मानव आणि वाघाच्या संघर्षांत झालेली वाढ, यात जाणारे बळी यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधी ब्रह्मपुरी व आता वर्धा जिल्ह्य़ांतील घटनांनी हा संघर्ष वाढल्याची नांदी दिली आहे. यात कधी वाघाचा, तर कधी माणसाचा बळी जात आहे. यात खरी गरज आहे ती गणित नेमके कुठे चुकत आहे यावर गंभीरपणे विचार करण्याची. संघर्षांत वाढ झाली की तात्पुरती मलमपट्टी करण्यावरच साऱ्यांचा भर राहिल्याने या संघर्षांला कारणीभूत असलेले मूलभूत मुद्दे मागे पडत आहेत.

वाघाचे हल्ले का?

वाघाने माणसांवर केलेले ९० टक्के हल्ले जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावाच्या सीमेवर होतात. वाघांच्या अधिवासात मानवी समूहाकडून होत असलेल्या अतिक्रमणामुळे त्यांचे अधिवास सुरक्षित राहिले नाहीत. व्याघ्रकेंद्रित पर्यटन आणि जंगलालगतच्या गावांचे जंगलावरील अवलंबन यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात आणि शेतीसह जंगलालगतच्या गावात प्रवेश करतात. या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो आणि मग हल्ले घडून येतात. अधिकांश घटनांमध्ये वयात येणाऱ्या वाघानेच हल्ले केले आहेत. वयात आलेले तरुण-तरुणी ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून पाहतात, तसेच वयात येणारा वाघ असुरक्षिततेच्या कारणावरून मानवावर हल्ले करतो असे एक निरीक्षण आहे. हल्ल्यानंतर हा वाघ मृतदेह खातसुद्धा नाही. हे प्रमाण फार कमी आहे, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे.

सरकारचे धोरण

गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबन कमी करण्यासाठी वनखात्याकडून ‘गॅस-सिलेंडर वाटप’, ‘गावातील प्रत्येक कुटुंबाला शौचालय’ यांसारख्या विविध योजना राबवण्यात येतात. सरकार फक्त योजना आणते, पण अंमलबजावणी पातळीवर मात्र सातत्याचा अभाव दिसून येतो. वाघांच्या अधिवासाची सुरक्षा, गावकऱ्यांच्या रोजगाराची हमी, गावकऱ्यांचा जंगलावरील हक्क या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर सरकारचा भर आहे. जंगलाशेजारचे गावकरी प्रामुख्याने मोहफुले वेचण्यासाठी व तेंदुपाने गोळा करण्यासाठी जंगलात जातात. या दोहोंच्या विक्रीतून त्यांना पैसा मिळतो. वनउपज गोळा करणे आणि त्याची विक्री करणे हेच गावकऱ्यांचे रोजगाराचे स्वरूप आहे. ते बदलायचे असेल तर त्यांना रोजगाराच्या पर्यायी संधी देणे गरजेचे आहे.  गेल्या वर्षी २०१६ मध्ये भारतात १०२ वाघांच्या विविध कारणांनी मृत्यू झाला. यात ४७ वाघ, ३२ वाघीण आणि २३ प्रकरणांत वाघ होता की वाघीण हे कळले नाही. यातील ३५ मृत्यू अनैसर्गिक, ४३ नैसर्गिक  आणि २४ प्रकरणांत मृत्यूची कारणेच कळली नाहीत. २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूची टक्केवारी भारतात १४५ टक्क्यांनी वाढल्याचे ‘क्लॉ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात दिसून आले. यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण मध्य प्रदेशात ३३, कर्नाटक राज्यात १८, तर महाराष्ट्रात १५ एवढे होते.

नेमके काय घडले?

चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात एका तरण्या वाघिणीने गोंधळ घातला आणि मानवी बळी घेतले म्हणून तिला नरभक्षक ठरवून गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.

वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवींनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने तिला ठार मारण्याऐवजी पकडा, असा आदेश दिला.

त्यामुळे वाघिणीचा मृत्यू टळला तरी तिला जेरबंद करून नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. त्यावर पुन्हा खलबते झाली.

वाघांच्या जंगलातील सुटकेसंदर्भात गठित समितीने तिला जंगलात सोडण्याचा अहवाल दिला. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प या नव्या वनक्षेत्रात तिची रवानगी करण्यात आली.

नैसर्गिक अधिवासातील मुक्ततेनंतर तब्बल महिनाभराने तिने एका शेतकऱ्याला भक्ष्य केले. परिणामी, पुन्हा तिची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात करण्याचे निर्देश देण्यात आले.

आता पुन्हा त्या वाघिणीला पकडण्याची कसरत वनखात्याला सुरू करावी लागणार आहे. माणसांचा बळी जाऊ नये यासाठी हे आवश्यक असले तरी या कसरतीमुळे त्या वाघिणीची होणारी फरफटही तेवढीच चिंताजनक आहे.

वाघांच्या मृत्यूची टक्केवारी

जानेवारी ते मार्च २०१६ – २८.४३ %

एप्रिल ते जून    २०१६ – २९.४१ %

जुलै ते सप्टेंबर २०१६ – २१%

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६  २१.५६%

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६  २१.५६%

वय आणि मृत्यूची टक्केवारी

एक ते तीन वर्षे – २७.४५ टक्के

चार ते नऊ वर्षे – ३०.३९ टक्के

दहा वर्षांवरील – १९.६ टक्के

वयाची माहिती नाही – २२.५४ टक्के

संकलन – राखी चव्हाण