सध्या देशातील सर्वाधिक स्टार्टअप हे मुंबई व पुण्यात होतात, मात्र आपण त्याची योग्य नोंद घेत नाही. महाराष्ट्रात स्टार्टअपची राजधानी बनण्याची ताकद आहे. पुणे स्टार्टअपचे पार्क असेल. त्यानुसार राज्याचे स्टार्टअपसंबंधीचे स्वतंत्र असे र्सवकष धोरण तयार करण्यात येत आहे.

आ ज जग व भारत ज्या परिस्थितीतून चालला आहे, त्यामध्ये विकासासाठी फार मोठी संधी आहे. या संधीचा योग्य उपयोग करणे व त्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा एका मोठय़ा गुंतवणूकदाराला भेटलो तेव्हा त्यांना विचारले, तुम्ही गुंतवणूक कशी करता? तेव्हा त्यांनी असे सांगितले की, मी एका वेळी १०० स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो. त्यातील ९६ अपयशी होणार हे माहीत असते, पण जे चार यशस्वी होतात त्यातून उर्वरित उद्योगांमधील गुंतवणूक व दसपट फायदा कमावता येतो. पण ही सोय आपल्या देशात नाही.

Meeting in Mumbai under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde regarding Sulkood water supply Kolhapur
पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार
Supriya Sule pune
लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही – सुप्रिया सुळे
Resident doctors strike continues Mard insists on strike despite Deputy Chief Minister Ajit Pawars appeal
निवासी डॉक्टरांचा संप सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतरही ‘मार्ड’ संपावर ठाम

भारतीय अर्थ व्यवस्थेच्या तीनही क्षेत्रांत स्टार्टअपला खूप मोठी संधी उपलब्ध आहे. सध्या सेवाक्षेत्र मोठय़ा वेगाने वाढत आहे. देशाच्या सकल उत्पादनात त्याचा ६० टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात स्टार्टअपसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर संधी आहे. आलेली संधी समजावून घेऊन त्याचा उपयोग करून, त्याला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी त्या संधीचा विकास करणे म्हणजे स्टार्टअप होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोकडरहित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या धरलेल्या आग्रहामुळे राज्यात स्टार्टअपसाठी नंदनवन खुले झाले आहे.

सध्या देशातील सर्वाधिक स्टार्टअप हे मुंबई व पुण्यात होतात, मात्र आपण त्याची योग्य नोंद घेत नाही. महाराष्ट्रात स्टार्टअपची राजधानी बनण्याची ताकद आहे. पुणे स्टार्टअपचे पार्क असेल. त्यानुसार राज्याचे स्टार्टअपसंबंधीचे स्वतंत्र असे र्सवकष धोरण तयार करण्यात येत आहे. स्टार्टअप धोरणास अंतिम रूप देताना ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या दोनदिवसीय परिषदेतील विचारमंथनातून पुढे आलेल्या मुद्दय़ांचा साकल्याने विचार करून हे मुद्दे धोरणात समाविष्ट  केले जातील. महाराष्ट्रात ‘स्टार्टअप’साठी पूरक वातावरण व व्यवस्था तयार करण्यारिता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

तशी प्रत्येक घटना काही ना काही शिकविते. रोकडविरहित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. रब्बी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाचा ते कशासाठी उपयोग करू शकतात, याचा विचार करावा लागेल. शेतमजुरांना रोख मजुरी द्यावी लागेल, पण याव्यतिरिक्त खते, बियाणे, खरेदी करण्यासाठी रोकडविरहित व्यवहार करता येईल. कृषीक्षेत्रात ई-मार्केटिंगमुळे वितरण व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर स्टार्टअप सुरू करता येईल.

‘स्टार्टअप’चा विचार करताना कृषीक्षेत्रातील अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रात दोन-तीन रुपये किलो दराने कांदा विकला जातो. मात्र आसाममध्ये एक किलो कांद्यासाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागतात. कृषी उत्पादनाच्या पुरवठय़ाचा हा प्रश्न आहे. त्याचे संधीत रूपांतर करून सामान्य माणसाला, ग्राहकांना त्याचा लाभ कसा मिळेल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

सध्या राज्य सरकारने मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असलेल्या व स्टार्टअपची शक्यता असलेल्या वेगवेगळ्या अकरा क्षेत्रांत स्टार्टअपच्या संधी खुल्या करून दिल्या आहेत. ११० संकल्पना तयार करत आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या व्यावसायिक जागांमधील ५ टक्के जागा स्टार्टअपसाठी सर्व व्यवस्थांसह उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पुण्यात स्टार्टअप पार्क उभारण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. तसेच राज्यत स्टार्टअपची गावे तयार करण्याचाही विचार आहे.

नवउद्यमींना बंगळुरूचे आकर्षण असते, अशी चर्चा कायम होते. परंतु महाराष्ट्रालाच देशाची स्टार्टअपची राजधानी बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी स्टार्टअप पार्क, स्टार्टअपची गावे तयार करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी पूरक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. सरकारने यात थोडय़ा सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर खासगी क्षेत्रही त्यासाठी पुढे यायला तयार आहे. अनेकदा कल्पना भन्नाट असतात, परंतु त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन त्या प्रत्यक्षात आणता येऊ शकतात का, याचा  सर्व अंगांनी विचार करून राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण लवकरच तयार केले जाईल.

योग्य वेळ साधणे हेच यशाचे गमक

अनेक नवउद्योग हे काळाच्या खूप पुढे असतात, तर अनेक उद्योग अल्पावधीत काळाच्या मागे जातात. पण काळाला अनुसरून सुरू केलेले उद्योग हे यशस्वी होतात. असेच काही नवउद्योग यशस्वी झाले आणि त्यांच्या यशाचे नेमके काय गमक आहे हे या परिसंवादातून उलगडले.

विचारमंथन आवश्यक

नवउद्योगाची संकल्पना सुचली की ती तशीच्या तशी राबविली जाईल असा विचार करू नका. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी त्यातील तज्ज्ञांशी चर्चा करा. चहूबाजूंनी विचार करून मगच निर्णय घ्या. ही प्रक्रिया करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोणते संस्थात्मक प्रयत्न होत आहेत याबात यामध्ये चर्चा झाली.

टीम दर्जाचीच हवी! – प्रा. मिलिंद अत्रे,‘साइन’, आयआयटी, मुंबई

आयआयटीतून शिकून स्वत:चा नवउद्योग यशस्वीपणे चालविणारे अनेकजण आहेत. येथील विद्यार्थ्यांना आता त्यांच्यासोबत काम करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांकरिता ‘सोसायटी फॉर इनोव्हेटीव्ह अ‍ॅण्ड आंत्रप्रेनरशीप’ अर्थात ‘साइन’ ही मुंबईच्या आयआयटीतील संस्था कार्यरत आहे. साइनच्या मदतीमुळे सध्या जवळपास ८५ नवउद्यमी आपापल्या व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत. ‘साइन’ने आयआयटीत नवउद्यमींसाठी पोषक वातावरण निर्माण केले असून तेथे एका नवउद्यमीला तीन वष्रे काम करण्याची संधी दिली जाते. नवउद्यमी बनू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांची टीम महत्त्वाची असते. कारण, एखादी नवीन, धाडसी योजना अयशस्वी ठरू शकते. परंतु, टीमच सक्षम नसेल तर चांगली योजनाही यशस्वी होऊ शकत नाही. ‘साइन’च्या मदतीने नवउद्यमींना आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविता येतात व बाजारात यशस्वी करता येतात. ‘साइन’ नवउद्यमींना महिना केवळ आठ हजार रुपयांमध्ये अत्याधुनिक फर्निचरने सुसज्ज ४०० त ४५० चौरस फूट जागा उपलब्ध करून देते. त्यासाठी लागणारे वीज, वायफाय, पाणी आदी सेवाही साइनच पुरविते. नव्या उद्योजकांना जम बसविण्याकरिता तीन वर्षे ही मदत दिली जाते. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या पायावर उभे राहायचे असते. या सुविधेचा बाहेरील विद्यार्थ्यांनाही फायदा व्हावा या उद्देशाने आता आम्ही ‘व्हच्र्युअल इन्क्युबेटर’ही सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. नवउद्यमींना त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले हे वातावरण अनुकूल ठरते आहे. या प्रकारचे अनुकूल वातावरण इतर शिक्षण संस्था आणि शाळांमध्येही निर्माण व्हायला हवे. काही अभियांत्रिकी शिक्षणसंस्था या करिता पुढाकार घेत आहेत.

महाराष्ट्रीय मनोवृत्ती बदलत आहे – मृदुला बर्वे संस्थापक, ओ पंडित डॉट कॉम

आजवर आपल्याकडे मुलगा किंवा मुलीने शिक्षण घेतले की त्याने किंवा तीने नोकरीच करावी अशी मनोवृत्ती होती. पण आता या मनोवृत्तीतून महाराष्ट्रीयन बाहेर पडत आहेत. ही मनोवृत्ती बदलत आहे, आजची तरुणपिढी स्टार्टअपचा विचार करीत आहे, ही समाधानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.  कोणत्याही प्रकारचा स्टार्टअप सुरू करण्यापूर्वीची दोन वर्षे आणि उद्योग सुरू झाल्यानंतरचे तीन-चार महिने खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असतात. कोणताही व्यवसाय सुरू करताना उतावीळपणाने नव्हे तर विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो.  तुमचे ‘बिझनेस मॉडेल’ हेच तुमचे बलस्थान असले पाहिजे. त्यात एकही त्रुटी असता कामा नये. यात उत्पादन बाजारात कधी आणायचे इथपासून ते आपला व्यवसाय भविष्यात किती प्रमाणात विस्तारित करावयाचा आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. एकदा तुमची संकल्पना निश्चत झाली की  खबरदारीची बाब म्हणजे तुम्ही जो उद्योग सुरू करणार आहात त्याची नोंदणी, बोधचिन्ह, ब्रीदवाक्य या गोष्टींची पूर्तता करून त्याचे ट्रेडमार्किंग करणे खूप महत्त्वाचे आहे. याचबरोबर व्यवसाय-उद्योगात वेळ व्यवस्थापनालाही खूप महत्त्व आहे.

कृषी क्षेत्रात नामी संधी – प्रशात नारनवरे,जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

उस्मानाबाद हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी आम्ही जिल्ह्यात ‘कम्युनिटी कॉर्पोरेट’ ही संकल्पना राबवण्याचे ठरवले. म्हणजेच एकाच व्यवसायातील शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची कंपनी स्थापन करायची व त्या कंपनीमार्फत त्यांनी व्यवसाय करायचा. जेणेकरून त्यांना बाजारात व्यासपीठ निर्माण होईल. आज उस्मानाबाद जिल्ह्य़ातील २ लाख ८८ हजार शेतकरी या संकल्पनेखाली एकत्र येत काम करत असून त्यांचे ब्रँड तयार झाले आहेत. तसेच दुधाचेही आमच्याकडे तीन ब्रँड तयार झाले असून त्याला मागणी आहे. उस्मानाबादी शेळी ही सुप्रसिद्ध असून तिच्या मटनाला मोठी मागणी असते. म्हणून उस्मानाबादी शेळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही एक संघटना बनविली आणि त्यांच्या कंपनीमार्फत उस्मानाबादी शेळीचा व्यापार सुरू केला. यापुढे जाऊन मध्यप्रदेशातील ‘कडकनाथ’ या काळ्या कोंबडीचे आमच्या येथील शेतकरी गटाने उत्पादन सुरू केले. ही कोंबडी १२०० रुपये किलो व तीचे एक अंड ६० रुपयाला विकले. कृषी क्षेत्रात उद्योग करण्यासाठी नाबार्ड, केंद्र शासन यांचीही मदत मिळते. त्यामुळे कृषी क्षेत्राकडे ‘स्टार्ट-अप’ म्हणून नवउद्यमींना पाहता येईल.

सरकारने अधिक अनुकूल व्हावे

आजमितीस कर्नाटकमध्ये अवघ्या चार तासांत कंपनी स्थापन होते. पण महाराष्ट्रात आजही एखादी कंपनी स्थापन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर राज्याला स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळख मिळवायची असेल तर धोरणांमध्ये अनेक बदल आवश्यक असल्याची बाब या चर्चासत्रात समोर आली.

बाळकडू शालेय वयातच मिळावे – प्रा. दीपक फाटक, प्राध्यापक, आयआयटी.

‘स्टार्टअप’चे बाळकडू किंवा इंजेक्शन हे शालेय वयातच मिळाले पाहिजे. यासाठी आपला विचार बदलण्याची खरी गरज आहे. ‘स्टार्टअप’साठी घरातील सगळ्यांचा, कुटुंबाचाही संपूर्ण पाठिंबा असला पाहिजे. आपल्या मुलांमध्ये ती जिद्द, ईर्षां निर्माण केली पाहिजे. ‘स्टार्टअप’ हे ‘शेट्टी’/ ‘गुप्ता’ याच आडनावाच्या माणसांनी करायची गोष्ट आहे, आपण त्या वाटेला जाता कामा नये. आपण आपला अभ्यास करून पदवी मिळवावी आणि सुरक्षित नोकरी करावी, ही मध्यमवर्गीय मानसिकता बदलली पाहिजे. वय वर्षे २० नंतर ‘स्टार्टअप’कडे वळू नका. जितक्या लहान वयात तुम्ही धोका पत्कराल तेवढे चांगले.असा धोका जो पत्करायला तयार आहेत त्यांच्या मनाची तयारी असेल, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्याला नाउमेद करू नका. ‘आंत्रप्रेनरशिप’ म्हणजे काय हे भारतातील प्रत्येक महाविद्यालयात शिकविले पाहिजे. आपल्या देशातील चित्र अजून बदलले आहे असे वाटत नाही. शंभरपैकी अवघ्या दोन जणांनाच काहीतरी नवीन करण्याची आच आहे. ‘स्टार्टअप’ला चालना म्हणून केंद्र आणि राज्य शासनानेही काही गोष्टी केल्या पाहिजेत. नवीन कंपनी सुरू करण्यासाठीची परवानगी कमीतकमी वेळेत मिळाली पाहिजे. ही प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे. कर्नाटक-बंगलोर येथे एखादी व्यक्ती घरातूनही कंपनी सुरू करू शकते. महाराष्ट्रात तसे करता येत नाही. एखाद्या मोठय़ा कंपनीची नवी उपकंपनी स्थापन करणे म्हणजे ‘स्टार्टअप’ असे मी मानत नाही.  नव्या कल्पना घेऊन काम करणारी ती कंपनी असली पाहिजे.

कल्पना, जिद्द आणि धाडस हवे – दीपक घैसास, अर्थतज्ज्ञ

‘स्टार्टअप’ म्हणजे कोणतेही नवे तंत्रज्ञान नाही. तर समाजाला उपयोगी पडेल अशी कोणतीही नवी कल्पना मनात आल्यानंतर जिद्द आणि धाडसाने ती प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे ‘स्टार्टअप’ होय. संगणक, भ्रमणध्वनी आदी गोष्टी नवीन कल्पना सुचण्यास मारक आहेत. ‘मेक इन इंडिया’साठी भारतात रेल्वे आणि संरक्षण या दोन विभागात खूप मोठा वाव आहे. या दोन्ही विभागांसाठी लागणारे सर्व साहित्य, वस्तू भारतातच तयार झाल्या पाहिजेत. ‘स्टार्टअप’ सुरू करताना ती कल्पना समाजाच्या उपयोगी पडणारी, त्यांच्या अडचणी दूर करणारी असेल तर ‘स्टार्टअप’मध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असू शकते. नवनवीन कल्पना मनात यायला आणि त्या प्रत्यक्षात आणायला तुमच्याकडे अभियांत्रिकीचीच पदवी असली पाहिजे असे नाही. एखादी नवी कल्पना मनात आली की ‘स्टार्टअप’ सुरू होते. तुमच्या मनात आलेली कल्पना एखाद्याची अडचण दूर करणारी, त्याच्या उपयोगी पडणारी असली पाहिजे. तशी ती असेल तरच ‘स्टार्टअप’ वेगाने पुढे जाईल. त्यामुळे आपल्या मनात आलेल्या नव्या कल्पनेमुळे त्याचा कोणाला, कसा आणि किती फायदा होणार आहे, हे पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात आज मोडी भाषा वाचणाऱ्यांची आणि समजणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. जमिनीचे सातबारा उतारे आणि अन्य माहिती, महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. ते वाचणाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. त्यामुळे मोडी लिपी शिकणे हे तरुणांना फायदेशीर ठरू शकते. राज्य शासनानेही त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे ते जाहीर करावे. म्हणजे त्या गोष्टी करण्यासाठी तरुण मंडळी पुढे येऊ शकतील. राज्य शासनाने ‘स्टार्टअप’च्या बाबतीत आपले र्सवकष व ठोस धोरण जाहीर करावे.

प्रयोशील व्हा! – राकेश देशमुख, सहसंस्थापक व मुख्याधिकारी, इंडस ओएस

मी ‘आयआयटी’ मुंबईतून माझे शिक्षण पूर्ण केले. या काळात मी दोन ‘स्टार्ट-अप’मध्ये केवळ अनुभव मिळण्यासाठी सहभाग घेतला होता. २००७ मध्ये या प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यानंतर आजवर मिळालेल्या अनुभवातून वर येऊन मी आज नवे ‘स्टार्ट-अप’ सुरू करू शकलो. सुरुवातीच्या काळातले ‘स्टार्ट-अप’ हे मोबाइलवरून भरण्यात येणाऱ्या पैशांसंदर्भात होते. त्याच वेळी मी कॅशलेसचा विचार तसेच क्यूआर कोडचा वापर केला होता. त्यानंतर अँड्रॉईड ओएस बाजारात आली. त्यापूर्वीच आमचे हे सगळे प्रयत्न करून झाले होते.  आम्हाला म्यानमारमधून एक वेगळी ओएस बनवण्यासंदर्भात काम कराला का? असा फोन आला आणि आम्ही लगेचच ते आव्हान स्वीकारले. त्या दिवसात अमेरिका व चीन या देशांकडे स्वत:च्या ओएस होत्या, मग भारताची स्वतंत्र ओएस का असू नये, असा विचार करत भारतीय ओएस बनवण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच वेळी नोकियाने हिंदी भाषेचा पर्याय असलेला मोबाइल बाजारात आणला होता, मग आम्ही भारतीय भाषांचा पर्याय असलेली ‘इंडस ओएस’ बनवली. तसेच त्यात लघुसंदेश भाषांतरित करण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला. अँड्रॉईडशी टक्कर देताना आम्ही स्वत:ची ओएस बाजारात आणली तेव्हा ती भारतीय भाषांमध्ये आणल्याने लोकांनी तिला पसंती दिली. आम्ही बऱ्याच कंपन्यांकडे गेलो, त्यांपैकी मायक्रोमॅक्स कंपनीने युनाईट-३ या त्यांच्या मोबाइलमध्ये ही ओएस वापरली. त्यानंतर त्यांचा तो मोबाइल सगळ्यात जास्त विकला गेला आणि मायक्रोमॅक्सने स्वत:ची ओएस म्हणून ती स्वीकारली. सरकारसोबतही आम्ही काम करत असून ‘आयआयटी’सोबत ‘टेक्स्ट टू स्पीच’वर काम सुरू केले आहे.  तुमच्या व्यवसायात तुम्ही प्रयोगशील असणे आवश्यक आहे. तसे राहिलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

सर्वोत्तम सेवा द्यापरेश राजदे,संस्थापक, सुविधा

नऊ वर्षांपूर्वी ‘सुविधा’च्या रूपाने मी नवउद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ‘सुविधा’ ही पेमेंट क्षेत्रातील कंपनी आहे. २००७ मध्ये ही कंपनी अस्तित्वात आली. यामागचे कारणही तितकेच वेगळे आहे. कंपनी स्थापन करण्यापूर्वी मी २००६च्या सुमारास रेल्वे तिकिटासाठी मोठय़ा रांगेत उभा होतो. बराच वेळ रांगेत उभे राहूनही मला तिकिटाचे आरक्षण मिळाले नाही. त्यानंतर रेल्वे तिकीट आरक्षण ऑनलाइन मिळाल्यास लोकांचा हा त्रास वाचेल ही संकल्पना मला सुचली आणि मी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांना हा प्रकल्प मान्य झाल्यानंतर रेल्वे तिकीट आमच्यामार्फत प्रथम ऑनलाइन मिळण्यास सुरुवात झाली. आज १४ लाखांहून अधिक रेल्वे तिकिटे आमच्याकडून आरक्षित केली जातात. पण जेव्हा मी रांगेत उभा राहिलो होतो तेव्हा रेल्वेकडून केवळ १० हजार आरक्षित तिकिटे विकली जात होती.  तसेच आज गावांतून शहारत स्थलांतरित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा गावांत नातेवाईकांकडून २०११ पूर्वी मनीऑर्डर पाठवली जात असे. यासाठी ‘केवायसी’ नियमांच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही ‘एनईएफटी’द्वारे पैसे घेऊन देण्याचा मार्ग स्वीकारला. आज हा ५० हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे. कारण तुम्ही लोकांना सेवा देत असाल तर ते तुम्हाला काही पैसे जास्तीचे द्यायला तयार आहेत.

जिद्द व चिकाटी ठेवा – सचिन टेके, संस्थापक, ‘एमइंडिकेटर

कोणतेही काम सुरू करण्यासाठी मनातील जिद्द महत्त्वाची असते. एम इंडिकेटरचे सध्याचे यश मोठे असले तरी लहानपणापासूनच नवीन काही तरी करण्याची माझी धडपड होती. जे शिक्षण घेतले त्यात एखाद्या विषयात विशेष प्रावीण्य असायला हवे हे जाणकारांनी समजावले. जावा स्क्रिप्ट सॉफ्टवेअर शिकलो. या संदर्भातील वेगवेगळ्या वेबसाइट्स इंटरनेटवर शोधल्या. यामुळे आवड वाढत गेली. स्टार्टअप करताना अनेक अडचणी येत असतात. एखादी गोष्ट शिकताना त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या पर्यायांचा शोध घेतला पाहिजे. ऑफिसमध्ये काम करतानाच नवीन काही तरी करायची कल्पना मनात सुरू होती.  रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील गर्दी पाहिल्यावर या गर्दीतील लोक एक दिवस आपल्या उत्पादनाचे उपभोक्ते असले पाहिजेत, असा विचार मनात आला आणि एमइंडिकेटर साकारले गेले. सतत काही तरी नवीन करण्याचा उद्देश ठेवायला हवा. यश साध्य करण्यासाठी सुरुवातीपासून मनामध्ये कामाची आखणी असायला हवी.  वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीला कौशल्याने हाताळण्याचे कसब असायल हवे.

बाजार स्पर्धात्मक नाही तर वरचढ आहे – महेश मूर्ती, बीजभांडवलदार

विविध उत्पादने आणि सेवांचा बाजार हा सध्या स्पर्धात्मक नाही तर वरचढ कोण ठरू शकते, वरचष्मा कोणाचा राहील या स्वरूपाचा आहे. ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या ‘ब्रॅण्ड’नी कोणतीही जाहिरात न करता मौखिक प्रसिद्धीच्या जोरावर या क्षेत्रात आपला वरचष्मा/वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘स्टार्टअप’ सुरू करताना परदेशातील सेवा किंवा उद्योग यांचे अनुकरण करू नका. आपला समाज व संस्कृती, त्यांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊनच ‘स्टार्टअप’ राबवा. कोणत्याही उद्योग/व्यवसाय क्षेत्रात आज मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ही स्पर्धा विचारात घेऊनच ‘स्टार्टअप’साठीची पावले टाकावीत.  ‘स्टार्टअप’साठी आर्थिक मदत करताना गुंतवणूकदार त्या कंपनीतून आपण गुंतवलेले पैसे आपल्याला परत मिळतीलना याचा विचार करूनच गुंतवणूक करत असतात. नवीन कंपनी सुरू करताना दोन वर्षे फायदा होणारच नाही, असा विचार करूनच तयारी करा.

 

प्रायोजकांच्या प्रतिक्रिया

नवउद्योगाला नवी दिशा मिळेल

‘लोकसत्ता’ने स्टार्टअप या विषयाला महत्त्व देऊन बदलता महाराष्ट्र या उपक्रमात त्याचा समावेश केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या परिसंवादात दोन दिवस स्टार्टअपशी सबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. यातून नक्कीच राज्यातील नवउद्योगाला नवी दिशा मिळणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर खरोखरच मध्यमवर्गीय लोकही धोका स्वीकारून नवउद्योग उभारण्यास तयार होतील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. जर यातून खरोखरीच नवउद्योग तयार होतील आणि तसे होणे म्हणजे हा ‘लोकसत्ता’ आणि मुख्यमंत्र्यांचा विजय असेल. – केसरी पाटील, अध्यक्ष, केसरी

चर्चा मार्गदर्शक ठरेल

‘लोकसत्ता’ने या परिसंवादाच्या माध्यमातून स्टार्टअपच्या विषयाला नवी दिशा दिली आहे. दोन दिवसांच्या परिसंवादात विविध पैलूंवर चर्चा झाली. ही चर्चा नक्कीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. याचबरोबर सरकारी धोरणांनाही दिशा देणारी ठरेल.  – महेश अगरवाल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रिजन्सी.

 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

महत्त्वपूर्ण माहिती मिळाली

‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत ‘स्टार्टअपचे पर्व’ या परिसंवादातून स्टार्टअपविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. एखादे ‘नवउद्यम’ सुरू करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यावेळी संकल्पना सुचण्यापासून भांडवल उभे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आपण करीत असलेल्या कामाबरोबरच वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांना सांभाळून घेण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्यही आत्मसात करण्याची गरज असते हे सचिन टेके यांच्या भाषणातून उलगडले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला देशाची स्टार्टअपची राजधानी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे भविष्यात याबाबत जागरूकता बाळगणे आवश्यक आहे. – जोत्स्ना भाटवडेकर, विद्यार्थी.

अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या

‘स्टार्टअपचे पर्व’ या विषयातील सर्व उपक्रम माहितीपूर्ण होते. मान्यवरांनी ‘नवउद्यम’ सुरू करताना आवश्यक असलेल्या गुणकौशल्याची मांडणी केली. नोकरीच्या तुलनेत ‘नवउद्यम’ सुरू करताना अधिक सजग आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपची घोषणा केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र दोन दिवसांच्या सत्रामुळे अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या आणि या विषयाबद्दल मनात असलेली भीतीही कमी झाली. नव्या पिढीला जर लहानपणापासूनच नवउद्यमबद्दलची माहिती दिली तर भविष्यात करिअर करण्याचे एक वेगळे क्षेत्र खुले होईल. – सानिया आठवले, विद्यार्थी.

अहवाल मुख्यमंत्र्यांना देणादर

आम्ही सरकारसोबत काम करत असल्याने ‘स्टार्ट-अप’ सुरू करताना नवउद्योजकांना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता भासते याची आम्ही माहिती जाणून घेतली. तसेच नवउद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी धोरण ठरवताना सरकारची भूमिका काय असावी हेदेखील समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबर जे वक्ते या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात सहभागी झाले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या. तसेच येथे आलेल्या विद्यार्थ्यांशीही बोलून त्यांचे प्रश्न समजून घेतले. या सगळ्याचा आम्ही एक अहवाल तयार करून ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. – वरुण संघवी, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

 

योजनेतील विद्यार्थी.

खूप काही उमगले

‘स्टार्टअप’ सुरू करण्यासाठी वेगळी व अभ्यासू मनोवृत्ती लागते. तरच या क्षेत्रात पुढे जाऊन यश मिळवता येईल ही महत्त्वाची बाब ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात समजून आली. तसेच या क्षेत्रात आल्यावर अपयश स्वीकारण्याचीही तितकीच तयारी असावी लागते. एकदा अयशस्वी झालात तर तुम्हाला परत उठावे लागते आणि त्यासाठीची मनोभूमिकाही असावी लागते हेदेखील या उपक्रमातून समजून आले. – प्रथमेश नाईक, पीटीव्हीए इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट

 

  • सूत्रसंचालन – रोहन टिल्लू, अरुंधती जोशी, आसिफ बागवान, नीरज पंडित
  • वार्ताकन – रेश्मा शिवडेकर, वीरेंद्र तळेगांवकर, सचिन रोहेकर, मधू कांबळे, संजय बापट, प्रशांत मोरे, किन्नरी जाधव, शेखर जोशी, अक्षय मांडवकर, संकेत सबनीस, मीनल गांगुर्डे, रेश्मा राईकवार, किशोर कोंकणे छायाचित्रे-  दिलीप कागड व गणेश शिर्सेकर