डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम घटना समितीवर, पुढे राज्यसभेत सदस्य म्हणून गेले, तेव्हाच्या इतिहासाची मोडतोड रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाली. अशी मोडतोड होऊ नये, यासाठी संदर्भाची पुरेशी उजळणी करणारे टिपण..
रामदास आठवले यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी देताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘काँग्रेसने दगाफटका करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला व त्यानंतर जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविले,’ असे इतिहासाची मोडतोड करणारे विधान केले आहे. (संदर्भ- लोकसत्ता, दि. २८ जानेवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा इतिहास ‘कच्चा’ आहे हे सर्वाना माहीत असेल; पण इतिहास कच्चा असणाऱ्या भाजप नेत्यांच्या रांगेत गोपीनाथ मुंडेही आहेत, ही बातमी ठरावी. ‘लोकसत्ता’च्या बातमीत मुंडे यांच्या तोंडी दोन विधाने आहेत. एक ‘काँग्रेसने दगाफटका केला म्हणून डॉ. आंबेडकरांचा १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.’ व दोन ‘श्यामाप्रसाद मुखर्जीनी डॉ. आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले.’ ही विधाने मुंडे करीत असताना रामदास आठवले व्यासपीठावर होते खरे, परंतु राज्यसभेच्या खासदारकीच्या आनंदामुळे त्यांचे ‘भान हरपले’ आणि मुंडे यांची चूक आठवले यांच्या लक्षातच आली नसावी, असे मानण्यास जागा आहे. समरसतेसाठी डॉ. आंबेडकरांच्या ग्रथित राजकीय इतिहासाची मोडतोड आजच्या नेत्यांनी करावी हे क्षम्य नाही. त्यामुळेच मुंडे यांच्या दोन्ही विधानांसंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे.
‘काँग्रेसने दगाफटका केला म्हणून डॉ. आंबेडकरांचा १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.’ हे विधान आधी तपासू. आज प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून दिला जातो. तशी पद्धत स्वातंत्र्योत्तर काळात आरंभीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरसकट अवलंबिण्यात येत नव्हती. मतदारसंघ द्विसदस्यीय असला तर त्यातील एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा राखीव अशी विभागणी केलेली असे. द्विसदस्यीय मतदारसंघात प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असे. मतदाराने दोन्ही मते विभागलीच पाहिजेत, असे कायदेशीर बंधन नव्हते, पण मतदाराला देण्यात येणाऱ्या दोन्ही मतपत्रिका त्याने एकाच उमेदवाराच्या बाजूने टाकल्या तर १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील ६३(१) विभागातील तरतुदीनुसार अशा मतपत्रिका मतमोजणी करताना बाद ठरवल्या जात असत.
डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता हे दोघेही ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांच्या युतीचे’ उमेदवार होते. यांच्याखेरीज १९५२ मध्ये तेव्हाच्या उत्तर मुंबई मतदारसंघात श्रीपाद अमृत डांगे, डॉ. गोपाळ विनायक देशमुख, विठ्ठल बाळकृष्ण गांधी, केशव बाळकृष्ण जोशी, नीलकंठ बाबुराव परुळेकर, द. रा. घारपुरे, नारायण सदोबा काजरोळकर, रामचंद्र सदोबा काजरोळकर आणि शांताराम सावळाराम मिरजकर या नऊ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरली होती. त्यापैकी द. रा. घारपुरे, रा. स. काजरोळकर हे काँग्रेसचे आणि शां. सा. मिरजकर कम्युनिस्ट पक्षाचे असे तीन ‘डमी’ उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे प्रत्यक्षत: एकूण ११ उमेदवारांपैकी ८ जणांनीच निवडणूक लढवली.
त्यांपैकी वि. ना. गांधी, १,४९,१३८ आणि नारायणराव काजरोळकर १,३८,१३७ मते मिळवून विजयी झाले. पराभूत उमेदवारांपैकी डॉ. आंबेडकरांना १,२३,५७६ मते मिळाली, तर अशोक मेहतांना १,३९,७४१ मते मिळाली. डांगे यांना ९६,७५५, डॉ. गोपाळराव देशमुख यांना ४०,७८६, के. बा. जोशी यांना १५,१९५ आणि नीलकंठ परुळेकर यांना १२,५६० मते मिळाली होती. (डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता यांनी निवडणूक आयोगाला केलेला निवडणुकीसंबंधीचा अर्ज, परिच्छेद ७ व ८).
या मतदारसंघात सर्व उमेदवारांना पडलेल्या मतांची एकूण संख्या ७,१५,८८८ इतकी होती. परंतु बाद मतांची संख्याही मोठी होती. प्रत्येक उमेदवाराच्या (निरनिराळय़ा) मतपेटीतील मते मोजण्यात आली तेव्हा मतगणना अधिकाऱ्याने बाद ठरवलेल्या मतांचा उमेदवारनिहाय तपशील असा होता : डॉ. आंबेडकर २,९२१, अशोक मेहता ५,५९७, डांगे ३९,१६५, डॉ. देशमुख ६,६३४, वि. बा. गांधी १०,८८१, के. बा. जोशी १,१६८, ना. स. काजरोळकर ६,८९२  आणि नी. बा. परुळेकर १,०२५.
इंजिन हे डांगे यांचे निवडणूक चिन्ह होते. हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका, असे आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचारसभांमध्ये तसेच तेव्हा वितरित केलेल्या पत्रकांमध्ये केले होते. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘युगांतर’ने तसेच आवाहन केले होते. तसे करणाऱ्या मतदारांची मते बाद होतात याची कल्पनाही मतदारांना देण्यात आली नव्हती. डॉ. गोपाळराव देशमुख यांनी, सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांना दोहोंपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपले एक मत कुजवावे म्हणजे मत बाद होईल, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. ‘नाही तर दोन्ही अस्पृश्य उमेदवार निवडून येतील,’ असा डॉ. देशमुखांनी मतदारांना बागुलबोवा दाखवला. डॉ. आंबेडकरांना नारायणराव काजरोळकरांपेक्षा १४,५६१ मते कमी पडल्यामुळे ते पराभूत झाले. डांगे यांच्या बाद मतांची संख्या ३९,१६५ इतकी होती. एक मत कुजवा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले नसते तर डॉ. आंबेडकर निश्चितच निवडून आले असते हे उघड दिसते.
केवळ काँग्रेसमुळे डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला नाही. हा सर्व तपशील संदर्भासहित उपलब्ध आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनाही डॉ. आंबेडकरांच्या पराभवाचे आश्चर्य वाटले.
डॉ. आंबेडकरांच्या विरुद्ध नारायण काजरोळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यावर एका इंग्रजी दैनिकात एक अत्यंत बोलके व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. ते असे की, डॉ. आंबेडकर उभे असून त्यांच्या भव्य पायापाशी बुटाच्या टाचेच्या उंचीइतकी उंची असलेले काजरोळकर दाखविले होते.
पहिल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांनी मुंबईतील झालेली लोकसभेची निवडणूक रद्द करावी, असा निवडणूक आयोगापुढे अर्ज केला. त्यात त्यांनी म्हटले होते की, दुहेरी मतदारसंघातील एकाच उमेदवाराला दोन मते टाकण्याविषयी प्रचार झाल्यामुळे त्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्या निवडणुका रद्द ठरवाव्यात. त्या अर्जाविरुद्ध डांगे, देशमुख, डॉ. गांधी, नारायणराव काजरोळकर इत्यादी प्रतिपक्षी होते. १९५२ सालच्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक आयोगापुढे अर्जाची सुनावणी झाली. डॉ. आंबेडकर स्वत: आपली बाजू मांडताना म्हणाले, ‘मते कुजविण्यासाठी केलेला प्रचार अवैध होता. अशा तऱ्हेने मतदारांच्या मनामध्ये जातीय भावना चेतविणे हे कायद्याला विकृत स्वरूप दिल्यासारखे आहे.’ तथापि डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांचा अर्ज आयोगाने फेटाळला.
गोपीनाथ मुंडे यांचे दुसरे विधान धादांत दिशाभूल करणारे आहे..  ‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रयत्नामुळे डॉ. आंबेडकर पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडले गेले.’
डॉ. आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडले गेले ते पहिल्यांदा घटना समितीवर, त्या वेळी हिंदू महासभेचे काँग्रेसपुरस्कृत उमेदवार श्यामाप्रसाद मुखर्जी हेसुद्धा बंगाल प्रांतातून घटना समितीवर निवडून आले. फाळणीनंतर डॉ. आंबेडकर निवडून आलेला प्रांत पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) गेल्यामुळे नंतर डॉ. आंबेडकर हे पं. नेहरू व सरदार पटेल यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन मुंबई प्रांतातून घटना समितीवर परत बिनविरोध निवडून आले.
१९५२ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकर राज्यसभेवर निवडले गेले ते मुंबई विधानसभेतून. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस पां. न. राजभोज यांना सोलापूर जिल्ह्य़ात विजय मिळाला, तो शे. का. फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या युतीमुळे. बापूसाहेब राजभोज यांनी लोकसभेतील आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि डॉ. आंबेडकरांना पोटनिवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग खुला ठेवावा, असे डॉ. आंबेडकरांच्या निकटवर्तीयांपैकी काहींना वाटत होते, पण डॉ. आंबेडकरांना ही सूचना पसंत पडली नाही. म्हणून त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९५२ साली राज्यसभेच्या निवडणुका मुक्त वातावरणात होत. आजच्यासारखी ‘धनशक्ती’ तेव्हा नसे.
मुंबई विधानसभेच्या आमदारांनी १९५२ च्या मार्चमध्ये राज्यसभेसाठी १७ खासदार निवडून दिले. त्या वेळी मुंबई प्रांताची विधानसभा ३१५ आमदारांची होती, त्यात काँग्रेसचे २७०, शेतकरी कामगार पक्षाचे १४, समाजवादी पक्षाचे ८, कामगार किसान पक्षाचे ३, तर गुजरातमधल्या ‘खेडूत लोकपक्षा’चा, कम्युनिस्ट पक्षाचा आणि डॉ. आंबेडकरांच्या शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचा प्रत्येकी एक (शे. का. फे.चे बी. सी. कांबळे निवडून आले होते.) आणि अपक्ष १७ असे बलाबल होते. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची १८ मते मिळविणे आवश्यक होते. समाजवादी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्याबरोबर शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनने आधी निवडणूक समझोता केला होताच. कामगार किसान पक्षाचे दोन आमदार दत्ता देशमुख आणि बॅ. व्ही. एन. पाटील यांनीही डॉ. आंबेडकरांना मते दिल्यामुळे राज्यसभेची निवडणूक डॉ. आंबेडकरांना सहज जिंकता आली.
दत्ता देशमुखांकडून २९ मार्चला आलेल्या अभिनंदन पत्राचे उत्तर पाठविताना डॉ. आंबेडकरांनी राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र तो पाठिंबा मिळविण्यासाठी किंवा तो दत्ता देशमुखांनी दिला म्हणून आधीच्या मतभेदास डॉ. आंबेडकरांनी मुरड घातली नाही.
हा सर्व तपशील संदर्भासहित उपलब्ध असताना गोपीनाथ मुंडे कोणाला फसवत आहेत? डॉ. आंबेडकर पश्चिम बंगालमधून नव्हे तर मुंबई विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेले हे सत्य आहे. आता राहिला प्रश्न तो श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा. त्यांचा आणि राज्यसभा निवडणुकीचा संबंध गोपीनाथ मुंडे यांनी का जोडला हे त्यांनाच माहीत. त्यामुळे आठवले-मुंडे यांच्यासाठी ही इतिहासाची पुनरावृत्ती असेल, पण अभ्यासकांसाठी ‘इतिहासाची मोडतोड!’
(प्रस्तुत लेखात संदर्भ व तपशिलासाठी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांच्या आत्मकथनाचा व चरित्रकार धनंजय कीर,   घटना समितीचे इतिहासकार बी. शिवराव तसेच दिवंगत डॉ. य. दि. फडके यांनी परिश्रमपूर्वक डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या      ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे.)
* ‘प्रशासनयोग’ हे सदर अपरिहार्य कारणास्तव आजच्या अंकात प्रसिद्ध होऊ शकले नाही.

Why Asaduddin Owaisi support to Prakash Ambedkar in Akola Lok Sabha Constituency
प्रकाश आंबेडकर यांना ओवेसीचा पाठिंबा का?
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा