लघुग्रहांचं (अ‍ॅस्टेरॉईड) निरीक्षण ही खरंतर खगोलप्रेमींसाठी पर्वणीच. पण, एखाद्या लघुग्रहाने पृथ्वीला धडक दिली तर, हा प्रश्न मात्र मानवाच्या मनात धडकी भरवणारा आहे. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅलन फिट्झसिमन्स यांच्या शब्दांत सांगायचे तर लघुग्रह पृथ्वीला धडक देईल का, हा प्रश्न नाही, तर तो कधी देईल, हा प्रश्न आहे. एखादा लघुग्रह नक्कीच पृथ्वीला धडक देईल आणि त्यामुळे लंडनसारखे शहर उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशाराच अ‍ॅलन यांनी ३० जूनच्या लघुग्रह दिनाच्या पाश्र्वभूमीवर दिला आहे. त्यासाठी आणखी एक निमित्त ठरले ते २०१० एनवाय ६५ या लघुग्रहाचे. शनिवार, २४ जूनला फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला. त्याचा पृथ्वीवर काहीच परिणाम झाला नाही हे खरे. पण, त्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकण्यासारखे काही नाही. कारण २०२२ पर्यंत हा लघुग्रह दरवर्षी पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाची संहारक क्षमता हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या ३०० पटींनी अधिक आहे. पुढच्याच महिन्यात २०१७ बीएस ५ हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. यामुळेच लघुग्रहांचा वेध घेणे आवश्यक आहे.

लघुग्रह म्हणजे काय?

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Electric lighting on trees is dangerous for insects and birds
वृक्षांवरील विद्युत रोषणाई कीटक, पक्ष्यांसाठी घातक
Blood sugar control
बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा
पूर्व आकाशात अपूर्व अनुभुती, गुरुपुष्यामृत दिनी आकाशातही अमृत योग; नेमके काय घडणार? वाचा…

आकाराने लहान असल्याने ग्रहाचा दर्जा न मिळालेले खडक किंवा दगड म्हणजे लघुग्रह. ते उल्कापेक्षा मोठे आणि ग्रहापेक्षा छोटे असतात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांमध्ये ते सूर्याभोवती गोलाकार भ्रमण करतात. या दोन ग्रहांमध्ये लघुग्रहाचा पट्टा आहे. या लघुग्रहाच्या पट्टय़ात इटालियन खगोलशास्त्रज्ञ ग्युसेप्पी पियाझ्झी यांनी १८०१ मध्ये सर्वप्रथम सेरेस नावाचा सर्वात मोठा लघुग्रह शोधला. तो ९४५ किलोमीटर व्यासाचा आहे. पुढच्याच वर्षी १८०२ मध्ये सुमारे ५२४ किलोमीटर व्यासाच्या पलास नामक लघुग्रहाचा शोध लागला. त्यानंतर १८०७ मध्ये व्हेस्टा हा लघुग्रह सापडला. असे आजपर्यंत लाखो लघुग्रह सापडले आहेत. सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी विश्वनिर्मिती झाल्यानंतर तयार झालेले ते खडक असल्याचे मानले जाते. त्यांचा आकार भिन्न असतो.

पृथ्वीशी धडक

लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर त्याच्या आकारमानानुसार तो पृथ्वीचे नुकसान करू शकतो. १९०८ मध्ये सैबेरियाच्या तुंगुश्का भागात एक लघुग्रह धडकून स्फोट झाला होता. त्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यात सुमारे ८० हजार झाडांचे नुकसान झाले होते. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी २०१२ डीए १४ नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप जवळून जाणार होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी मध्य रशियात उल्का पाषाण (मिटीरॉईड) कोसळले होते. सुमारे ३० किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने उल्का पाषाणाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवास केला आणि मोठय़ा स्फोटात त्याचे तुकडे विखुरले गेले. या स्फोटामुळे सुमारे ३०० किलो टन इतकी ऊर्जा निर्माण झाली. या उल्का पाषाणाच्या धडकेमुळे सुमारे १२०० जण जखमी झाले. यामुळे २०१२ डीए १४ लघुग्रहाने धडक दिली असती तर मोठे नुकसान झाले असते.

पृथ्वीच्या संरक्षणाचे काय?

अत्यंत धोकादायक लघुग्रह दुर्मीळ आहेत, असे नासाचे मत आहे. वर्षांतून एकदा  लघुग्रह पृथ्वीला धडकतो. मात्र, आकाराने लहान असल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याआधीच तो घर्षणाने भस्मसात होतो. मात्र, पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट करण्याची क्षमता असलेला लघुग्रह एक हजार शतकांमध्ये एकदाच पृथ्वीला धडकतो. तर एखाद्या शहराचा विध्वंस करू शकणारा किंवा त्सुनामी निर्माण करणारा लघुग्रह १००० किंवा १०,००० वर्षांतून एकदा पृथ्वीला धडक देतो.  आता आपल्या जीवनकाळात एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता धूसर आहे. मात्र, लघुग्रहांचा धोका कायम आहे. पृथ्वीपासून जवळ असलेले असे धोकादायक ८७५ घटक सापडले आहेत. खगोलशास्त्रज्ञ फिट्झसिमन यांच्या मते पृथ्वीला धडक देऊ शकणारे ९० टक्के लघुग्रह सापडले आहेत. मात्र, अद्याप न सापडलेले लाखो लघुग्रह पृथ्वीवर हाहाकार माजवू शकतात.

उपाय काय?

उल्का पाषाण किंवा छोटा लघुग्रह पृथ्वीला धडकल्याच्या घटना पृथ्वीच्या सापेक्षात पाहिल्या तर अगदी चिमटा काढल्यासारख्या. मात्र, मानवाच्या दृष्टीने या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. लघुग्रहाची दिशा बदलण्याचा प्रयत्न आपण केलेला नाही. ते करत नाही तोपर्यंत लोकांच्या संरक्षण करण्याच्या आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील़, असे फिट्झसिमन यांचे म्हणणे आहे. भूकंप, ज्वालामुखीप्रमाणेच लघुग्रह पृथ्वीला धडकणे ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण, इतर आपत्तींप्रमाणे आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी खंत ते व्यक्त करतात.

युरोपीयन स्पेस एजन्सी (इसा) ‘अ‍ॅस्टेरॉईड इम्पॅक्ट अ‍ॅण्ड डिफ्लेक्शन असेसमेंट मिशन’ची तयारी करत आहे. एखाद्या लघुग्रहावर अवकाशयानाची धडक घडवून आणून त्याचा परिणाम अभ्यासण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहिमेसाठी डायडीमॉस नावाच्या लघुग्रहाची निवड करण्यात आली आहे. डायडीमॉस हा जुळा लघुग्रह. हे दोन लघुग्रह एकमेकांभोवती फिरत सूर्याची परिक्रमा करत आहेत. त्यातील लहान दगडाचा आकार १७० मीटर तर मोठय़ा दगडाचा आकार ८०० मीटर आहे. हा लघुग्रह २०२२ मध्ये पृथ्वीजवळून सुमारे ११ दशलक्ष किलोमीटरवरून जाणार आहे. या मोहिमेसाठी २०२० मध्ये अंतराळयान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. अंतराळयानाची धडक घडवूून आणली जाईल तेव्हा दोन्ही लघुग्रह ताशी सुमारे २२,५०० किलोमीटर वेगाने प्रवास करतील. डायडीमॉसच्या लहान दगडाला धडक दिल्यानंतर सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या त्याच्या कक्षेत किती बदल होतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. लघुग्रहाची दिशा बदलता येईल का, याची चाचपणी त्यातून करता येईल. त्यात कितपत यश मिळेल हे आताच सांगणे अवघड आहे. यश मिळाले तरी पृथ्वीचे भवितव्य काय, हा प्रश्न आहेच. प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवजात टिकवायची तर मानवाने पृथ्वी सोडली पाहिजे, या मताचा नुकताच पुनरुच्चार केला. लघुग्रहाची धडक, तापमानवाढ आणि अतिलोकसंख्येमुळे पृथ्वीचा विध्वंस होण्याआधीच मानवाने चंद्र आणि मंगळावर वस्ती करावी असे त्यांनी म्हटले आहे. कदाचित तेच जीवसृष्टीचे भवितव्य असावे.

संकलन : सुनील कांबळी