इस्रोच्या पीएसएलव्ही उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने जे वीस उपग्रह बुधवारी अवकाशात पाठवण्यात आले त्यात पुण्याच्या सीओईपी या संस्थेच्या ‘स्वयम्’ या उपग्रहाचाही समावेश होता. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला उत्तेजन मिळणार आहे..

बुधवारी पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. गेली आठ वर्षे क ष्ट करून तयार केलेल्या ‘स्वयम्’ या उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून काटरेसॅट उपग्रहाबरोबर होणार होते. त्यामुळे सगळेच जण भावुकही झाले होते व उत्कंठाही वाढलेली होती. सकाळी ९.२६ वाजता उपग्रहाचे उड्डाण यशस्वीरीत्या झाले त्या वेळी उपस्थित मुलांनी एकच जल्लोश केला. नंतर सकाळी अकरा वाजता उपग्रहाकडून पहिला संदेशही भूकेंद्राला (ग्राऊंड स्टेशन) मिळाला. त्याचाच अर्थ उपग्रह व्यवस्थित काम करू लागला होता. साधारण आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये संस्थेचे तत्कालीन संचालक   डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांच्याकडे एका मुलाने असा उपग्रह सोडण्याची कल्पना मांडली, तेव्हा त्यांनाही ती पटली. त्यातून हा उपग्रह तयार करण्यासाठी एक खास कक्ष स्थापन करण्यात आला. उपग्रह सोडण्यासाठी इस्रोशी करारही झाला. इस्रोचे वैज्ञानिकही वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करीत होते. सीओईपीने बनवलेल्या या उपग्रहाचा खर्च अवघा ५० लाख, उपयोग मात्र बराच. इतर संस्थांना जेवढा निधी मिळतो त्यापेक्षा कमी निधीतही केवळ समर्पित विद्यार्थी व शिक्षकांच्या जोरावर ‘स्वयम्’ प्रकल्प पूर्णत्वास गेला. विद्यापीठे व प्रत्यक्ष इस्रोसारख्या संशोधन संस्था मुलांच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष देशाच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकतात, त्याचा ‘स्वयम्’ हा उत्तम नमुना. सीओईपीचे उपसंचालक भालचंद्र चौधरी, प्रा. मनीषा खळदकर, प्रा. संदीप मेश्राम यांच्यासह १७६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
pm narendra modi announces names of 4 astronauts picked for gaganyaan mission
‘गगनयाना’तून अवकाशातील भरारीपूर्वी पृथ्वीवर कसून तयारी
Indian astronaut, moon surface, 2040, ISRO mission, Chairman S somnath
भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी पोहचणार? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले “त्यासाठी सातत्याने…”
PM Modi Announces Four Astronauts For India’s Gaganyaan Mission Marathi News, Prashanth Balakrishnan Nair, (Group Captain) Angad Prathap, Ajit Krishnan and Shubanshu Shukla
Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….

COEP

या यशानंतर अभिनंदनाचे अनेक संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर तर आलेच पण लँडलाइन फोनही दिवसभर खणखणत राहिला. संस्थेचे तत्कालीन संचालक अनिल सहस्रबुद्धे यांना हा उपग्रह यशस्वीरीत्या पाठवण्यात आल्याचे वृत्त ऐकून अश्रू आवरले नाहीत. आठ वर्षांच्या श्रमसाफल्याचा तो आनंद होता हे वेगळे सांगायला नकोच.

‘स्वयम्’ उपग्रहाचा भ्रमण काळ ९० मिनिटांचा आहे व तो पुण्यावरून चार वेळा जाईल. संदेश देवाणघेवाणीची त्याची क्षमता दुप्पट आहे. त्याचे हार्डवेअर व इतर सगळे भाग विद्यार्थ्यांनी स्वत:च तयार केले आहेत. या उपग्रहाची सेवा काही देशांना उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयातील भूकेंद्रावर विद्यार्थी सतत लक्ष ठेवतील. गिरीश बज या विद्यार्थ्यांने सांगितले, की उपग्रह पहिल्यांदा सकाळी अकरा वाजता पुण्यावरून फेरी मारून गेला, त्यामुळे त्याचे कामकाज व्यवस्थित सुरू झाल्याची खात्री पटली. या उपग्रहाची आज्ञावली अशी तयार केली आहे, की ज्यामुळे दर काही सेकंदांनी भूकेंद्रावर संदेश मिळेल. उपग्रह पूर्णपणे काम करण्यास १०-१५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. जी माहिती या संदेशातून मिळेल त्या माहितीचे अपलोडिंग व डाऊनलोिडग आवश्यक असते. त्यासाठी भूकेंद्रात खास अँटेना बसवण्यात आले आहेत. या उपग्रहाचा उपयोग दूरसंदेशवहनासाठी होणार आहे. उड्डाणाच्या वेळी श्रीहरिकोटा येथे उपस्थित असलेले डॉ. पी. बी. आहुजा यांनी सांगितले, की हा अतिशय भावविवश करणारा व उत्कंठा वाढवणारा क्षण होता. अनेक विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आठ वर्षांत तयार केलेल्या एका इवल्याशा उपग्रहाचे ते सीमोल्लंघन होते. विविध विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प साकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया स्वप्नाला साकार करण्यासाठी या प्रकल्पातून एक छोटेसे पाऊल पुढे पडले आहे.

Untitled-24

‘स्वयम्’ उपग्रह घनाकृती आहे व त्याचे वजन ९९७ ग्रॅम असून त्याला ‘पिको उपग्रह’ असे म्हणतात. दूरस्थ भागात संदेशवहन त्यामुळे शक्य आहे. पॅसिव्ह सिस्टीम हे त्याचे मुख्य वैशिष्टय़ आहे. त्यात उपग्रहाला पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने वळवण्यासाठी विद्युत ऊर्जा लागत नाही. त्यासाठी चुंबकीय सळ्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे या उपग्रहाला ऊर्जा फार लागत नाही, इस्रोनेही या वेगळ्या तंत्राची प्रशंसा केली आहे. ‘स्वयम्’ उपग्रह पृथ्वीच्या निकटच्या कक्षेत आहे. एखादे जहाज समुद्रात भरकटले तर ‘स्वयम्’च्या माध्यमातून त्याला मदत करता येऊ शकेल शिवाय त्यात हॅम रेडिओसाठीच्या कंप्रतेचा उपयोग केला असल्याने जहाजाने त्यांच्याकडील हॅम कंप्रतेचा वापर करणाऱ्या उपकरणातून संदेश सोडले, तर ते उपग्रहापर्यंत पोहोचतील. त्यातून संबंधित जहाजाशी संपर्क साधून व्यक्तींना मदत करता येईल. ‘स्वयम्’ उपग्रह सोलर पॅनेल्सवर चालणारा आहे.  या यशानंतर सीओईपीने दुसऱ्या उपग्रहाची निर्मिती करण्याचा प्रस्तावही मांडला आहे. वातावरणातील घटकांचा अभ्यास करण्यासाठी पतंगाप्रमाणे असणारा हा उपग्रह तयार करण्यास इस्रोने मान्यताही दिली आहे. येत्या चार वर्षांत हा उपग्रह तयार होईल. तो ‘स्वयम्’पेक्षा थोडा मोठा असेल व तोही सोलरवर चालेल. अवकाशात एक हजार कि.मी. उंचीवर तो पाठवला जाणार असून वातावरणाच्या विविध थरांचा अभ्यास त्यात केला जाणार आहे.

जेव्हा उपग्रह अवकाशात सोडले जातात तेव्हा त्यांची स्थिती काहीशी सुरुवातीला भरकटल्यासारखी असते त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने वळवणे आवश्यक असते तरच संदेशवहन शक्य होते आम्ही स्वयम उपग्रहात हायस्टेरिसिस रॉड व चुंबकाचा वापर केला आहे त्यामुळे उपग्रह पृथ्वीच्या दिशेने राहतो.’

– विशाल देसाई, प्रकल्प व्यवस्थापक

उपग्रह कमी ऊर्जेत चालवणे हे एक आव्हान असते, आम्ही अत्यंत कमी ऊर्जेत तो चालवण्याची व्यवस्था केली असून केवळ दोन वॉट ऊर्जेवर त्याचे काम चालेल अशी व्यवस्था केली आहे.’

– तनया कोलंकारी, प्रकल्पातील विद्यार्थिनी

‘स्वयम् हा उपग्रह हॅम रेडिओच्या कंप्रतेवर चालतो. आम्ही उपग्रहाकडून येणारे संदेश टिपण्यासाठी जगात १६ ठिकाणी भूकेंद्रे स्थापन केली आहेत तेथे माहिती उपलब्ध होईल, यापुढे आणखी एका उपग्रहाचा प्रकल्प इस्रोने मंजूर केला असून तो उपग्रहही सौरऊर्जेवर चालेल त्याचा आकार आताच्या उपग्रहाच्या तीन पट असेल.’

– प्रा. संदीप मेश्राम, कॉर्पोरेट रिलेशन्स प्रमुख

 

– राजेंद्र येवलेकर

(माहिती सहकार्य : रसिका मुळ्ये)