डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली दसऱ्याच्या दिवशी नागपुरात धम्मचक्रप्रवर्तन केले, त्याआधीही या निर्णयाचे टीकाकार होतेच. त्यांनी आता अधिक कडवे होणे ठीक आहे; पण धम्मस्वीकारासह येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या की नाही या मुद्दय़ाच्या आधारे आज डोळस टीकाही व्हायला हवी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ पासून सामाजिक सुधारणांच्या चळवळीस प्रारंभ केला. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांना माणुसकीचे हक्क मिळतील, अशी आशा त्यांना १९३५ पर्यंत वाटत होती. जातिव्यवस्था ज्या धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे त्या श्रद्धाही नष्ट केल्या पाहिजेत, असे त्यांचे स्वच्छ मत होते. हिंदू धर्मातील नवसमाजनिर्मितीची ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही, हे त्यांना जाणवू लागले तेव्हा त्यांनी १९ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मातराची घोषणा केली व प्रत्यक्षात २० वर्षांनंतर, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लक्षावधी अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे जातिअंताच्या लढय़ातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.  तेव्हा त्याचे मूल्यमापन १९५६ पासून न करता १९३५च्या त्यांच्या धर्मातराच्या घोषणेपासून आजच्या संदर्भात केले, तर जातिअंताचा लढा कितपत यशस्वी झाला याचा मागोवा घेता येईल.
महात्मा गांधी यांनी बाबासाहेबांच्या धर्मातराच्या घोषणेस विरोध केला होता; पण प्रारंभी जाती-वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे गांधी बाबासाहेबांच्या धर्मातराच्या घोषणेनंतर, धर्मशास्त्राचा अस्पृश्यतेला पाठिंबा असेल, तर मी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणार नाही, सवर्ण मुलींनी हरिजन वर निवडावा, अशी बदलती भाषा करू लागले होते. हिंदू महासभेच्या १९३५च्या पुण्यातील बैठकीत पंडित मदनमोहन मालवीय म्हणाले होते, ‘‘हिंदू धर्म वाचविण्यासाठी हिंदूंनी गतेतिहासातील चुका दुरुस्त कराव्यात. हरिजनांनी हिंदू धर्माचा त्याग करू नये. असे झाले तर त्यांची पायधूळ आम्ही कपाळाला लावू.’’ सावरकरांनी १९२९ सालीच, पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रहाच्या वेळी अस्पृश्यांची बाजू घेतली होती; परंतु धर्मातराच्या घोषणेमुळेच हिंदू महासभेला अस्पृश्यता हा राष्ट्रीय प्रश्न आहे, हे मान्य करावे लागले. बाबासाहेबांना तरीही धर्मातर अटळ ठरले, कारण शब्दप्रामाण्याधारित धर्मास अंतर दिल्याशिवाय सामाजिक समता येणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते आणि शास्त्रांचे प्रामाण्य झुगारून देण्यास सवर्ण नेते तयार नव्हते. आजही ही स्थिती कायम आहे. जातिअंताच्या लढय़ातील ही खरी धोंड आहे.
बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर सूड उगविण्यासाठी नव्हे, तर सामाजिक पुनर्रचनेसाठी बुद्ध धम्म स्वीकारला. या धम्मस्वीकारातील बुद्धिवाद मान्यच करायचा नाही, अशी धारणा टीकाकारांनी ठेवली. धम्मचक्र प्रवर्तनानंतरही सावरकरांनी म्हटले, ‘हिंदूंनी बाटग्याचे कौतुक करणे हा कोटगेपणा आहे.’ पुढे १९ फेब्रुवारी १९८१ रोजी, तामिळनाडूतील एक हजार दलित कुटुंबांनी मीनाक्षीपूरम् येथे इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी म्हटले- ‘‘मुस्लीम कट्टरवाद्यांनी, आखाती देशांच्या पैशाच्या बळावर हे धर्मातर घडविले’’.. प्रत्यक्षात मीनाक्षीपूरम् येथील दलितांची आर्थिक स्थिती चांगली होती. ते सुशिक्षित होते. काही डॉक्टर, ऑडिटर होते. त्यांच्या इस्लामस्वीकाराचे खरे कारण उच्चवर्णीयांकडून त्यांचा होत असलेला छळ, हेच होते; पण या वास्तवाची डोळस दखल हिंदू धर्माभिमान्यांनी कधी घेतलीच नाही. ‘बाबासाहेबांच्या मागे दहा लोकही जाणार नाहीत’ असे भाकीत करणाऱ्यांना पुढे लाखोंचा धम्मस्वीकार पाहावा लागला. आदिवासी, भटके-विमुक्त आणि ओबीसी समाजही आज बुद्धाकडे वळत आहेत; पण म्हणून धर्मातराच्या या घटनांचा हिंदू सवर्ण मानसिकतेवर काही इष्ट परिणाम झाला, असे नव्हे. म्हणूनच, बौद्ध झालात तरी आमच्या दृष्टीने तुम्ही हीन आणि नीचच आहात, अशा जातीय मानसिकतेतून आजही देशभर दलितांवर नृशंस अत्याचार होतच असतात.
बाबासाहेबांनी धर्मातर न करता हिंदू धर्मात राहून जातिअंताचा लढा लढायला हवा होता, हे हिंदुत्ववाद्यांचे मत आजही मानभावी ठरते, याचे कारण हिंदुत्ववादी परिवाराला समाजाची पुनर्रचना न करता व आपल्या श्रेष्ठत्वाला आणि शब्दप्रामाण्याला धक्का लागू न देता हिंदूंचे संघटन, समरसता आदी हवे आहे; पण या पद्धतीने जातिअंत कसा होणार आहे? धर्मातरे रोखण्यासाठी हिंदू धर्मास लवचीक स्वरूप देण्याची गरज असताना हिंदुत्ववादी धर्मपीठे हिंदू धर्मास कट्टरतेकडे वळविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ‘धर्माभिमानी’ जातीयतेचे दुष्टचक्र थांबणार तरी कसे? आता दिल्लीत रा. स्व. संघ परिवारातील पक्षाचे सरकार आल्यावर तर, विश्व हिंदू परिषदेचे नेते अल्पसंख्याकांना या देशात राहायचे तर दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावे लागेल, अशी भाषा करताहेत. खासदार योगी आदित्यनाथ हे पोटनिवडणुकीपूर्वी ‘लव्ह जिहाद’ची ओरड करतात आणि दुसरे खासदार साक्षी महाराज मदरशांमधून दहशतवादाचेच शिक्षण दिले जाते, असे फूत्कार पुरेशा माहितीविना सोडून, सर्व मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत धर्मद्वेष चेतवितात. सरसंघचालक मोहन भागवत हे भारत हिंदू राष्ट्र  आहे, असे विनाकारण विधान वारंवार करतात. दुसरीकडे, देशातील शाळांमधून सनातन वैदिक धर्माचे शिक्षण द्यावे, पहिलीपासून भगवद्गीतेचा समावेश अभ्यासक्रमात असावा, अशा मागण्या स्वामी स्वरूपानंद करीत आहेत. एका शंकराचार्याच्या आवाहनानंतर हिंदू कट्टरवाद्यांची धर्म‘संसद’ साईबाबांच्या मूर्ती उखडण्याचा ठराव करते. तेव्हा असे देशबुडवे धर्माधिष्ठित राजकारण करणाऱ्या कट्टरवादी हिंदू धर्मात बाबासाहेबांनी का म्हणून राहायला हवे होते, हा प्रश्न आजचाही आहेच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हक्क बजावण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर आणि नाशिकच्या काळाराम मंदिरापुढे सत्याग्रह केला, तेव्हा मार्क्‍सवादी शांत होते. शोषित वर्गाची संघटना आर्थिक पायावर बांधताना जातिप्रथेच्या विरोधात प्रबोधन करण्याची गरज येथील मार्क्‍सवाद्यांना वाटलीच नाही. आज काही मार्क्‍सवादी विचारवंतांना ‘माणसाचे जागतिकीकरण’ हे जातिअंताचे प्रभावी अस्त्र ठरणार आहे, हे मत पटत असेल; पण ‘भारतीय समाजात असलेली उच्च-नीचता मोडल्याशिवाय कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेली साम्यवादी सत्ता भारतात येणारच नाही’, हे बाबासाहेबांनी मांडलेले मत जातिनिर्मूलनाच्या मूलगामी चिंतनावर आधारित होते आणि ते काळाच्या कसोटीवरही खरे ठरले आहे. महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यक्रमास प्राधान्य दिल्यामुळे काही गांधीवादी जातिव्यवस्थेच्या विरुद्ध भूमिका घेऊ लागले होते; पण काही सन्मानीय अपवाद वगळता बहुतेक दांभिकच निघाले. सारांश, सर्वच राजकीय पक्ष आणि विचारधारा, जातिअंतास प्राधान्य देऊन ते रुजवण्यात विविध कारणांनी कमी पडल्या वा अक्षम ठरल्या.
तरीही, बाबासाहेबांचे धर्मातर व महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा याचा परिणाम म्हणून जातिप्रथेवर काही प्रमाणात आघातही झाले. आंतरजातीय विवाह, कमी प्रमाणात का होईना, पण होऊ लागले; मात्र, धर्मातराची अस्मिता चिरडण्यासाठी त्यांच्यावर वाढत्या प्रमाणात क्रूर अत्याचारही होऊ लागले हे नाकारता येत नाही.
बाबासाहेबांच्या धर्मातराची एक फलश्रुती अशी की, धर्मातरामुळे बौद्ध समाजाला स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळाली. त्याचे माणूसपण जागे झाले व समतेचे मूलभूत मानवी हक्क मला उपभोगता आले पाहिजेत, अशी एक अस्मिता त्याच्यात निर्माण झाली.. पण त्याचबरोबर हेही तेवढेच खरे की, बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षा समारंभात ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्यापैकी आठ या देव, दैववाद, अवतार या कल्पनांना पूर्ण नकार देणाऱ्या होत्या. नेमका त्याच प्रतिज्ञांचा विसर आता बौद्धांना (काही अपवाद वगळता) पडला असून बौद्ध समाज मोठय़ा प्रमाणावर कर्मकांडाकडे वळत आहे. देवदेवता, अंधश्रद्धा, बुवाबाजी, गंडे-दोरे, अंगारे-धुपारे, नवस-सायास करणे व त्यासाठी कोंबडे-बकरे कापणे हे सर्व थोतांडी विधी आता बौद्ध करू लागले आहेत. बौद्ध समाज अजूनही आपसातील पूर्वाश्रमीच्या जाती (सोमस, आंधवन, लाडवन, तिळवन, बावने.. आदी) मोडून काढू शकलेला नाही. बौद्ध समाज हा एक आदर्श संस्कृती निर्माण करू शकला नाही, हे कटू सत्य आहे.
डॉ. आंबेडकरांचा बुद्ध डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला नव्हे, तर डोळे उघडे ठेवून जग बदलायला निघालेला बुद्ध आहे. बुद्ध आणि मार्क्‍स यांची तुलना त्यांनी याच दृष्टिकोनातून केली. दारिद्रय़निवारणासाठी मार्क्‍सचा हिंसेचा नव्हे, तर बुद्धाचा अहिंसक लोकशाहीवादी मार्गच अवलंबावा लागेल, असे डॉ. आंबेडकरांनी सांगून ठेवले. केवळ ध्यानधारणा, विपश्यना, दानपरामिता यांत रमणारा वा बुद्धगयेला भेटी देणारा कर्मकांड धम्म बाबासाहेबांना नको होता. त्यांना हवा होता समाजाची पुनर्रचना करणारा धम्म. या क्रांतिकारी धम्म संकल्पनेचा विसर आज बौद्धांना पडला आहे.
धम्मचक्र प्रवर्तनानंतर आर्थिक दास्यातून मुक्तता, या अनुषंगाने तर आज विचारच होत नाही. खासगीकरण- उदारीकरणाच्या आर्थिक नीतीमुळे दुर्बल घटकांसमोर नवी आव्हाने उभी राहात आहेत, आर्थिक परावलंबित्व कमालीचे वाढत आहे, आरक्षणाच्या कुबडय़ा कुचकामी ठरत आहेत. हे धम्म चळवळीसमोरील खरे आव्हान आहे. वंचितांसाठी संस्था उभारणे, रचनात्मक प्रकल्प राबवणे आवश्यक असताना सुशिक्षितांना आपल्या अशिक्षित, गरीब बांधवांचा विसर पडला आहे. याचा अर्थ, बौद्ध धम्म आंबेडकरी प्रेरणेनुसार आजच्या बौद्ध समाजात रुजलेलाच नाही, असा होतो.
प्राचीन बौद्ध धर्माच्या विकासकाळात समतावादी धर्मतत्त्वे आचरणात आणण्याची पात्रता भिख्खूंमध्ये होती; पण पुढे भिख्खूंचा वर्ग जसजसा स्वार्थी बनत गेला तसतसा बौद्ध धर्माचा प्रभावही क्षणी होता गेला. आज हेच घडत आहे. बाबासाहेबांच्या धम्माने ‘आत्मा’ नाकारला; पण आज काही भिख्खू परित्राणपाठ (मृतात्म्यांच्या- पितरांच्या नावाने कर्मकांड) सारख्या थोतांडांचे आयोजन करून, बाबासाहेबांच्या ‘आत्म्या’ला शांती लाभावी म्हणून बुद्धवंदनेचे कार्यक्रम भरवत आहेत. काही भिख्खूंनी मध्यंतरी बाबासाहेबांच्या अस्थींची मिरवणूक काढण्याचा पोरखेळ केला. हे प्रकार सुरू राहिल्यास परंपराप्रिय हिंदू धर्मात आणि विज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ धम्मात फरक काय राहणार? भिख्खू सुखासीन झाले आहेत, धम्मास त्यांनी व्यवसायाचे स्वरूप दिले आहे आणि अभ्यास, वादविवाद, पांडित्य याऐवजी भिख्खू आता नको त्या बाबींसाठीच (काही अपवाद) चर्चेत येतात. ‘भिख्खूंची भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांची असावी, जनतेत त्याची प्रतिमा मित्र- मार्गदर्शक व तत्त्वचिंतकाची असावी,’ असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी असेही म्हटले होते की, कोणत्याही धर्माचा ऱ्हास तीन कारणांनी होतो : (१) धर्माचा पाया कच्चा असेल तर (२) विरोधकांशी वादविवाद करणारे धर्मवेत्ते प्रचारक कमी असल्यास (३) सर्वसामान्य माणूस खऱ्या धर्माचे आचरण न करता केवळ नक्कल करीत असेल तर!
बाबासाहेबांची धम्म चळवळ सांप्रत अशा भरकटलेल्या दिशेनेच निघाली आहे. असे का झाले याचा प्रत्येकाने आत्मशोध घेतला पाहिजे, असे वाटते.
*उद्याच्या अंकात राजेश्वरी देशपांडे यांचे ‘समासा’तील नोंदी हे सदर.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?