कामगारहिताशी तडजोड न करणारा, नि:स्वार्थी  आणि पारदर्शी कामगार नेता अशी ओळख असलेल्या बगाराम तुळपुळे यांचे अलीकडेच  निधन झाले. अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर आयुष्यभर सोशल इंजिनीअरिंगचे काम केलेल्या या विलक्षण कामगार नेत्याशी चाळीस वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या सुह्रदाने त्यांच्या जागवलेल्या आठवणी..

बगाराम तुळपुळे गेल्याची बातमी वाचली आणि कामगार चळवळीमधील एका ज्येष्ठ विचारवंताचा शेवट झाल्याबद्दल हळहळ वाटली. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शिवाजी पार्कजवळील ‘युक्रांदच्या गच्चीवर’ त्यांच्याशी माझा संवाद झाला. तेव्हा कामगार चळवळ हे वर्गलढय़ाचे हत्यार आणि कामगार हा क्रांतीचा अग्रदूत असल्याचा माझा समज होता. त्यामुळे कामगार चळवळ सक्षम होऊन कामगार संघटनांनी इतर कोणाच्या मध्यस्थीशिवाय मालकाशी सामूहिक सौदा करून आपले जीवन संपन्न करावे हा विचार मला पटणारा नव्हता. त्यानंतर काही काळ गेल्यावर जनता पक्षाची राजवट सुरू असताना भटकळ स्मृती व्याख्यानमालेत प्रा. वि. म. दांडेकर यांनी संघटित विरुद्ध असंघटित या वादाला तोंड फोडले. त्या वेळी दांडेकरांना उत्तर देण्यासाठी कामगार नेत्यांपैकी ज्या कोणी नेटाने प्रयत्न केला त्यामध्ये बगाराम तुळपुळे हे अग्रणी होते. त्यांनी संघटित कामगार हा ‘आहे रे’ गटाचा भाग झाल्याचा दांडेकरांचा युक्तिवाद अतिशय समर्थपणे खोडून काढला. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला.
पुढे १९८० च्या मध्यावधी निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पुन्हा सत्ताधारी पक्ष झाला. या राजकीय बदलामुळे निराश झालेल्या काही समाजवादी विचाराच्या तरुण कार्यकर्त्यांची एक अनौपचारिक बैठक दादरच्या मिल मजूर युनियनच्या कार्यालयात झाली. सदर बैठकीला हुसेन दलवाई यांनी मला अक्षरश: पकडून नेले. या बैठकीत उपस्थितांपेक्षा माझा सूर वेगळा लागला आणि तो तुळपुळे यांना आवडला. त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केले. एवढेच नव्हे, तर पुढे दोन वर्षांनी हिंद मजूर सभेच्या संशोधन विभागातर्फे करावयाच्या संशोधन प्रकल्पासाठी काम करण्याची संधी त्यांनी मला दिली. या प्रकल्पावर काम केल्यामुळे माझ्यासारख्या साध्या साक्षर माणसाच्या जाणिवा आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास खूपच मदत झाली.
तुळपुळे हे कामगारांचे नेते असले तरी त्यांचा व्यासंगही खूप दांडगा होता. एवढेच नव्हे, तर अत्यंत गुंतागुंतीची, अवघड समस्या साध्या कार्यकर्त्यांनाही सहज समजेल अशा पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण या सदरात मोडणारी होती. उदाहरणार्थ, इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत          न्या. गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. सदर आयोगातर्फे भारतामधील विविध शहरांमध्ये कामगारांना त्यांच्या किमान गरजा भागविण्यासाठी किती खर्च येतो याचा आढावा घेण्यात आला होता. आणि असा अभ्यास करताना किमान खर्चाचा तपशील निश्चित करताना संगणकाचा वापर करण्यात आला होता. यावर भाष्य करताना तुळपुळे यांनी प्रतिपादन केले की, आयोगाने दाखवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत कामगारांना आपले जीवन बेतायचे असेल, तर सतत जीवनोपयोगी वस्तूंच्या किमती बदलत असल्यामुळे खर्चाचा तपशील ठरविण्यासाठी संगणकाचा वापर अनिवार्य ठरतो. प्रत्यक्ष व्यवहारात ही गोष्ट अशक्यप्राय असल्यामुळे आयोगाने सुचविलेल्या खर्चापेक्षा कामगारांना प्रत्यक्ष जीवनात अधिक खर्च करावा लागणे अपरिहार्य ठरते.
कामगारांच्या नेत्याचे आयुष्य अत्यंत धकाधकीचे असते. त्यात हिंद मजदूर सभेसारख्या केंद्रीय कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदावरील माणसाला मोकळा श्वास घ्यायलाही फुरसत नसते. अशा धकाधकीच्या जीवनातही व्यासंग सुरू ठेवून आपली वैचारिक भूमिका ठरविण्याचे काम तुळपुळे कसे करू शकले याचे अभ्यासकाला आश्चर्य वाटावे. एकदा किमान वेतन या विषयावरील चर्चासत्रात एचएमएसच्या कार्यकर्त्यांपुढे आपले विचार मांडताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर किमान वेतन ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडण्याऐवजी दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाशी जोडल्यास कामगारांना आर्थिक विकासाचा लाभ मिळेल, असा युक्तिवाद केला. अशा विचाराचा पाठपुरावा करण्याचे काम त्यांच्या एचएमएसनेही केले नसावे.
सत्तरीच्या दशकात, म्हणजे कामगार नेत्याच्या ऐन उमेदीत मोहन कुमारमंगलम यांनी गळ घातल्यामुळे त्यांनी दुर्गापूर येथील सार्वजनिक क्षेत्रामधील पोलाद कारखान्यात जनरल मॅनेजरपदाचा कार्यभार स्वीकारला. सदर कारखाना कामगारांचे संप आणि अधिकाऱ्यांची वारंवार गैरहजेरी यामुळे अभावानेच सुरू राहायचा. तेथे तुळपुळे यांनी जादू केल्याप्रमाणे कामगारांचे प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत निर्माण करून तेथील अनागोंदीचा अंत केला. यामुळे केवळ कामगार चळवळीत नव्हे, तर व्यवस्थापकांच्या वर्तुळातही त्यांचा दबदबा निर्माण झाला. सार्वजनिक उद्योगातील व्यवस्थापनात कोणते बदल गरजेचे आहेत यासंदर्भात त्यांनी विस्ताराने विवेचन केल्याचे निदर्शनास येते. औद्योगिक कलह निर्माण होण्यामागची कारणे माणसाने निर्माण केलेली आहेत. त्यामुळे ती संपविण्यासाठी आपल्यालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील अशी त्यांची धारणा होती.
तुळपुळे हे उच्चभ्रू घरातून चळवळीत आलेले नेते होते. तरीही त्यांची राहणी अत्यंत साधी, म्हणजे आपल्याला झेपणार नाही अशी होती. त्यांनी अभियांत्रिकी शास्त्रातील पदवी मिळविली होती आणि आयुष्यभर सोशल इंजिनीअरिंगचे काम केले. कामगार चळवळीच्या धकाधकीच्या जीवनातून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ आणि ‘साधना’ अशा नियतकालिकांमधून विस्तृत प्रमाणात लिखाण केले. व्यवस्थापकांच्या चर्चासत्रांत भाग घेतला; परंतु असा प्रवास सुरू असतानाही गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विवेचन करण्यासाठी त्यांच्याकडे मोकळा वेळ असे. कापड उद्योगात प्रत्यक्ष कापड विणण्याचे काम सूत कताईपेक्षा श्रमसधन असल्यामुळे यंत्रमाग उद्योगाचा विस्तार ही आपल्या देशात अपरिहार्य प्रक्रिया ठरत आहे ही गोष्ट त्यांनी जाणली होती.
भारतात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आणि त्याच वेळी औद्योगिक जगात डिजिटल क्रांतीची लाट फुटल्यानंतर औद्योगिक उत्पादन व्यवहाराचा जो नवीन ढाचा तयार होऊ लागला त्याचा कामगार चळवळीवर विपरीत परिणाम होणार आहे ही बाब त्यांनी अचूक हेरली. परंतु या अपरिहार्य प्रक्रियेला विरोध करण्यासाठी निश्चित स्वरूपाची व्यूहरचना ते आखू शकले नाहीत. ही स्थिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कामगार चळवळीने अनुभवली आहे. बगाराम तुळपुळे यांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी कामगार चळवळीमधून औपचारिक निवृत्ती घेतली असली तरी त्यानंतरच्या काळातही त्यांनी भारतीय समाजाला आणि विशेषकरून कामगार चळवळीला मार्गदर्शन करण्याचे काम सुरूच ठेवले होते. त्यांच्यासारखा अभ्यासू, विनम्र स्वभावाचा आणि पूर्णपणे पारदर्शी असणारा नेता शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!