. त्या मानवी आकृती नग्न असतात, कधी मुखवटे घातलेल्या, कधी वस्त्रांकितही. चित्रातली ही माणसं एकमेकांशी संवाद साधतात, कधी विसंवादी सूर जाणवतात, भावनिक किंवा शारीरिकदृष्टय़ा त्या माणसांचं ‘तिथं’ असणं/नसणं हेदेखील जाणवत राहातं. यातून अनुपम कधी स्वत:ची गोष्ट सांगतात, कधी मिथकं तर कधी इतिहासाचे दाखले वापरतात. पाहणाऱ्या व्यक्तीला त्यात अनेक अर्थ उमगू लागतात. ही माणसांची शरीरं केवळ शारीर अवस्था दर्शवीत नाहीत तर व्यक्तींमधला, समूहातला झगडा व तणाव पुढे आणतात. या मानवी शरीराच्या चित्रणात बुरसटलेली नाती असतात, त्यातले सत्तासंघर्ष असतात. त्या शरीरात माणसांचं अस्वस्थपणा आणि अडकलेपण जाणवत राहतं. या मानवाकृतींच्या आत वळलेल्या नजरा त्या अडकलेपणातून सुटका करून घेण्याकरिता आसुसलेल्या दिसतात. अनुपम यांच्या पिट्र्स व चित्रात मुख्य चित्रण हे स्त्रीविषयी असलं तरी त्यात स्त्रीचं वस्तुकरण झालेलं दिसत नाही. त्या स्त्रीकडे केवळ जीवशास्त्रीय वस्तू म्हणून पाहात नाहीत. हे चित्रण पितृसत्ताक समाजरचनेत घडणाऱ्या स्त्रीच्या जगण्याविषयी नक्कीच असतं. पण म्हणून ते पुरुषाभोवती रचल्या गेलेल्या सामाजिकतेत स्त्री ही दुय्यम दर्जाची अशा प्रकारे येत नाही. त्यामुळे शारीरिक किंवा लैंगिक बंधनात न अडकता त्यातून बाहेर पडण्याकरिता धडपडणारी स्त्री त्यांच्या चित्रातून आपल्यासमोर येते. शरीराचे निरनिराळे अवयव, स्नायू, जननेंद्रिय आणि त्यातून घडणाऱ्या कृती यातून त्यांच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा नेहमीच्या सरधोपट प्रतिमांच्या पलीकडे जातात. यात अंतर्वस्त्रांमध्ये हातात बॅट घेऊन जोरकसपणे रस्त्यावर फिरणारी बाई, रस्त्यावरच्या पुरुषी नजरांना तोंड देत, त्यांच्या नजरेला भिडत करारीपणे चालत राहिलेली ही बाई दिसते. खमक्या, कणखर कामगारवर्गातल्या स्त्रियांचं चित्रण केलेलं दिसतं. या स्त्रिया िलगभेदावर आधारलेल्या सांस्कृतिक-सामाजिक रचनेला त्यांच्या परीने धक्के देतात, त्याचा प्रतिकार करतात. अनुपम यांच्या चित्रातल्या स्त्री प्रतिमा त्यांची लैंगिकता आणि वैश्विक अनुभव हे त्यांच्या स्वत:च्या जाणिवेतून मांडतात- पुरुषी कल्पनारम्यतेतून नव्हे. त्यातल्या बऱ्याचशा प्रतिमा या त्यांच्या व्यक्तिगत आठवणी आणि भूतकाळातून साकारलेल्या दिसतात.

गेली अनेक र्वष पिट्र्स करणाऱ्या आणि ते तंत्र शिकवणाऱ्या सूद म्हणतात, ‘‘माझ्या कामात मी माझे अनुभव टिपत राहते आणि माझ्या भवतालाचा अनुभव मला माझ्या स्त्री असण्यातून येतो. एक स्त्री म्हणून मी त्या सर्वाचा अर्थ लावू पाहते. या अनुभवातून काय कमावलं, काय गमावलं हे मनावर ठसत जातं. काही वेळा तुम्ही एखादी गोष्ट पाहता आणि त्यातली संदिग्धता तुम्हाला जाणवत राहते. माझ्या कामात विनोदाचं सार आहे, पण काही लोकांना तो उपहासही वाटू शकतो. कारण त्यातली सीमारेषा अगदीच धूसर असते.’’

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.