आपल्या लेखनातून वैश्विक भान प्रकट करणाऱ्या मराठीतील मोजक्या लेखकांपकी एक म्हणजे पत्रकार-लेखक अरुण साधू. त्यांच्या मुंबई दिनांकआणि  सिंहासनया दोन कादंबऱ्यांमुळे मराठीत राजकीय कादंबरीचा उदय झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, त्याहीपलिकडे जग जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या तरूणांची वाचनभूक त्यांनी भागवली. जवळपास पाच दशके लेखन-चिंतनात वाहून घेतलेल्या अरुण साधू यांच्या निधनाने वैश्विक मूल्यदृष्टीशी इमान राखणाऱ्या साहित्यिकाला मराठी समाज मुकला आहे.

म राठी साहित्याचा आवाका तरी किती? आजचे राहूच द्या, मात्र पाच दशकांपूर्वीच्या साहित्यात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास फारसे समाधानकारक उत्तर हाती लागत नाही. अशा काळात लिहू लागलेल्या आणि आपल्या लेखनातून वैश्विक भान प्रकट करणाऱ्या मराठीतील मोजक्या लेखकांपकी एक म्हणजे पत्रकार-लेखक अरुण साधू हे होत. १७ जून १९४१ रोजी अमरावतीमधील परतवाडा येथे जन्म झालेल्या साधूंनी पुढे विदर्भ महाविद्यालयात गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी घेतली. साठच्या दशकाच्या सुरुवातीला काही काळ त्यांनी अकोला येथे अध्यापनही केले. मात्र भवतालातील जगण्याविषयी प्रचंड औत्सुक्य असलेल्या साधूंनी लवकरच पत्रकारितेत प्रवेश केला. पुण्यात ‘केसरी’मधून पत्रकारितेला सुरुवात करून पुढे त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये दोनेक वष्रे पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम केले. नंतर १९६६-६७ या काळात ते श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम पाहात होते. माजगावकरांच्या प्रेरणेने ‘माणूस’मध्ये साधूंनी चिनी क्रांतीवर आधारित ‘..आणि ड्रॅगन जागा झाला’ ही लेखमाला वर्षभर लिहिली. तिला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद तेव्हा मिळाला. विशेषत: साठच्या दशकातील जग जाणून घेण्याचा (आणि बदलण्याचाही) उत्साह काठोकाठ भरून असलेल्या तरुणवर्गाची वाचनभूक या लेखनाने भागविली. ‘माणूस’मध्येच त्यांनी ‘क्युबन क्रांती’, ‘व्हिएतनाम युद्ध’ अशा अनेक वैश्विकदृष्टय़ा महत्त्वाच्या विषयांवर लिहिले. हे व अशा प्रकारचे लेखन तेव्हा मराठी माध्यमांमधून पहिल्यांदाच होत होते. ‘टाइम-न्यूजवीक’सारख्या अमेरिकी नियतकालिकांमुळे वैश्विकतेशी मराठीतील बुद्धीवादी-मध्यमवर्ग परिचित होता. मात्र सामान्य मराठी वाचकवर्ग या साऱ्यापासून दूरच होता. साधूंच्या आणि एकंदरीतच ‘माणूस’मधील लेखनाने हे भान मराठी पत्रकारितेत आणले. आणि खऱ्या अर्थाने मराठीत नवपत्रकारिता रुजली असे म्हणता येईल. पत्रकारिता म्हटले की लेखकपण अपरिहार्यपणे आलेच. परंतु त्यातही ललित लेखनात आपल्या लेखनीचा ठसा उमटवणारे पत्रकार अगदीच तुरळक. अरुण साधू हे अशा तुरळकांपकीच एक. त्यांचे लेखन पाहिले की याचा प्रत्यय येतोच.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

पुण्यातील पाचेक वर्षांच्या वास्तव्यानंतर साधू पुन्हा ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले, ते मुंबईत. या महानगराच्या जीवनातील अनेक ताणेबाणे, तेथील राजकारण-समाजकारण, दृश्य-अदृश्य जग यांचा अनुभव पत्रकार म्हणून त्यांनी घेतला. पुढे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी म्हणून काम पाहताना मुंबईतील दलित पँथर चळवळीच्या उदयास्ताबद्दल त्यांनी इंग्रजी जगाला ओळख करून दिली. एकूणच मुंबईच्या सौंदर्य-कुरूपतेसकटचा घेतलेला अनुभव साधूंना ‘मुंबई दिनांक’ ही कादंबरी लिहिण्यास प्रेरक ठरला. १९७३ची ही कादंबरी आणि त्यानंतर १९७७ मध्ये आलेली ‘सिंहासन’ ही कादंबरी. या दोन कादंबऱ्यांतून साधूंनी सर्वसामान्यांना परिघावरून पाहावे लागणारे राजकीय जग व त्यातील सत्तास्पर्धा चित्रित केली. या दोन कादंबऱ्यांमुळे मराठीत राजकीय कादंबरीचा उदय झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आधीच्या काळात माडखोलकरांसारख्या लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांतून राजकीय जग दिसे, मात्र त्यात वास्तववादापेक्षा कल्पनेचा भर अधिक. त्यामुळे त्या तेव्हाही (आणि आजही) फारच उथळ वाटत. अशा वेळी साधूंच्या कादंबऱ्यांतून सशक्तपणे आलेले राजकीय भान हे मराठीत नवीन तर होतेच, पण ते अधिक मूलगामी होते. त्यामुळेच या दोन कादंबऱ्यांवर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपट ‘आज’चाच वाटतो. त्यांच्या या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांचे राजकीय शिक्षण झाले का किंवा वाचकांना राजकीय प्रक्रियांकडे आकर्षित केले का, हा चच्रेचा मुद्दा असला तरी या लेखनामुळे राजकीय कादंबरीकार ही त्यांची ओळख दृढ झाली.

नंतरच्या काळात त्यांनी मानवी अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या तरी त्यातही सामाजिकतेशी असलेली वीण सुटलेली नाही. ‘तडजोड’, ‘बहिष्कृत’, ‘त्रिशंकू’, ‘शापित’, ‘शोधयात्रा’, ‘झिपऱ्या’ या त्यांच्या कादंबऱ्याही आधीच्या दोन कादंबऱ्यांइतक्याच सशक्त होत्या. विशेषत: ‘त्रिशंकू’ आणि ‘मुखवटा’ या दोन कादंबऱ्या तर अगदीच मोलाच्या. मात्र या कादंबऱ्यांची म्हणावी तशी दखल मराठी वाचक-समीक्षकांनी घेतली नाही. असे असले तरी त्याची खंत त्यांना नव्हती. कादंबरीबरोबरच साधूंनी कथा व नाटय़ लेखनही केले. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘मुक्ती’, ‘बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती’, ‘मंत्रजागर’ आदी संग्रहांत मिळून त्यांनी तब्बल ६० कथा लिहिल्या. जगजाणिवेचा आवाका कथेत यायला हवा, असे त्यांचे मत होते. ते त्यांच्या कथांमधून प्रत्ययाला येते. १९८५ साली आलेले त्यांचे ‘पडघम’ हे नाटक सर्वव्यापी प्रस्थापित व्यवस्था व त्याविरुद्ध समाजाच्या अंत:प्रवाहातील खळबळींमुळे उभ्या राहणाऱ्या संघर्षांची अपरिहार्यता अधोरेखित झाली आहे. याशिवाय चरित्रपर लेखन आणि अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच डॉ. आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटांचे पटकथालेखनही त्यांनी केले. एका बाजूला ललितप्राय लेखनात मुशाफिरी करतानाच पत्रकारिताही त्यांनी उत्तमपणे सांभाळली. ‘द फ्री प्रेस जर्नल’चे संपादकपदही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले. मात्र जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागण्यापूर्वीच, १९८९ मध्ये त्यांनी पत्रकारिता सोडली. २००७ साली नागपूर येथे पार पडलेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा प्रकारे जवळपास पाच दशके लेखन-चिंतनात वाहून घेतलेल्या आणि अनाग्रही, मितभाषी अरुण साधू यांच्या निधनाने वैश्विक मूल्यदृष्टीशी इमान राखणाऱ्या लेखकाला मराठी समाज मुकला आहे.

पत्रकारिता आणि साहित्य या दोन्हीतील भान सजगपणे अरुण साधू यांनी जपले. त्यांच्या सर्व लेखनातून त्यांनी संयमाने समाजमनाची चिकित्सा केली. साधू यांच्या निधनाने एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

शरद पवार, ज्येष्ठ नेते

अरुण साधू हे मूळचे विदर्भाचे असल्याने त्यांच्याशी थोडाफार वैयक्तिक संबंध आला होता. त्यांची खरी ओळख मात्र लेखनातूनच झाली. त्यांचे लेखन सर्वात आधी वाचले ते ‘माणूस’ या साप्ताहिकातून. ‘माणूस’मध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल साधू लिहीत, त्यातून माहिती मिळेच पण ते लिखाण वाचनीयही असे. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या तत्कालीन राजकारण व सत्तास्पर्धेचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांमुळे मराठी साहित्यात त्यांचे वेगळे असे स्थान आहे. सामान्य माणसाच्या परिचयाचे नसणारे जग त्यांनी आपल्या लेखनातून उलगडले. पुढील काळात त्यांनी आत्मशोधात्मक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांचे लिखाण हे गंभीर विषयांवरील असूनही त्यांची लिहिण्याची हातोटी सामान्य वाचकापर्यंत पोहोचणारी होती.

वसंत आबाजी डहाके, साहित्यिक

अरुण साधू यांच्या लेखनातून नेहमीच राजकीय आणि सामाजिक सद्य:स्थितीचे प्रतिबिंब उमटले आणि वास्तवाचे दर्शन घडले. त्यांनी मोजक्याच कथा लिहिल्या. ते हाडाचे कादंबरीकार होते. नम्र आणि मृदुभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. साधू यांच्या निधनाने साहित्य आणि पत्रकारितेतील एक मोठे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

डॉ. विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक

भूमिका घेणारे आणि त्यावर ठाम राहणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. समताधिष्ठित समाजासाठी लोकानुवर्ती विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि पत्रकारितेचा मूळ आधार होता. मराठीत त्यांनी वेगळ्या शैलीची, वेगळ्या विषयांची आणि आशयाची समृद्ध भर घातली. राजकीय कादंबरी लेखनाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

‘ग्रंथाली’ वाचक चळवळीपासून आमचा परिचय झाला. त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे लेखन हे नेहमीच ताजे व टवटवीत होते. समाजातील सद्य:स्थिती आणि घटनांवर त्यांचे लेखन असल्याने ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचे. मूलभूत मानवी स्वभावाच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून सहजपणे दिसून यायचे. ‘सिंहासन’ ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण आहे.

रामदास फुटाणे, ज्येष्ठ हास्यकवी

१९६०च्या दशकात मी ‘आयआयटी’ मुंबई मध्ये शिकत असताना अरुण साधू यांच्याशी ओळख झाली. परस्पर परिचय वाढल्यानंतर १९७०च्या दशकात ते काम करत असलेल्या विविध चळवळींकडे खेचला गेलो. ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले. विवेकवाद आणि विज्ञानवादी दृष्टी ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़े होती. माझ्या ‘नादवेध’ या पुस्तकाचे परीक्षण साधू यांनी ‘लोकसत्ता’त केले होते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने माझ्या पुस्तकाचे परीक्षण केल्याने मला खूप आनंद झाला.

अच्युत गोडबोले, लेखक व आयटीतज्ज्ञ

अरुण साधू हे संवेदनशील माणूस होते. त्यांचाकडे विलक्षण निरीक्षण शक्ती होती. सामान्य मानवी मन आणि समाजातील घटना यांचा संबंध ते सातत्याने शोधत असल्याने त्यांचा लेखनात ते उमटून येत असे. समाजाविषयी त्यामधील विषमतेविषयी त्यांचा मनात प्रचंड तडफड होती. एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची प्रचंड ताकद त्यांच्याकडे असल्याने एक चित्रकार म्हणून मला त्यांचे लेखन दृश्यस्वरूप वाटते.

सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार

पत्रकारितेची आवड असल्याने त्यांचा घरी चर्चा करण्यासाठी जात असे. ‘देवत्व की माणूस’ या विषयावर आमच्या गप्पा रंगायच्या. त्यांच्या बरोबरच्या संवादातून मला नेहमीच वैयक्तिक पातळीवर खूप काही मिळाले. विचार आणि शब्दांच्या माध्यमातून समाजाला जागे करणारे मोठे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक

त्यांचा स्वभाव शांत असल्याने त्यांच्या लेखनातही सहजता दिसून यायची. त्यांच्या सहवासात मला नेहमी काही ना काही नवीन गवसायचे. नवीन लेखकांच्या पुस्तकाबद्दल त्यांचा मनात आपलेपणा होता. नवोदित साहित्यिकांचे व त्यांच्या साहित्याचे ते कौतुक करीत असत. त्यांना प्रोत्साहन देत.

कुमार नवाथे, लेखक