ताजी घटना –
अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना राज्याच्या प्रतिनिधीगृहाबाहेर (त्यांची विधानसभा म्हणायला हरकत नाही) अमेरिकेच्या राष्ट्रीय झेंडय़ाबरोबरच ‘कॉन्फेडरेट फ्लॅग’ (सदर्न क्रॉस) देखील गेली कित्येत वर्षे फडकवला जायचा. त्यावरून अमेरिकेत मोठे वादंग माजले होते. तो झेंडा १० जुलै २०१५ रोजी कायमचा उतरवण्यात आला.

पाश्र्वभूमी
या विषयाला अमेरिकी गृहयुद्धाचा (१८६१ ते १८६५) संदर्भ आहे. हे यादवी युद्ध सुरू होण्याला अमेरिकेतील गुलामगिरीच्या इतिहासाचा मोठा संदर्भ होता. १९८० साली झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिकेत अब्राहम लिंकन हे पहिले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी देशात सर्वत्र गुलामगिरी बंद करण्याचा पुरस्कार केला. त्याला दक्षिणेकडील काही राज्यांनी विरोध दर्शवला. या प्रश्नावरून १९८१ ते १९८५ या काळात अमेरिकी यादवी युद्ध झाले. त्यात उत्तरेकडील राज्यांना युनियन तर दक्षिणेतील बंडखोर राज्यांना कॉन्फेडरेसी (किंवा साऊथ) असे म्हणत. या दक्षिणेतील कॉन्फेडरेट राज्यांनी काही युद्धात काही काळ एक चौरसाकृती झेंडा आपले निशाण म्हणून वापरला होता. लाल रंगाच्या पाश्र्वभूमीवर गडद निळ्या रंगाचा फुलीच्या आकाराचा क्रॉस (सेंट अँड्रय़ूज क्रॉस) आणि त्यावर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चांदण्या असे त्याचे स्वरूप होते. बायबलमधील उल्लेखाप्रमाणे सेंट अँड्रय़ूज हे रशिया आणि आर्यलडचे संत होते. त्यांना ग्रीसमध्ये फुलीच्या आकाराच्या क्रॉसवर चढवून मारण्यात आले होते. दक्षिणेकडील राज्यांतील बरेच नागरिक मूळचे आर्यलडचे होते. त्यामुळे त्यांना हा सेंट अँड्रय़ूज क्रॉस आपलासा वाटत होता आणि युद्धात प्रेरणादायी ठरला होता. यादवी युद्धाच्या अखेरीस दक्षिणेकडील राज्यांचा पराभव होऊन अमेरिकेत सर्वत्र गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली. त्यामुळे आजही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांसाठी (आफ्रिकी वंशाचे अमेरिकी) हा कॉन्फेडरेट झेंडा (सदर्न क्रॉस) त्यांच्या गुलामगिरीच्या इतिहासाचे प्रतीक बनला आहे आणि अप्रिय स्मृती जाग्या करतो, तर दक्षिणेतील राज्यांमधील काही गौरवर्णीयांसाठी तो वृथा अभिमानाचा विषय आहे.
तात्कालिक कारण- चार्ल्सटन चर्च गोळीबार
साऊथ कॅरोलिना राज्यातील चार्ल्सटन शहरात इमॅन्युअल आफ्रिकन मेथॉडिस्ट इपिस्कोपल चर्च हे कृष्णवर्णीयांचे अमेरिकेतील खूप जुने चर्च आहे. तेथे प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर १७ जून २०१५ रोजी सायंकाळी डायलन रूफ नावाच्या २१ वर्षीय गोऱ्या तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ९ कृष्णवर्णीयांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. रूफला दुसऱ्या दिवशी अटक झाली. हल्ल्यानंतर वांशिक दंगल उसळेल या अपेक्षेने हे कृत्य केल्याचा जबाब त्याने दिला. यानंतर अमेरिकेतील जनमत प्रक्षुब्ध होऊन वंशभेदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या कृत्याचा जाहीर निषेध झाला. तसेच कॉन्फेडरेट झेंडा कायमचा उतरवण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला.

त्यानंतरचा घटनाक्रम

’२० जूनला साऊथ कॅरोलिनाच्या प्रतिनिधीगृहासमोर हजारो नागरिकांनी निदर्शने केली. मूव्हऑनडॉटऑर्ग या संकेतस्थळावरील झेंडा हटवण्याच्या ऑनलाइन याचिकेला ३,७०,००० हून अधिक नागरिकांनी सह्य़ा करून पाठिंबा दिला.
’२६ जूनला साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हॅले यांनीही हा झेंडा हटवण्याची गरज बोलून दाखवली.
’२६ जूनला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी चार्ल्सटन कॉलेजमध्ये ५००० श्रोत्यांसमोर या हल्ल्याचा निषेध करत झेंडा हटवण्याला पाठिंबा दिला.
’६ जुलै रोजी साऊथ कॅरोलिनाच्या सिनेटमध्ये हा झेंडा हटवण्याच्या विधेयकावर चर्चा व मतदान झाले.
’९ जूनला १३ तासांच्या चर्चेनंतर झेडा हटवण्याचे विधेयक दोन तृतियांश बहुमताने (९४ विरुद्ध २० मतांनी) मंजूर झाले. तसेच गव्हर्नर निक्की हॅले यांनी त्या कायद्यावर सही केली. सही करण्यासाठी त्यांनी ९ लेखण्या वापरल्या. त्या चर्च हल्ल्यातील ९ मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येतील.
’१० जुलै रोजी हा झेंडा समारंभपूर्वक कायमचा उतरवण्यात आला. आता तो जवळच्याच संग्रहालयात ठेवण्यात येईल.
’अमेरिकेच्या काही नागरिकांना मात्र या झेंडय़ाचा संबंध गुलामगिरीशी नव्हता असे वाटते. तो केवळ यादवी युद्धापुरता मर्यादित होता असे वाटते.
’अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असलेले नेते डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र हा झेंडा हटवणे वेडेपणाचे आहे, असे ट्विटरवर म्हटले होते. त्यावरून नवा वाद सुरू झाला होता.