जागतिक पातळीवरचे नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या भारतीयांची संख्या फारच तुरळक आहे. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अन्याय आपण सहन न करता, आपणच फक्त भारतीयांसाठी ‘नोबेल प्राइज’ जाहीर करावं अशी मागणी होऊ लागली. साहजिकच यंदापासूनच विविध शाखांमधून उल्लेखनीय काम करणाऱ्या काही अद्भुत भारतीयांना हे २०१७ सालाचे नोबेल (सर)प्राइज मिळणार आहे. त्या मान्यवरांचा हा थोडक्यात परिचय.

अर्थशास्त्र

यंदा हा पुरस्कार मध्य प्रदेशातील चार्टर्ड अकाऊंटंट  अनाम गुप्ता यांना घोषित झाला आहे. अनाम गुप्ता हे अनुभवी चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. करविषयक गुंतागुंत, अर्थविषयक कायदे, अर्थसंकल्पातील तरतुदी, अनेक देशातील कररचना याबाबतचे ते तज्ज्ञ मानले जातात. त्यांची यंदाची कामगिरी म्हणजे त्यांना जीएसटीची कररचना जवळपास अकरा टक्क्यांपर्यंत समजली आहे. देशातील अनेक चार्टर्ड अकाऊंटंटच्या संघटनांनी हा एक क्रमांक असल्याचं मान्य केलं आहे!

जीवशास्त्र

यंदाचा जीवशास्त्राचा नोबेल (सर)प्राइज पुरस्कार पूर्व विदर्भातील एक अल्पभूधारक शेतकरी  दगडू रामा खोकनाळे यांना जाहीर झाला आहे.  दगडू हे सतत अर्धपोटी राहतात आणि अडीच एकर कोरडवाहू शेतात प्रचंड थंडी, पाऊस, ऊन यामध्ये अतिश्रम करतात. अत्यंत विषारी कीटकनाशकांचा त्यांच्यावर परिणाम झालेला नाही. शासनाच्या शेतीविरोधी धोरणालाही ते दाद न देता अजूनही जिवंत आहेत. हा एक जीवशास्त्रातील चमत्कारच मानला जातो.

भौतिकशास्त्र

काही नव्या तरंगांचा शोध लावल्याबद्दल डॉ. अविश्वास फोकनाडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. फोकनाडे हे सत्ताधारी पक्षाच्या प्रचार विभागात ‘अफवा’ या उपविभागाचे प्रमुख आहेत. जेजे वर जातं ते कालांतराने खाली येतं हा भौतिकशास्त्राचा जुना नियम अपूर्ण असून लोकप्रियतेच्याबाबतीत जे वर जातं ते प्रयत्न केल्यास वरच राहतं हा नवा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. काही नवे तरंग त्यांनी शोधले असून या तरंगांच्या जोरावर काहीही तरंगू शकतं असा त्यांचा दावा आहे. याला अँटीफिजिक्स लॉ असंही म्हटलं जातं. या तरंगांना वेब किंवा लाट असंही आपण म्हणू शकता. किंवा ‘लहरी’ (!) हा योग्य प्रतिशब्द असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

साहित्य

बनारस येथील विद्यापीठात भाषा विभागात संशोधन करणारे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. एन.टी.सी.पी. गोवर्धन राव यांना यंदाचा साहित्याचा नोबेल (सर)प्राइज पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. राव यांना विविध भाषांचे प्रचंड ज्ञान आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयासाठी भाषणं तयार करून देताना यमक, अनुप्रास, श्लेष, वक्रोक्ती इत्यादींबरोबरच म्हणी, वाक्प्रचार यांचाही मुबलक वापर करून चटपटीत व निर्थक घोषणा निर्माण करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे.

रसायनशास्त्र

ऋषीकेश येथील गंगाजल संशोधन संस्था येथे गेली अडतीस वर्षे संशोधन करणारे डॉ. जटाशंकर शास्त्री यांना रसायनशास्त्राचा नोबेल (सर)प्राइज पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी गेली अकरा वर्षे संशोधन करून गंगेच्या प्रवाहाबद्दल काही मूलभूत व नवे सिद्धान्त मांडले आहेत. त्यानुसार गंगेच्या प्रवाहात अनेक विषारी द्रव्यांबरोबरच ८.३३ टक्के पाणीही असल्याचा महत्त्वपूर्ण शोध त्यांनी लावला आहे.

शांतता

नोटबंदी, बेकारी, महागाई, मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती, बँकांतील घटणारे व्याजदर याबद्दल तोंडातून ब्र ही न काढल्याबद्दल सामान्य माणसाला शांततेचा नोबेल (सर)प्राइज पुरस्कार घोषित झाला आहे.

(सुरक्षिततेच्या कारणास्तव याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)

सादरकर्ते- प्रशांत कुलकणी prashantcartoonist@gmail.com