आमचे सीएम साधेभोळे आहेत. विरोधकच त्यांना एवढ्यातेवढ्यावरून कोंडीत पकडायची संधी शोधत असतात. आता त्या दिवशी, प्रथेप्रमाणे सगळे सोपस्कार पार पडले. चेक-इननंतर त्यांना ‘विमाानात जाऊन बसा’ अशी विनंती करण्यात आली. तशी ही विमान कंपनी सरकारी असल्याने, त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल पक्का माहीत असतोच. (नाहीतर हक्कभंग व्हायचा ही भीती! ) बाकीच्या प्रवाशांनाही विमानात बसण्यास सांगण्यात आले. मग ते सारेजण विमानात जाऊन बसले. सीएमसाहेबही बसले आणि फायली चाळू लागले. त्या कामात ते एवढे मग्न झाले, की आपले विमान अजून हवेत उडालेले नाही, ते जमिनीवरच आहे आणि उड्डाणाला उशीर होतोय हेही त्यांच्या लक्षातच आले नाही. आपल्याच शिष्टमंडळातले आपले सचिव परदेशी यांच्या व्हॆलिड व्हिसाची काहीतरी गडबड झाली आहे, ते अजून विमानात बसलेलेच नाहीत आणि त्यांच्यासाठी विमान थांबले आहे हेही कामाच्या गडबडीत त्यांना कळलेच नाही.
ते आपले कामातच गढून गेले होते.
…आणि सीएमसाहेबांच्या या कर्तव्यकठोरपणामुळे अचंबित झालेले सहप्रवासीही, विमान लेट होतंय हेच विसरून गेले होते.
… जवळपास दीड तासांनंतर परदेशी धावतपळत, धापा टाकत विमानात शिरले, आणि सीएमसमोर उभे राहिले. सीएम फायलीत डोकं घालूनच बसले होते. बऱ्याच वेळानंतर त्यांनी वर पाहिलं.
समोर आनंदी चेहऱ्यानं परदेशी उभे होते.
सीएमनी आपलं ठेवणीतलं कनवाळू हास्य चेहऱ्यावर आणलं.
‘अरे, आप कब आये? ‘ सीएमनी विचारलं.
कनवाळू झाले की आपल्या खास लहेज्यात ‘हिंदीमे बात’ करायची सीएमना ‘आदत’ होती.
त्यामुळे उत्तर भारतीय मतदारही जोडला जातो, हे त्यांचं गणित होतं. अर्थात, ते त्यांनी कधीच कुणाला सांगितलेलं नव्हतं.
‘बस, अभी अंदर आया हूँ सर…’ परदेशी ‘सर झुकवून’ म्हणाले.
सीएमनी डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवला आणि पाऊल हलकेच थोपटत मान हलविली. खुणेनंच परदेशींना बसायला सांगितलं.
‘थँक्स, सर’…  बसताबसता पुन्हा सर झुकवून परदेशी म्हणाले आणि विमान टेक ऑफच्या तयारीला लागलं.
अनाऊन्समेंट सुरू झाली आणि सीएमनी मनगटावरच्या घड्याळात पाहिलं.
‘लेट आहे वाटतं विमान’..  सीएम पुटपुटले.
तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं वाटून त्यांनी परदेशींकडे पाहिलं.
प्रेमळ नजरेनं परदेशी त्यांच्याकडेच पाहात होते.
‘सब जरूरी पेपर्स साथमें है ना?… व्हिसा, पासपोर्ट…’ पहिल्यांदाच परदेशी जाणाऱ्या आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याची आई विमानतळाबाहेर त्याला विचारते, तसाच प्रेमळ सूर सीएमच्या आवाजात होता.
‘येस सर, थँक्स’.. पुन्हा परदेशी म्हणाले.
… तोवर विमान हवेत उंच उडाले होते.
(वि.सू.- ही एक काल्पनिका आहे. यातील पात्रे, प्रसंग काल्पनिकच आहेत, पण त्याचे कुणाला कुठे साम्य आढळलेच, तर तो योगायोग समजावा! )

– दिनेश गुणे