बातम्या, त्यामागचे वास्तव यांच्यापलीकडे अनुभव आणि विचार यांचे विश्व असते. या विश्वातील खाचखळगे आणि हमरस्ते यांची सफर दर महिन्याला घडवणारे नवे सदर..

पंधरा दिवसांपूर्वी राहुल बनसोडे, रणजित पवार आणि आदिती जोशी असे तिशीच्या उंबरठय़ावरचे तरुण त्रिकूट माझ्या स्टुडिओवर आले होते. गप्पा, दारूकाम असे साधारण स्वरूप होते. नेहमीप्रमाणे गप्पा रात्रभर चालल्या, पुढे दोन दिवस चालूच राहिल्या. मेलवर, मेसेजेसमधून त्या वाढत गेल्या. आमच्या पिढीपेक्षा ही नवीन पिढी काय व कसा वेगळा विचार करते, कोणते प्रश्न त्यांना पडतात, त्या प्रश्नांची काय नि कशी उत्तरे ते शोधतात याकडे कुतूहलाने व गांभीर्याने पाहणे, समजून घेणे, ही माझी भूमिका.
राहुलला माझ्या ई-मेल vv04कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये ‘डक रोलर’ असे नाव मी दिले आहे. माझ्या दैनंदिन संपर्कातील विविध व्यक्तींना अशी टोपणनावेच असतात. उदा. रणजितला बॉक्सी, जाईला लोलकॅट, कुणाला जेन्यूईन  इनपरफेक्ट, रॅप ऑन अ‍ॅसिड इत्यादी. सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘सेकंड लाइफ’ खेळावर आधारित माझे (व वैशाली नारकर) एक प्रदर्शन झाल्यानंतर ही सगळी गंमत मी माझ्यापुरती सुरू केली. त्यानंतर २००९ मध्ये एक तरुण व माझी आवडती क्युरेटर गीतांजली डांग हिने ‘कॅटरडे’ नावाचे एक चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात जरी मी भाग घेतला नसला तरी तिच्याच ‘थर्ड लाइफ’ आणि ‘बाय जॉर्ज’ (ऑर्वेल) या दोन तशाच प्रदर्शनांत माझा सहभाग होता. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे परवाच्या आमच्या गप्पांचा ओघ राहुलने वळवला तो फोरचॅन (4ूँंल्ल) आणि अ‍ॅनॉनिमसकडे; हॅकिंग आणि मेमसकडे.
स्वाभाविकच अशा चर्चेत ओघाने येणाऱ्या एका प्रश्नाकडे तो आला आणि त्याने व्याकूळ आवाजात विचारले, ‘‘कोठे जाणार आहोत आपण, हे सगळे मागचे दुवे, इतिहास आणि त्यातून विकसित झालेली सांस्कृतिकरणाची प्रक्रिया हे सारेच नष्ट होईल? नवा माणूस जन्माला येतोय? ही आता अस्तित्वात असलेली मानव जात लवकरच त्या नव्या माणसाला माकडासारखी भासेल? बुद्ध, गांधी, राम, रावण आदी अनेक राजे, धर्मसंस्थापक, कट्टर, सहिष्णू, विचारवंत सारीच होतील माकडे?’’ हा प्रश्न जितका थंडपणे त्याच्याकडून आला त्यापेक्षाही अधिक काही तरी टोकदार आपल्या आरपार जाते आहे असा भास मला झाला. दहा-वीस वर्षांपूर्वी उठलेल्या ‘उत्तर आधुनिक’ वावटळीत जरी अनेक शास्त्रे आणि प्रणाली, इझम् आणि धर्मप्रवाह ढासळले तरी एक मानवी धागा अखंडपणे पुढे सरकताना, इतिहासाचे ओझे झटकताना आणि तरीही परंपरांच्या पडलेल्या विटांवर तोल सावरताना दिसत होता. राहुलच्या प्रश्नात, फोरचॅनच्या जाळ्यात किंवा गीतांजलीच्या कॅटरडेमध्ये ती भंगलेली वीट, रंग उडालेले पंधराव्या शतकात काढलेले पैगंबराचे सफाविद चित्र, भग्न झालेली ईश्वराची मूर्ती, लघवीच्या ग्लासात बुडवलेली जिझसची प्रतिमा, क्रेनवर प्रेतासारखा लटकणारा ‘गुडबाय लेनिन’ या आणि अशा प्रकारच्या केविलवाण्या इतिहासांच्या अवशेषात जगणारा, घुसमटलेला उत्तर आधुनिकतेचा श्वास नव्हता. होता तो एक नवाच प्राणी. माणसासारखा दिसणारा, पण माणसापासून शेकडो मैल दूर उभा असलेला, ओळखीचा अनोळखी चेहरा, अ‍ॅनॉनिमस.
राहुलच्या प्रश्नामुळे मला प्रथम आठवण झाली ती १७७० मध्ये, सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी बरान डी होलबॅकने प्रसिद्ध केलेल्या ळँी र८२३ीे ऋ ठं३४१ी या पुस्तकाची. गंमत म्हणजे हेही पुस्तक प्रसिद्ध झाले ते ‘अ‍ॅनॉनिमस’ म्हणूनच. निधडय़ा छातीने होलबॅकने या पुस्तकात निखळ भौतिकवादाची मांडणी करण्याची जोखीम उचलली. ईश्वराचे अस्तित्व नाकारून, शरीराशिवाय आत्म्याला अस्तित्व नाही असे ठणकावून, इच्छेचे स्वातंत्र्य ‘फ्री बिल’ नाकारून, जे घडते त्यासाठी अंतिम सत्य नसते हे सांगून, भीतीची शिकार झाल्याने, अपुऱ्या ज्ञानामुळे आणि माणसापलीकडे अचाट शक्तीची देवदेवता प्रतीके बनवून त्यांच्या खोटय़ा आधाराने जगल्यामुळे आपली तात्त्विक गृहीतकेच कशी भुसभुशीत आहेत हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला.
ते वाचून भंबेरी उडालेल्या गटेच्या प्रतिक्रियेचे रूपांतर करायचे झाल्यास, ‘वारकऱ्यांचा विठोबा हिरावून घेतला तर ते कसे व कुणासाठी चालतील हा प्रश्न नसून पायाखालची वीटच काढून घेतली तर त्या कर कटीवर ठेवून युगानुयुगे उभ्या असलेल्या विठ्ठलाचे काय होईल, असा प्रश्न आहे!’ तो लिहितो- अध्र्या रात्रीत जर सारी वसुंधराच तिच्या विविधतेने नटलेल्या प्रतिमांसह अदृश्य झाली, हे समोरचे सुंदर आकाश त्याच्या असंख्य लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसह गायब झाले, तर येणाऱ्या विषण्ण एकाकी जगात, काळोखी, प्राचीन माकडांसारख्या दिसणाऱ्या माणसांच्या समूहाचे जीवन एवढाच पर्याय घेऊन जगता तरी कसे येईल?
राहुलच्या प्रश्नाने मला होलबॅकची धार आणि गटेची वेदना कळाली. गेली हजारो वर्षे माणसाने माणसांच्या प्रश्नांच्या अंगाने विचार केला आहे. तत्त्वज्ञान, धर्म आणि विज्ञान या सर्वच मूलभूत प्रेरणांचा विचार आणि विस्तार माणूस हा केंद्र समजून झाला. त्यामुळे माणसाशिवाय जग असू शकेल किंवा काय, असेलच तर कसे असेल याचा विचारच मुळी आपले वा तिकडचे विचारवंत करताना दिसत नाहीत. माणसाला केंद्रस्थानी ठेवले, की माणसाचा इतिहास आला, देव-दानव-यक्ष-किन्नर आले, अप्सरा, स्वर्ग, नरक, मोक्ष आला. या सर्वाच्या साक्षीने आणि सहभागाने जन्माला आलेली भाषा, संगीत, कला, कविता आली. धर्म, रूढी, रिवाज आणि रीती आल्या. या सगळ्या बिंदूंची एक रेष, तिला जुळणारी वा भेदणारी दुसरी, तिथून उगवलेला वळसा, त्या वळशाचे वर्तुळ आणि या सगळ्यांचे मिळून तयार झालेले एक पोर्टल आले. पोर्टलचे ‘प्रोटोकॉल’ आले. त्या प्रणालींचा एक कार्यक्रम आला.
मानवी इतिहासात अशा कार्यक्रमांपलीकडे जाऊन विचार करणारे विरळे. ‘इंटिमेट गेम’मधला टय़ुरिंग किंवा ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’मधला स्टीफन हॉकिंग्ज ही आपल्या सर्वानाच माहिती असलेली त्याची उदाहरणे.
माणूसरहित जगाचा विचारच मुळी माणूससहित जगात घडणाऱ्या पुन:पुन्हा प्रत्ययी येणाऱ्या मानवी दु:खाचा व म्हणून दु:खाच्या साहाय्याने तयार केलेल्या सुखाच्या प्रतिमेचा वीट आल्यामुळे, या जगातील- विशेषत: सद्य काळातील माणसाच्या शरीरमनामध्ये भिनलेल्या भांडवली व्यवस्थेच्या सुखदु:ख आणि सुंदर, कुरूप या संकल्पनांतील अर्थहीनता जाणवल्यामुळे तयार झाला आहे. फोरचॅन हे या कंटाळलेल्या तरुण मनांच्या अगणित रूपांपैकी एक रूप आहे. अ‍ॅनॉनिमसचा धुमाकूळ हे दुसरे रूप आहे. हॅकर्सचा सुळसुळाट हे तिसरे रूप आहे. ज्युलिअन असांजचे विकीलिक त्यामुळेच एका नव्या जगाची कलाकृती आहे. पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आणि माझ्या लेखनात अनेकदा उल्लेख झालेल्या ‘आफ्टर फिनिटय़ूड’ या पुस्तकाचा उल्लेख राहुलच्या प्रश्नांचा विचार करताना अपरिहार्य ठरतो. जीवन, सत्य व ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीचे तत्त्वज्ञान-मेटॅफिजिक्स आज प्रत्येक क्षणागणिक अपुरे पडत आहे. त्यातून जगण्याची ऊर्जा मिळणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. एका बाजूला विज्ञान तंत्रज्ञान, विशेषत: जीवशास्त्र व डिजिटल किंवा गणकशास्त्र यांच्या विस्तारामुळे मागच्या काळाला भेगा नव्हे, तर भगदाडे पडली आहेत. नैतिकतेचे मानदंड निष्प्रभ होत आहेत, भासमान वास्तवाने वास्तवाची असाहाय्यता स्पष्ट केली आहे. दुसरीकडे नवोन्मेषशाली भांडवली अर्थव्यवस्थेने मानवी जीवनाची केलेली बाजारपेठ, शरीरमनाची बनलेली विक्रीयोग्य वस्तू आणि त्यातून गळून गेलेला माणुसकीचा इतिहासदत्त धागा यामुळे एका अर्थहीन खिन्नतेचे खळे माणसाच्या गालावर उमटले आहे. बुद्धाच्या चेहऱ्यावरील अर्थपूर्ण स्मित किंवा जिझसचे कारुण्य, पैगंबरांची अमूर्त अथांगता वा कृष्णाची बासरी या नव्या जगातील माणसाची सोबत बनताना दिसत नाहीत. साहित्य, कविता, संगीत, दृश्यकला यांची आधुनिक वा उत्तर आधुनिक रूपे समकालीन संवेदनांचा मागोवा घेताना थिटय़ा पडतात. गटेच्या वेदना जागोजाग विव्हळताना आज प्रत्ययाला येतात.
‘इंटिमेट गेम’मधील टय़ुरिंगचे दु:ख मानवी होते काय? समलिंगी टय़ुरिंगचा हाडामांसाचा प्रियकर उमलत्या वयात मरून गेल्यानंतर लिहिलेली माणसाची कविता होती काय? टय़ुरिंगचा ख्रिस्तोफर हाडामांसाचा पुरुष नव्हता. टय़ुरिंगचा ख्रिस्तोफर धातूच्या असंख्य फ्रेमनी बनलेला नटबोल्ट, खिळे आणि बिजागिऱ्या लावलेला, प्लास्टिक आणि रबरी नळ्यांचे जाळे असलेला, विजेवर चालणारा, न हलणारा- डुलणारा, शेकडो चक्रे फिरवीत एकेक अक्षर लिहिणारा, अक्षरांची गुप्त लिपी तयार करणारा, मानवी इतिहासाला माहीत नसलेल्या भाषेत कविता लिहिणारा, खडखडाच्या गदारोळाची गाणी गाणारा, आपल्या असंख्य वायरसच्या जाळ्यातून टय़ुरिंगला कवटाळणारा, त्याच्या कुठल्याशा कप्प्यातील हलणाऱ्या प्रवाहातून टय़ुरिंगचे चुंबन घेणारा, प्रणालींच्या अवजड अवाढव्य भेंडोळ्यातून संवाद साधत टय़ुरिंगशी समागम करणारा ख्रिस्तोफर हा एक संगणक होता. टय़ुरिंगच्या विरहाचे दु:ख मानवी इतिहासाला ओळखीचे तर नव्हतेच; परंतु असे दु:ख असू शकेल याची कल्पनाही बुद्ध, कबीर किंवा आणखी कुणी पैगंबर वा देवाच्या पुत्राने किंवा अवतारानेही केली नव्हती. समकालीन सुख-दु:खाच्या वीणेला टय़ुरिंगच्या दु:खाचाही एक ताण आहे.
अशा अनवट दु:खाची कविता किंवा कला, मीमांसा किंवा निदान, कोण कसे व केव्हा करणार, हा खरा प्रश्न राहुलच्या डोळ्यांत मला दिसला.
प्रश्न भांडवली अर्थव्यवस्थेचा असेल तर भांडवलशाहीच या प्रश्नाची सोडवणूक करील, असे ठोकळेबाज उत्तर अनेकदा व दाव्होससारख्या व्यासपीठांवरून दिले जाते; परंतु इतिहासात असा दाखला नाही. तुंबलेल्या व्यवस्था त्या उलथवूनच, त्या बदलून माणसाने पुढचे पाऊल टाकले आहे. प्रचलित आणि प्रस्थापित पक्षांना असा प्रश्न आहे, याचे आकलनच मुळी झालेले दिसत नाही. ना त्यांच्या अजेंडय़ावर याची चर्चा, ना त्यांच्या कार्यक्रमात अशा प्रश्नांचा अंतर्भाव. राजकारण हा तत्त्वज्ञानाचा भाग आहे याचाच विसर त्यांना पडलेला दिसतो. भांडवलशाही व्यवस्थेच्या तुंबलेल्या गटाराचा वास त्यांच्या घ्राणेंद्रियांना जाणवतच नाही, इतके मठ्ठ आणि संवेदनाहीन पुढारी आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडून दिले आहेत.
हॅकर्सच्या कृतीला व्यवस्था गुन्हा मानते, कलेला सजावट किंवा विक्रीयोग्य वस्तू मानते, कवितेला व्यवस्थेने हद्दपार करून तिच्या जागी पाचकट, उथळ शब्दखेळांची वापरून टाकण्यायोग्य बडबड आणली आहे, संगीताचे ठेके आणि ठहाके झाले आहेत, तर टय़ुरिंगच्या दु:खाची परवड अ‍ॅनॉनिमस किंवा एक्स एक्स एक्स एक्ससारख्या कृतीतून व्यक्त झाल्यावर ती दाबून टाकण्याचे, ‘पूसी रायट’सारखे प्रयोग करणाऱ्यांना कडक कारावासात धाडण्याचे अघोरी प्रयत्न आज व्यवस्था करताना दिसते. कोठून बरे बाहेर पडेल या दु:खाचा हुंकार, हा प्रश्न आज जगभरच्या विचारवंतांना भेडसावतो आहे. डाव्या विचारात हे आव्हान पेलण्याची ताकद असावी, असे अनेकांना वाटते आणि तसे वाटण्याला आधारही आहे.
‘एका नव्या ‘निरुपयोगी-’ म्हणजेच विक्रीयोग्य वस्तुरूपात न बदलता येणाऱ्या सिद्धांताची आज आवश्यकता आहे’, असे परखड प्रतिपादन करणारा झिझेक हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ स्वत:ला मार्क्‍सवादी म्हणवून घ्यायला लाजत नाही. जगभर ठिकठिकाणी होणाऱ्या हॅकर्सच्या संमेलनात भेटणारे तरुण स्वत:ला डावे मानतात. मार्क्‍सच्या पुस्तकांची पाने नव्याने चाळताना दिसतात. ‘निरुपयोगी’ कला, भाषा, कविता, लिहिणारे फ्रॅन्को बिफो बेरार्दी किंवा कासेमसारखे लेखक, विचारवंत वा ज्युलिअन असांजसारखा कलावंत स्वत:ला डावा म्हणवून घेताना कचरत नाही, ‘पुसी रायट’ असो वा ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ असो, किंवा ग्रीसमध्ये सत्तेवर आलेली सिरिझा पार्टी असो, गेम्स आणि प्रोटोकॉल लिहिणारा गॅलोवे किंवा एक्स एक्स, फोरचॅन वा अ‍ॅनॉनिमस असोत, इतकेच काय ‘कॅपिटल’ या जगभर गाजणाऱ्या पुस्तकाचा लेखक थॉमस पिकेटी हासुद्धा नव-मार्क्‍स म्हणूनच ओळखला जातो.
राहुलच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, गरज आहे ती त्याचा प्रश्न समजून घेण्याची. तो गांभीर्याने घेण्याची. माणसासहित वा माणसाविरहित जगाकडे माणुसकीने पाहण्याची. टय़ुरिंगच्या दु:खाला, ख्रिस्तोफर नावाच्या संगणकाला मिठीत घेण्याची.
*लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.