निर्भया प्रकरणावर  आधारित ‘इंडियाज डॉटर्स’ या माहितीपटावरून गदारोळ सुरू झाल्याने केंद्राने देशात त्याच्या प्रदर्शनावर  बंदी घातली.  ही बंदी कशी चुकीची आहे, याचा ऊहापोह करणारा लेख..

दिल्लीतील ‘निर्भया’वर बलात्कार करणाऱ्या तिहार जेलमधील आरोपीची मुलाखत असलेल्या  माहितीपटावर बंदी घालण्याचा निर्णय देशाभिमानाचा आहे की देशप्रेमाचा आहे? हा प्रश्न विचित्र वाटेल. पण आपण तो उपस्थित करूया.
जेव्हा एखादा देश परकीय छत्राखाली असतो तेव्हा प्राथम्य हे स्वातंत्र्याला असते. आणि त्या वेळेस लोकांचा आत्मविश्वास जागा करण्यासाठी देशाभिमानाची भावना जागी ठेवणे आवश्यक असते. ब्रिटिशांची वसाहत असलेल्या भारतीयांमधील न्यूनगंड दूर करण्यासाठीदेखील देशाभिमानाची भावना चेतवणे गरजेचे होते. vv04अशा वेळेस आत्मटीका, आत्मसुधारणा या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात. पण दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळून इतकी वष्रे झाली तरी आपला राष्ट्राभिमान आत्मपरीक्षणाच्या आड येत राहतो. आपल्या देशातील कोणत्याही समस्येवरील परदेशी व्यक्तीने केलेली टीका आपल्याला आपल्या देशाचा अपमान वाटतो. संदर्भ आहे केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘इंडियाज डॉटर्स’ या माहितीपटाचा. ब्रिटिश निर्देशिका लेस्ली उद्वीन यांनी केलेला हा माहितीपट ‘बलात्कार’ या विषयावर आहे. बलात्कार करणाऱ्या पुरुषांची मानसिकता काय याचा शोध या माहितीपटात घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या निर्देशिकेने जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अनेक बलात्कारी गुन्हेगारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यात दिल्लीत ‘निर्भया’वर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराचीही मुलाखत आहे. या मुलाखतीचा थोडा भाग माध्यमांकडे पोहोचला आणि एकच गदारोळ माजला. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले. आणि या माहितीपटावर देशात बंदीची घोषणा केली.
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या माहितीपटाची निर्देशिका ही स्वत: अशा अत्याचाराची शिकार झालेली आहे.  तिचे म्हणणे असे की बलात्कार हा पुरुषसत्ताकवादी मानसिकतेचीच अभिव्यक्ती आहे. त्यात स्त्रीला दुय्यम लेखण्याचीच भूमिका आहे. आणि ही मानसिकता थेटपणे, भेदकपणे समोर आणणे ही गरजेची गोष्ट आहे. बलात्कारी पुरुषाची मानसिकता कोणत्या कारणाने प्रभावित झाली असते ते समजणे हे गरजेचे आहे. तसे झाले तरच या समस्येवर प्रभावी उत्तर शोधता येईल.  या निर्देशिकेचे म्हणणे असे की बलात्कार ही काही भारतातीलच समस्या नाही.  म्हणून या माहितीपटामुळे भारताचा अपमान व्हायचे कारणच नाही. या निर्देशिकेला ही तिने भारताला दिलेली भेट वाटते आणि म्हणून या बंदीमुळे तिला अतीव दु:ख झाले आहे.
पण समजा असे आपण गृहीत धरले की बलात्कार ही प्रामुख्याने भारतातीलच समस्या आहे आणि निर्देशिका परकीय नागरिक आहे. तसेच हा माहितीपट जगभर दाखवला जाणार आहे. तरीही आपल्याला त्याबद्दल अपमानित किंवा लज्जित होण्याचे कारणच काय? पण जे लोक देशाभिमानी असतात ते यामुळे लज्जित होतात. त्यांना हा आपल्या देशाचा अपमान वाटतो. येथे अभिमान या भावनेची तुलना प्रेम या भावनेशी करता येईल. आपल्या आईवर आपले प्रेम असते. अभिमान असेलच असे नाही. असला तरी काही गुणांबद्दल असतो. आपली आई ही काही सर्वगुणसंपन्न आदर्श व्यक्ती आहे अशी आपली भावना नसते. तिच्यातील दोषांचीही आपल्याला कल्पना असते. पण म्हणून आपले तिच्यावरील प्रेम कमी नाही होत. आपल्या देशाला आपण मातृभूमी म्हणतो. म्हणजे आईची उपमा देतो. म्हणून आपल्या देशावरदेखील आपले प्रेमच असले पाहिजे. देशाभिमान नको. कारण देशाभिमान या भावनेशी लज्जा आणि अपमान या भावना जोडलेल्या असतात. उलट प्रेम या शब्दाशी दु:ख, वेदना या भावना जोडलेल्या असतात. आपल्या देशातील लोकांमधील पुरुषी अहंकार आणि त्याची क्रूर अभिव्यक्ती याबद्दल वाईट वाटले पाहिजे. दारिद्रय़, विषमता याबद्दलही आपल्याला दु:ख वाटले पाहिजे. ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत. हे प्रश्न झाकून नाही ठेवता कामा. हे प्रश्न जगासमोर आल्यामुळे आपल्याला लज्जित किंवा अपमानित वाटता कामा नये. या माहितीपटावरील बंदी ही पूर्णत: चुकीची आहे.  राष्ट्राभिमान हा धर्माभिमानाप्रमाणे असहिष्णुतेला जन्म देतो. आपल्या धर्माची कोणतीही चिकित्सा सनातनी धर्मावाद्यांना मान्य नसते. अशी चिकित्सा, टीका असलेली पुस्तके, चित्रपट, अशा कोणत्याही अभिव्यक्तीवर बंदी घालण्याची मागणी अशा धर्माभिमान्यांकडून येत असते. अभिमानाचा थेट संबंध अहंकाराशी असतो. ‘तुला मिळालेल्या कमी मार्काबद्दल मला तुझी लाज वाटते’ असे जेव्हा वडील आपल्या मुलाला म्हणतात तेव्हा त्यांचा अहंकार दिसतो. मुलावरील प्रेम नाही. मुलाच्या अपयशाबद्दल वाईट वाटणे हे प्रेमाचे द्योतक असते. लाज हे अहंकाराचे द्योतक असते. अहंकारदेखील चिकित्सेच्या आड येतो. तो प्रेमाच्याही आड येतो.
आपल्या लहानपणी मात्र आपल्याला आपली आई सर्वगुणसंपन्न, परिपूर्ण व्यक्ती वाटत असते. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वष्रे होऊन गेली. आता आपण मोठे होऊ या. देशाभिमान या भावनेची जागा देशप्रेमाला देऊ या.