मानवमुक्ती आणि राजकीय स्वातंत्र्य यांची सांगड महात्मा गांधी यांनी घातली, त्यामुळे जनतेने त्यांचा आधुनिक भारतीय राष्ट्रवाद स्वीकारला. त्या वेळी गांधी यांच्या राष्ट्रवादाला आव्हान देऊ पाहणारी दुसरी विचारसरणी सांप्रदायिक, भावनाप्रधान होती. देशप्रेम केवळ शब्दांनी ग्वाही देऊन सिद्ध होत नाही. त्यासाठी देशातील रंजल्या-गांजलेल्यांच्या प्रश्नांवर न्यायाचे आणि समतेच्या प्रस्थापनाचे लढे द्यावे लागतात, हे विसरलेल्या प्रवृत्तींनीच तेव्हा गांधीजींची हत्या केली आणि याच प्रवृत्ती आज पुलाला नथुरामचे नाव देणे, नथुराम ‘देशभक्त’ असल्याचा प्रचार करून त्याचे मंदिर बांधण्याचा वा चित्रपट काढण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकार करत आहेत.
महात्मा गांधी यांची हत्या ही मानवी इतिहासातील अत्यंत क्रूर, अमानुष आणि असमर्थनीय घटना आहे. मानवतेच्या वेदीवरचे गांधींचे बलिदान केवळ गांधीजींनाच अमर करून गेले नाही, तर ज्या सत्य, अहिंसा आणि मानवी मूल्यांसाठी त्यांनी बलिदान दिले त्या मूल्यांच्या रक्षणासाठी एक नवे अधिष्ठान देऊन गेले. गांधीजींचा अस्थिचर्मराचा देह मानवतेच्या खुन्यांना संपविता आला असेल; परंतु ज्या विचारांसाठी महात्माजी जगले आणि बळी गेले ते विचार आजही साऱ्या जगाला मानवी मूल्यांच्या रक्षणार्थ असीम त्यागाची प्रेरणा देत अजरामर झाले आहेत.
नेमक्या याच गोष्टीचा पोटशूळ हिंदुत्ववादी राजकारणाला आहे आणि म्हणूनच गांधींच्या खुनाला २०१५ मधील ३० जानेवारीस ६७ वष्रे उलटल्यावरही त्यांच्या खुन्यांचे उदात्तीकरण करण्याची हिंदुत्ववाद्यांची उबळ अजूनही थांबलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे ही उबळ आणखी प्रबळ झाली असून खुनी नथुरामच्या उदात्तीकरणासाठी त्याच्यावर चित्रपट काढण्यापासून त्याला ‘पंडित गोडसे महाराज’ म्हणून देवळात बसविण्याच्या गोष्टी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. म्हणूनच याचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.
‘आम्ही गांधींना राष्ट्रपिता मानत नाही’ या वक्तव्याने गोडसेच्या समर्थनाची आणि उदात्तीकरणाचीही सुरुवात होते. गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.
गोडसे समर्थकांचा दुसरा मुद्दा ‘नथुराम देशप्रेमी होता’ हा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक खून झाले आणि होत आहेत. या सर्वच खुन्यांचे देशप्रेम संपलेले होते असे मानण्यास कोणताही आधार नाही. गांधीजींचा खून हा नथुरामने वैयक्तिक शत्रुत्वामुळे केलेला नाही. ती एक राजकीय हत्या होती इतकेच फार तर म्हणता येईल आणि नथुरामने गांधीजींचा खून वैयक्तिक आकसासाठी केला असे कुणीही म्हटलेले नाही; परंतु खून करण्याची मजल गाठलेले नथुरामचे राष्ट्रप्रेम ज्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, ज्यांनी फाळणी मागितली आणि कत्तली घडवून आणून मान्य करून घेतली, त्या बॅ. जीनांविरुद्ध वा ही फाळणी करण्यात ज्या ब्रिटिश शासनाने महत्त्वाची भूमिका बजावली, त्या ब्रिटिशांविरोधात का उसळले नाही, हा प्रश्न शिल्लक राहतोच. नरहर कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे या तथाकथित देशप्रेमी हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलातून १९१८ नंतर एकही गोळी उडाली नाही जी कुण्या राष्ट्रद्रोहय़ाला वा ब्रिटिशाला लागली. ती १९४८ पर्यंत महात्मा गांधींसाठीच का राखून ठेवली होती याचे उत्तर नथुरामचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी कधी तरी दिले पाहिजे. नथुरामचे देशप्रेम त्याचे उदात्तीकरण करण्यास कुचकामाचे आहे. कारण देशप्रेम केवळ शब्दांनी ग्वाही देऊन सिद्ध होत नाही. त्यासाठी देशातील रंजल्या-गांजलेल्यांच्या प्रश्नांवर न्यायाचे आणि समतेच्या प्रस्थापनाचे लढे द्यावे लागतात. नथुरामचे सोडा, पण त्याच्या हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनीही असे लढे दिलेले नाहीत. त्यांचे देशप्रेम उत्तुंग हिमालय आणि पवित्र गंगा यांचा शाब्दिक गौरव करण्यापुरतेच सीमित होते.
आणखी एका पद्धतीने नथुरामच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न हिंदुत्ववादी लोक करतात. तो म्हणजे गांधीजींच्या खुनाला गांधीवध म्हणणे. नथुरामच्या उदात्तीकरणाचा हा सर्वात निलाजरा प्रयत्न आहे. वध या शब्दाला हिंदू धर्मशास्त्रात विशिष्ट अर्थ आहे. जेव्हा एखादी व्यक्ती, सत्ता मदांध होऊन जनतेवर अपरिमित अत्याचार करते, सर्व विरोध बळाने दडपून टाकते, तेव्हा कुणी एक जनतेच्या वतीने उभा राहतो आणि त्या व्यक्तीला मारून जनतेला अन्यायातून मुक्त करतो, त्या मारण्याला वध असे म्हणतात. जसा रामाने वालीचा वध केला, कृष्णाने कंसाला मारले, हिरण्यकश्यपूला नरसिंहाने मारले. सर्वसाधारणपणे यात मारणारे देवाचे अवतार असतात. नथुराम हा देवाचा अवतार होता का? आणि गांधी पाशवी बळाने लोकांवर अन्याय करून त्यांना त्यांचे जीवन असहय़ करीत होते काय? स्वत:ला कडेकोट बंदोबस्तात ठेवून निष्पाप माणसे मारत सुटले होते काय? गांधीजींच्या खुनाला ‘वध’ संबोधून नथुरामला हौतात्म्य बहाल करण्याचे उद्योग अत्यंत निलाजरेपणाचे आहेत. केवळ आत्मिक शक्तीच्या बळावर जनतेला हिंसा थांबविण्यास भाग पाडणाऱ्या गांधींचा खून केवळ उलटय़ा काळजाचे हिंस्र लोकच करू शकतात. त्याला वध म्हणणे आणि खुन्याला हुतात्मा समजणे ही विकृती आहे.
खरी गोष्ट ही आहे की, गांधींच्या उंचीचा एकही नेता या हिंदुत्ववाद्यांकडे नव्हता. आज ज्यांचे उदात्तीकरण केले जाते ते गांधींच्या नेतृत्वासमोर अत्यंत खुजे होते, किंबहुना तत्कालीन संघर्ष गांधीजी आणि अन्य कुणी नेता वा नेते असा नव्हता. तसा तो होऊच शकत नव्हता. संघर्ष होता, तो राजकीय वस्तुवादातून गांधीजींनी जागविलेला आधुनिक भारतीय राष्ट्रवाद आणि ‘सांप्रदायिक भावनाप्रधान राष्ट्रवाद’ या दोन विचारसरणींमधील होता. यापैकी दुसरी विचारसरणी हिंदुत्ववादाच्या आधारे राजकारण करू पाहत होती आणि त्या विचारसरणीला बहुसंख्याक असलेल्या हिंदूंनीही कधी पाठिंबा दिला नाही. जो देश गरीब असतो, अशिक्षित असतो, शोषित असतो त्या देशातील गरीब, अशिक्षित आणि शोषित लोकही बहुसंख्याकांतील असतात. तसे या देशात हिंदू होते. या गरीब, अशिक्षित, शोषित हिंदूंना आपल्या उत्थानाची हमी हिंदुत्ववादी विचारसरणीत दिसली असती, तर हा बहुसंख्याक समाज त्या विचारसरणीच्या बाजूने उभा राहिला असता; पण तसे दिसत नाही. आजही या विचारसरणीला विकासाचा बुरखा घेऊनच मते मागावी लागतात. कारण या विचारसरणीने अस्पृश्य, दलित, शोषित, महिला इत्यादींच्या हक्कांसाठी कोणतेही लढे कधीच दिले नाहीत. साध्या मंदिर-प्रवेशाच्या प्रश्नावर रा. स्व. संघाने कधी आंदोलन केले नाही. मग बाकी सामाजिक सुधारणांच्या बाबतीतची बातच सोडा. म्हणूनच ही विचारसरणी गांधीवादापुढे खुजी ठरली आणि म्हणूनच या विचारसरणीने गांधीजींना नेहमीच द्वेष्य मानले.
गांधी विश्वपुरुष होते. जगातील साऱ्याच विकृती ते दूर करू इच्छित होते. कोणताच धर्म हिंसेची शिकवण देत नाही, असा महात्म्याचा ठाम विश्वास होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महात्मा मानवातील पशुत्वाला त्याच्यातील माणुसकीवर मात करू देऊ इच्छित नव्हता. धर्म, वंश, भाषा, भौगोलिक परिस्थिती विभिन्न असतानाही माणूस माणूस म्हणून एकत्र राहू शकतो, हे साऱ्या जगाला पटवून देण्याचा ध्यास महात्म्याने घेतला होता. कारण साऱ्या जगाच्या विनाशाची मुळे धर्म आणि वंशाच्या लढाईत सामावली आहेत, हे त्या द्रष्टय़ा महात्म्याने ओळखले होते. ज्यांचे हितसंबंध धर्माच्या नावे निर्माण केल्या गेलेल्या विषम सामाजिक व्यवस्थेत गुंतले होते, जे समताविरोधी होते, त्यांना ही विचारसरणी परवडणारी नव्हती. सारी भारतीय जनता गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ात आपल्या उत्थानाचे स्वप्न पाहात होती. त्यामुळे तथाकथित देशप्रेमी िहदुत्ववाद्यांना माणसाचे माणूसपण जपणाऱ्या गांधी विचारसरणीचा आणि पर्यायाने गांधींचा द्वेष करण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता. या लोकांनी गांधींना मुस्लीमधार्जिणे ठरविले आणि आयुष्यभर त्यांची निंदानालस्ती करण्याचे कार्य केले, पण जनता खुळी नव्हती. ती यांच्या बाजूने कधीच नव्हती. यातून आलेल्या नराश्यातून या विचारसरणीने महात्म्याचा खून केला.
मानवी मूल्ये असणारे विचार शाश्वत असल्याने कधीच संपत नाही, हे या हिंदुत्ववाद्यांना कधीच समजले नाही. गांधी विचार आजही शाश्वत असून समता, न्याय आणि बंधुत्वासाठीच्या लढय़ांना प्रेरणा देत आहेत. हे पाहणे ज्यांना असहय़ आहे असे लोक नराश्यातून नथुरामचे उदात्तीकरण करीत आहेत.
डॉ. विवेक कोरडे
लेखक ‘शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचा’चे संस्थापक-अध्यक्ष आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते आहेत. ईमेल : drvivekkorde@gmail.com