बीटी वांग्याच्या वाणासाठी शेत-चाचण्यांची परवानगी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका कंपनीला नुकतीच दिली आहे आणि ‘बीटी बियाण्यां’चा – शेतीतील जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापराचा वाद आता जणू शमला, असेही चित्र गेल्या पाच-सहा महिन्यांत दिसते आहे. या पाश्र्वभूमीवर, मुळात हा वाद असण्याचेच काही कारण नव्हते आणि बीटी बियाण्याच्या चाचण्यांसह त्याच्या वापरालाही आपण साथ द्यावयास हवी, असे अनुभवान्ती सांगणाऱ्या दीर्घ लेखाचा हा पहिला भाग..
जगातील प्रगत, प्रगतशील अशा २८ देशांमधून ४३३ दशलक्ष एकरावर लागवड करण्यात येणाऱ्या सोयाबीन, मका, गहू, तांदूळ, कापूस, पपई, मोहरी, बीटरूट वगैरेसारख्या अनेक पिकांमधे  GM  तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. १७-१८ वर्षांपूर्वी जागतिक पातळीवर GM  पिकांखालील क्षेत्र केवळ ४२ लाख एकरांपुरते मर्यादित होते. पण या तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर होत गेल्यामुळे GM  पिकांखालील क्षेत्र दरवर्षी अत्यंत वेगाने वाढत आहे. शेतकऱ्यांच्या, प्रक्रिया उद्योगांच्या, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या सोई-गरजेनुसार GM  तंत्रज्ञानाच्या संशोधनातून सुधारित आणि नवीन जाती निर्माण होत आहेत.
जैविक तंत्रज्ञानातील या प्रत्येक नवीन संशोधित जातींच्या वापरामुळे मानव आणि प्राणिमात्रांचे आरोग्य, पर्यावरण, जमिनीचे आरोग्य यांसारख्या असंख्य घटकांवर दीर्घकालीन, दुष्परिणाम होणार नाहीत, या गोष्टीची (शास्त्रीय निकषांवर) खात्री करून घेणे अपरिहार्य असते. जगातील सर्व तज्ज्ञ-शास्त्रज्ञांचे आणि विविध क्षेत्रांतील जागतिक संस्थांचे या घडामोडींकडे बारीक लक्ष असते. कारण असे संशोधन आता कोण्या एका देशापुरते मर्यादित असू शकत नाही. परस्परांशी व्यवहार करूनच आपापली उन्नती साधण्याचा प्रयास करणाऱ्या आजच्या काळात जगातील सर्व मानव-समाजांना परस्परांच्या हिताची, स्वार्थाची आणि कल्याणाची काळजी घेणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे हेतुपुरस्सर कोणी कोणाला फसवण्याची शक्यता बाद होते. तरी पण स्थानिक परिस्थिती आणि परिसरामध्ये आवश्यक ती तपासणी, चाचणी करून घेण्यास कुणाची हरकत नसावी. तसेच तपासणीनंतर एकदा मान्यता मिळाल्यानंतर त्या तंत्रज्ञानाच्या वापरास परत कुणाचीही हरकत नसावी आणि अशा हरकतीची दखल घेण्याचीही गरज नसावी.
जनुकीय अभियांत्रिकीसारख्या विविध क्षेत्रांत समाजाला वरदान ठरलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयापूर्वी बऱ्याच काळापासून पिकांमध्ये काही चांगल्या व ईप्सित गुणांच्या अभिवृद्धीसाठी आणि मुख्यत: उत्पादनवाढीसाठी संकरीकरणाचे तंत्रज्ञान प्रचलित आहे. आज सरळ वाणांऐवजी संकरित बियाणांमध्ये BT चा अंतर्भाव करण्यामागे संकरित बियांमध्ये असलेली उत्पादकता व उत्पादनक्षमता हे एक मुख्य कारण आहे हे आक्षेप घेणाऱ्यांनी समजून घ्यावे. कापूस पिकांमध्ये असलेली उत्पादकता तसेच सिंचनामुळे अपेक्षित वाढीव उत्पादकता वा संकरित जोमामुळे वाढलेली उत्पादनक्षमता बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडत नव्हती. केवळ बोंडअळीच्या (BT तंत्रज्ञानातून झालेल्या) बंदोबस्तामुळे आता ते शक्य झाले आहे आणि वांग्यात BT आल्यानंतर त्या पिकामध्येही हे शक्य होणार आहे. ‘BT विरोधकांकडून कापसातील या नवीन जनुकाचा उत्पादकतेशी काही संबंध नाही’ असे प्रतिपादन केले जाते. ते प्रत्यक्षरीत्या खरे असले तरी अप्रत्यक्षरीत्या कसे तर्क-विसंगत आहे ते वरील विवेचनावरून लक्षात यावे.
वरील प्रतिपादनाच्या सरळसरळ विरुद्ध वा विसंगत स्वरूपाचे निरीक्षण पुढे आल्याचा दावादेखील BT विरोधकांनीच केला आहे. ‘BT कापसाची उत्पादनक्षमता आता घटली आहे. सुरुवातीच्या काळातल्यापेक्षा BT कापूस आता कमी उत्पादन देऊ लागला आहे’ अशी या मंडळीची तक्रार आहे. पिकांचा फेरपालट करण्याऐवजी कोणतेही एक पीक वारंवार त्याच जमिनीत घेत गेल्यास त्या पिकासाठी आवश्यक असणारे आणि एकूणच जमिनीतील एका विशिष्ट स्तरातील अन्नद्रव्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. त्याचबरोबर त्या जमिनीत आणि एकूण परिसरातच पिकावर पडणाऱ्या कीड आणि रोगांना जन्म देणाऱ्या आणि प्रादुर्भाव वाढवणाऱ्या, पसरवणाऱ्या किटकांचे आणि जिवाणूंचे प्रजनन वाढत जाते आणि याचा एकत्र परिणाम शेवटी पिकाच्या उत्पादनावर होतो. म्हणजे उत्पादन क्षमतेपेक्षा उत्पादनात हळूहळू घट येऊ लागते. एक पीक (monoculture) पद्धतीमध्ये ही परिस्थिती कोणत्याही पिकाच्या बाबतीत उद्भवणे निसर्गत:च क्रमप्राप्त आहे. पिकामध्ये BT असण्या-नसण्याशी त्याचा काही संबंध नाही. कापसात BT आल्यानंतर उत्पादन आणि बाजार किमती या दोन्हींमध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत कापूस पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणे साहजिकच आहे. पिकाचा फेरपालट करणे जमिनीच्या आरोग्यासाठी आणि सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे. अन्य पिकांमध्ये संशोधन होऊन कापसाच्या तुलनेत परवडणारी पिकांची वाणं चलनात आल्यास ही परंपरागत पद्धत परत रूढ होऊ शकते. पण मग त्यासाठी संशोधनाचे प्रयत्न थांबवून चालणार नाहीत.
शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी नवीन बियाणे वापरावे लागते आणि केवळ एका कंपनीकडेच हे तंत्रज्ञान असल्यामुळे महागडय़ा किमतीत विकत घ्यावे लागते, आणि या व्यवहारात कंपनीचाच केवळ फायदा आहे असा एक आक्षेप नेहमी घेतला जातो. आक्षेपकर्त्यांना संकरित बियाणांबद्दल जुजबी माहिती असेल तर हे बियाणे (त्यात BT चा अंतर्भाव असो वा नसो) दरवर्षी बदलावे लागते हे निश्चित ठाऊक असेल. म्हणजे यात शेतकऱ्यांसाठी नवे किंवा वेगळे काहीच नाही. त्यानंतर संकरित बियाणे + BT यामुळे शेतकऱ्यांचाही विशेष फायदा होत असेल तर कंपनीच्या नफ्या-तोटय़ाबाबत शेतकऱ्यांना आक्षेप असण्याचे काही कारण नाही. तसेच संशोधनाला किंमत, बाजारपेठ आणि प्रोत्साहन मिळू लागल्यानंतर कालांतराने त्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान जन्माला घालणारे अनेक स्पर्धक उदयाला येणे अपरिहार्य ठरते. चीन, फिलिपाइन्स, ब्राझील, युरोप, अमेरिका आणि भारतासह जगभरातून खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्रातून BT / GM  तंत्रज्ञान विविध पद्धतीने विकसित करण्याच्या संशोधनांना जो वेग आला आहे त्यावरून या धारणेला पुष्टीच मिळते. थोडक्यात, तंत्रज्ञानाचा वापर व्यापक प्रमाणावर झाल्यानंतर हळूहळू किमतीही कमी होतात, तसेच त्या क्षेत्रातील कुणा एका उत्पादकाची मक्तेदारीही आपोआपच कमी होते.
परंतु, अन्यत्र (अन्य देशांत) उपयोगात असलेले तंत्रज्ञान कोणतेही ठोस कारण नसताना येथील शेतकऱ्यास नाकारणे वा ते उपलब्ध होऊ देण्यास वर्षांनुवर्षांचा काळ जाऊ देणे हा शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान वापरण्याच्या संधीवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा दहशतवादी प्रकार आहे. या तंत्रज्ञानाच्या फायद्याचा मुख्य लाभार्थी शेतकरीच आहे. पण शेतकरी भोळसट आहे, अशिक्षित आहे असला खोटा समज तयार करून त्याच्या हितरक्षणाच्या नावाखाली त्याच्या स्वातंत्र्याच्या आड येण्याचे वा त्यात बाधा आणण्याचे निकराचे प्रयत्न सर्वत्र होताना दिसत आहेत. असे दिशाभूल करण्याचे प्रयत्न शेवटी अयशस्वी ठरतात हे BT कापसाच्या बाबतीत सिद्ध झाले आहे. तात्पर्य- विरोधक वारंवार आरोप करतात त्याप्रमाणे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांवर फसवणुकीने वा चलाखीने लादले गेलेले नाही. BT कापसाला एवढय़ा अल्पकाळात लाभलेल्या यशाच्या प्रचीतीनंतर खरे म्हणजे BT बाबतच्या सर्व वादांना मूठमाती मिळावयास पाहिजे.
आज डाळ-वर्गीय धान्यांमध्ये झालेल्या केवळ महागाईबद्दलच खूप चर्चा होते. पण या पिकांत संकरित बियाणांची निर्मिती अडचणीची असल्यामुळे आणि अन्य मार्गानेही उत्पादनक्षमता फारशी वाढवता आली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे हे कोणी लक्षात आणून देत नाही. अशाही परिस्थितीत अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किमान तुरीसारख्या पिकामधील प्रचलित वाणांमध्ये वा आहे त्या परिस्थितीमध्ये जरी BT चा अंतर्भाव करता येणे शक्य झाले तरी तुरीच्या उत्पादनामध्ये खूप वाढ होऊ शकेल.
उत्क्रांतीमध्ये जीवसृष्टीतील असंख्य सजीवां (प्राणी, जिवाणू, बुरशी, वनस्पती)मधील जनुकांची आपसात विभागणी आणि परस्परांत नैसर्गिक देवाण-घेवाण होत आलेली आहे आणि सततच्या नैसर्गिक प्रक्रियेत यापुढेही ती होत राहणार आहे. याआधी संकरित बियाणांच्या निर्मितीमध्येही काही विशिष्ट गुणधर्म मिळवण्यासाठी (हे गुणधर्म आढळून येणाऱ्या) सजातीय रानटी वनस्पतींशी पर-परागीकरण करून या गुणांची हेतुपुरस्सर जोपासना केली आहे. त्यापुढे जाऊन आज तीच प्रक्रिया आपण ‘जनुकीय अभियांत्रिकी’ या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व सजीवांमध्ये नेमकेपणाने आणि कमी कालावधीत म्हणजे गतिमानतेने करू शकत आहोत. नव्याने काही वेगळेच घडत आहे असा जो समज पसरवला जात आहे तो चुकीचा आहे.
 कीटकनाशकांचे अंश पीक काढणीनंतर खाद्यान्नांमध्येदेखील शिल्लक राहतात. परंतु अन्य उपाय निरुपयोगी ठरल्यामुळे शेतकरी या घातक कीटकनाशकाचा वापर कापसावर करत होते आणि वांगी वगैरेसारख्या अन्य पिंकावर अजूनही करत आहेत. वांग्यात BT आल्यानंतर हा प्रकार थांबू शकतो. BT वांग्यामध्ये जमिनीत वाढणाऱ्या एका जिवाणूचे (बुरशीचे) केवळ एक गुणसूत्र वापरले आहे. विविध प्रकारच्या अशा बुरशींचा वापर नित्य मानवी खाद्यान्नात होत असतो. किती तरी मुंग्या, मुंगळे, किडे नकळत आपल्या पोटात जात असतील. जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने एका जिवाणूचे जनुक खाद्यान्न वा अन्य पिकांमध्ये घातल्यामुळे उद्भवणाऱ्या कल्पित, सिद्ध न झालेल्या पण BT विरोधकांच्या दृष्टीने संभाव्य ठरणाऱ्या ‘कथित’ अप्रत्यक्ष धोक्याच्या तुलनेत BT मुळे होणाऱ्या प्रत्यक्ष फायद्याचा त्यांनी विचार करावा. त्याऐवजी रोज कीड लागून सडलेली वा घातक औषधी मारलेली वांगी खाऊन आरोग्याला होणाऱ्या प्रत्यक्ष धोक्याचा विचार प्राथमिकतेने करावा. (पूर्वार्ध)