अमेरिकेचे अणू तंत्रज्ञान असो, मध्यपूर्व आखात असो वा मानव अधिकार असो, या विषयांशी संबंधित धोरणाबाबतचे निर्णय हिलरी क्लिंटन यांच्या परराष्ट्रमंत्रिपदाच्या कारकीर्दीत होणार होते. याच कालखंडात जगातील अनेक व्यक्ती, कंपन्या, देश यांनी एकीकडे बिल क्लिंटन यांना लाखो रुपयांचे मानधन देत भाषणाला आमंत्रित करून दुसरीकडे हिलरीच्या परराष्ट्र धोरणातून आपला फायदा कसा करून घेतला यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ज्येष्ठ अमेरिकन पत्रकार पीटर स्वायझर यांच्या धक्कादायक संशोधनावर आधारित लेख.

अमेरिकेमध्ये राजकारणी व्यक्तींनी स्वत:च्या निवडणूक प्रचारासाठी कोणाकडून व किती निधी घ्यावयाचा याबाबत कायदा स्पष्ट आहे. गेली अनेक वर्षे या कायद्याच्या बाजूने- विरुद्ध असा अनेकदा विविध चर्चेमधून बराच ऊहापोह झाला आहे. मात्र या देणग्या परदेशी व्यक्ती अथवा परदेशी संस्थांकडून घेऊ नयेत असा जनतेचा स्पष्ट बहुमताचा कौल आहे. २०१२ साली काही परदेशी नागरिकांनी या कायद्याला अमेरिकेत आव्हान दिले. तथापि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ते ९ विरुद्ध ० मतांनी फेटाळले.
पारदर्शकतेचे उदाहरण अमेरिकेने घालून दिले खरे, मात्र तेथील निवडक खासदारांनी नेमके उलट वर्तन केले. कारण त्याच सुमाराला अमेरिकेच्या काही सत्ताधारी व विरोधी खासदारांनी ‘योग्य’ माहितीच्या आधारे ‘योग्य वेळी’ शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री करून स्वत:वरचे ‘आर्थिक संकट’ दूर केले. पीटर स्वायझर यांनी अधिक खोलात जाऊन याचा शोध घेतला असता, अमेरिकेच्या संसदेमध्ये मांडलेल्या बिलांवर होणारे मतदान व खासदारांची त्या वेळची शेअर्सची खरेदी-विक्री यामध्ये एक विशिष्ट साम्य असलेली पद्धत आढळून आली.
स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये ज्याला ‘इन्सायडर ट्रेडिंग’ म्हणतात, त्या प्रकाराविरुद्ध २०१२ साली राष्ट्राला उद्देशून केलेल्या वार्षिक भाषणात राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सडकून टीका केली. वरील प्रकाराला बंधन घालणारा ‘स्टॉक अ‍ॅक्ट’ मंजूरही केला गेला. पण काँग्रेसने (संसदेने) व व्हाइट हाऊसने तो कालांतराने मोडीतच काढला आणि एका नव्या पर्वास सुरुवात झाली.
२००१ साली बिल क्लिंटन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सोडताना हिलरी क्लिंटन यांनी उद्गारलेले ‘वी आर डेड ब्रोक’ (आम्ही कफल्लक झालो) हे वाक्य त्या काळात खूपच गाजले. क्लिंटन दाम्पत्याला या वाक्यामुळे मिळालेली सहानुभूती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रसिद्ध वर्तमानपत्रातील एका लेखाने पार उद्ध्वस्त केली. जगातील विविध व्यक्ती, संस्था व देश यांनी एकीकडे क्लिंटन यांना लाखो रुपये मानधन देत भाषणाला आमंत्रित केले, तर दुसरीकडे याच लोकांनी हिलरींच्या परराष्ट्र धोरणातून आपला फायदा करून घेतला हे त्या लेखाने उघड केले.
२००९ ते २०१२ या काळात क्लिंटन दाम्पत्याचे अधिकृत उत्पन्न १३६ मिलियन डॉलर असल्याचा तपशील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने छापला. याचाच आधार घेत पत्रकार स्वायझर यांनी खोलात शिरून क्लिंटन दाम्पत्याच्या उत्पन्नाबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. क्लिंटन दाम्पत्याचा एकूण उत्पन्नाचा एक प्रमुख भाग हा त्यांनी लिहिलेल्या आठवणींच्या बदल्यात मिळालेला मोबदला, पण उर्वरित आणि सर्वाधिक भाग हा क्लिंटन यांना त्यांच्या जगभरातील भाषणांसाठी मिळालेल्या मोबदल्याद्वारे होता. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर बिल क्लिंटन यांना प्रत्येक भाषणामागे साधारणत: ५ ते ७ लाख डॉलर (३२ ते ४५ कोटी रुपये) मिळत गेले. कफल्लक क्लिंटन यांचे भाषणाद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न सरासरी ४०० कोटींपर्यंत ‘स्थिर’ राहू लागले, असे स्वायझर यांनी म्हटले आहे.
क्लिंटन यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल भविष्यात वाद निर्माण करणाऱ्या ‘द क्लिंटन फाऊंडेशन’ संस्थेची मुहूर्तमेढ खरे म्हणजे ९९ सालीच मॅनहटन येथे रोवली गेली. क्लिंटन प्रशासनाने अल्पवयीन मुलांचे दारूकडे लक्ष वेधणाऱ्या जाहिरातीविरुद्ध एक नियमावली बनविण्याचा घाट घातला. पुढे तो बेत सोडून दिला. पण त्याच्या काही महिने अगोदर ‘अ‍ॅनहुगर-बुश’ यासारख्या संबंधित कंपन्यांनी क्लिंटन लायब्ररीला ६ कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने छापली.
शिकागो शहरातील स्वत:ला कफल्लक म्हणणारे परंतु कोटय़धीश असलेले एक वकील विलियम ब्रॅड यांनी संसदेसमोर दिलेल्या एका साक्षीसंबंधित केंद्रीय न्याय विभागाने चौकशी सुरू केली आणि अवघ्या तीन महिन्यांत ‘अनावश्यक साक्ष’ असल्याचा बोध झालेल्या त्याच न्याय विभागाने ती चौकशी गुंडाळली. दरम्यान ‘गरीब’ वकील ब्रॅड यांनी क्लिंटन यांच्या संस्थेला ६ कोटी रुपयांची देणगी दिली. अमेरिकेतील आणखी एक बडे प्रस्थ डॉ. गॉझालेझ व त्यांचे वकील मिगेल लॉवसेल यांनी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्याकडे प्युटो रिको देशातील आरोग्य सेवेकरिता आर्थिक मदत मागितली. आठ महिन्यांनी प्रशासनाने ती मंजूरही केली. दरम्यान, लॉवसेल यांनी क्लिंटन लायब्ररीला ६ कोटींची, तर गोंझालेझ यांनी ६० लाखांची मदत क्लिंटन फाऊंडेशनला दिली, असेही स्वायझर यांनी नमूद केले आहे.
एफबीआयच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीवरील कोटय़धीश असलेला मार्क रिच हा अमेरिकेतील तेलाचा मोठा व्यापारी. कॅस्ट्रो, खोमेनी अशा दिग्गजांबरोबर तेलाचे व्यवहार करणाऱ्या मार्कला ४८ मिलियन डॉलरचा कर चुकविल्याबद्दल तब्बल २५ वर्षांची कैद होणार होती. धक्कादायक म्हणजे क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडताना सर्वोच्च अधिकाराचा वापर करीत त्याला माफी जाहीर करताच अमेरिकेत हलकल्लोळ माजला. तत्पूर्वी मार्कची पहिली बायको डेनिस हिने हिलरींच्या प्रचारनिधीसाठी एक लाख डॉलर, क्लिंटन लायब्ररीला साडेचार लाख डॉलर व डेमोक्रॅटिक पक्षाला दहा लाख डॉलरची देणगी दिल्याचे स्वायझर यांचे म्हणणे आहे.
कालांतराने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कृष्णवर्णीय ओबामा निवडून आले. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी हिलरी क्लिंटन यांचे नाव नक्की केले. अमेरिकन संसदीय पद्धतीप्रमाणे त्यांच्या नेमणुकीला संबंधित समितीची मान्यता मिळणे आवश्यक होते. दरम्यान, क्लिंटन फाऊंडेशनचा व्यवहार संपूर्ण पारदर्शक राहील, सर्व देणगीदारांची नावे प्रसिद्ध केली जातील, वगैरे आश्वासन देणारी घोषणा हिलरींनी केली. भविष्यात मात्र यातले काही घडले नाही हे स्वायझर यांनी पुढे दाखवून दिले आहे.
हिलरी यांच्या परराष्ट्रमंत्रिपदाच्या कालखंडात बिल यांनी भाषण देण्यासाठी जागतिक दौरे केले. बारा हजार स्क्वेअर फुटांचा बंगला असलेले प्रसिद्ध खाणसम्राट फ्रॅक गिउस्त्रा यांचे खासगी विमान बिल यांना कायम उपलब्ध करून दिले. हे विमान म्हणजे जणू आकाशातील आलिशान फ्लॅट.
२००९ साली हिलरी रशियाला गेल्या. बोइंग विमान कंपनीबरोबर रशियाने ३.७ बिलियन डॉलरचा करारही केला. दोन महिन्यांनंतर बोइंग कंपनीने क्लिंटन फाऊंडेशनला एक लाख डॉलर द्यायचे कबूल केले. लगेचच नंतरच्या मे महिन्यात रशियाच्या रोझाटोम उपक्रमाने अमेरिकेच्या युरेनियम वन या कंपनीचा ५२ टक्के हिस्सा विकत घेत असल्याचे घोषित केले. इराणचा वादग्रस्त अणुप्रकल्प बांधणारी व उ. कोरिया, म्यानमार इ. देशांमध्ये अणू ऊर्जासंबंधी व्यवहार करणारी अशी ही रोझाटोम कंपनी. दरम्यान, युरेनियम वन कंपनीचे अध्यक्ष आयन टेलफर यांनी क्लिंटन फाऊंडेशनला २० लाख डॉलरची देणगी दिली. कॅनेडियन कर विभागाकडील माहिती उघड होईपर्यंत युरेनियम वनची असो वा पुढे उल्लेखलेली टी.डी. बँकेची देणगी असो, परराष्ट्रमंत्रिपद स्वीकारताना पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या हिलरी यांनी या साऱ्या देणग्या गुलदस्त्यात ठेवल्या होत्या.
क्लिंटन फाऊंडेशनच्या विश्वस्तांचा इतिहास तर धक्कादायक आहे. एक प्रमुख विश्वस्त व्हिक्टर डाहडालेह यांना बाहरीनमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंत्राट मिळण्याच्या बदल्यात ३० लाख पाऊंडची लाच दिल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी ‘इन्फोयूएसए’चे चेअरमन विनोद गुप्ता यांना व्यक्तिगत कारणास्तव केलेल्या विमान व बोट प्रवासावर कंपनीचे साडेनऊ दशलक्ष डॉलर वापरल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. विनोद गुप्ता हे क्लिंटन फाऊंडेशनचे आणखी एक विश्वस्त. भारतीय वंशाचे अमेरिकेतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संत चटवाल हेही काही आर्थिक गुन्ह्य़ांत दोषी ठरलेले. क्लिंटन कुटुंबाच्या अत्यंत जवळचे हे संत चटवाल हेसुद्धा विश्वस्तच.
बांगलादेशामधील फूलबारी कोळसा खाण स्टीफन डाटेन्स या प्रसिद्ध कॅनेडियन खाण तज्ज्ञाला वापरण्यास द्यावी असा संदेश बांगलादेशातील अमेरिकी राजदूतांनी अमेरिकी सरकारला पाठविल्याचे ‘विकीलिक्स’ने उघड केले होते. याच डाटेन्सनी कंपनीचे कोटय़वधीचे शेअर्स क्लिंटन फाऊंडेशनला देणगी म्हणून दिले. क्लिंटन कुटुंबीय फाऊंडेशनमधून एक रुपयाही पगार घेत नाहीत. मग एवढय़ा देणग्या घेतात कशाला, हे एक गूढ आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकदा तारणकार बँक संघटनेने बिल क्लिंटन यांचे भाषण ठेवले. विषय काय, तर ‘जागतिक घडामोडी’. मानधन किती दिले, तर दीड लाख डॉलर. २००६ मध्ये ‘फॉच्र्युन फोरम’ने बिल क्लिंटन यांना एका भाषणासाठी चक्क साडेचार लाख डॉलर दिले. एक उदाहरण म्हणून पाहायचे झाले तर नुसत्या २००९ साली बिल यांनी परदेशात ३९, तर अमेरिकेत २० भाषणे दिली आणि त्यातून मानधन किती मिळाले, तर १०९ दशलक्ष डॉलर. २००९ साली हिलरी परराष्ट्रमंत्री झाल्यापासून नंतरच्या केवळ तीन वर्षांत भाषणातून बिल यांना अडीच लाख डॉलर मिळाले. पर्यावरण क्षेत्रातील किस्टोन या कंपनीला एका पाइपलाइनचे मोठे कंत्राट हवे होते. किस्टोन कंपनीचे सुमारे दीड लाख डॉलर किमतीचे शेअर्स हे कॅनडाच्या टी. डी. बँकेकडे होते. याच टी. डी. बँकेने सलग अडीच वर्षे एकूण दहा भाषणांना मिळून जवळपास वीस लाख डॉलरचे मानधन दिले. २०११ साली ५० भाषणांतून बिल यांना १३ दशलक्ष डॉलर मिळाले. २००९ ते २०१३ या कालखंडात प्रत्येक भाषणाला अडीच लाख डॉलर मानधन अशातून बिल यांना ४० दशलक्ष डॉलर मिळाले.
२०११ मध्ये अरब जगतात विशेषकरून इजिप्त व टय़ुनिशियामध्ये उलथापालथ झाली. यूएईला यामुळे धास्ती वाटू लागली. इराणला विविध सामग्रीचा पुरवठा करणाऱ्या यूएईतील अनेक कंपन्यांवर अमेरिकेने बंधन आणण्यास सुरुवात केल्याने यूएईला हादरेच बसू लागले. अखेरीस यूएईच्या राजपुत्रांचे बंधू परराष्ट्रमंत्री हिलरी यांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले. विलक्षण योगायोग म्हणजे त्याच वेळी बिल हे अबुधाबीला पोहोचले. पर्यावरण विषयावरील भाषणासाठी बिल यांना यूएईने तब्बल पाच लाख डॉलरचे मानधन देऊन स्वत:ला राजकीय प्रदूषणातून मुक्त केले.
१२ जानेवारी २०१० च्या दुपारी हैती हा देश प्रचंड भूकंपाने उद्ध्वस्त झाला. सुमारे एक लाख घरे, पंचवीस हजार इमारती- सारे कोसळले. अडीच लाख लोक मृत्युमुखी पडले. अशा भीषण प्रसंगी हैती देशाच्या मदतीला सर्वप्रथम कोण धावले, तर ते म्हणजे क्लिंटन दाम्पत्य. पाठोपाठ हैतीमध्ये घरबांधणीसाठी अमेरिकन सरकारने ‘इनोविडा’ या कंपनीला ६०० कोटींचे कर्जही दिले. प्रत्यक्ष घरबांधणीचा अनुभवसुद्धा सदर कंपनीला नव्हता, पण यातली मेख अशी की, इनोविडाचे प्रमुख क्लाउडिओ ओसोरिओ यांनी हिलरींच्या निवडणुकीला भरपूर आर्थिक मदत केली होती. दुर्दैवाने हैतीमध्ये ती घरे बांधली तर गेलीच नाहीत, पण ओसोरिओंना फसवणुकीच्या आरोपाखाली दोषीही ठरविण्यात आले.
अमेरिकेत एव्हाना आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रंप दर आठवडय़ाला हिलरींवर टीका-आरोप करीत आहेत. क्लिंटन दाम्पत्याच्या कार्यपद्धतीबाबत शंका- प्रश्न उपस्थित करताना नैतिकदृष्टय़ा हे योग्य आहे का? इंग्रजीत म्हणतात तसे हे ‘क्विड प्रो को’मध्ये बसते का? वगैरे यावर निष्कर्ष काढण्याचे काम स्वायझर यांनी जनतेवर सोपवले आहे. कारण तीच अमेरिकन जनता हिलरींना उद्याची राष्ट्राध्यक्ष बनविण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. स्वायझर खोटे ठरण्यापेक्षा हिलरी यशस्वी झाल्या तर एवढेच म्हणावे लागेल, पब्लिक मेमरी इज शॉर्ट.
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि कॉँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.)